← Leviticus (6/27) → |
1. | परमेश्वर मोशेला म्हणाला, |
2. | “कोणी परमेश्वराविरुद्ध खालीलपैकी एखादी गोष्ट करुन पाप केले म्हणजे एखाद्याने गहाण ठेवलेली वस्तू किंवा ठेव म्हणून ठेवलेली वस्तू परत करण्यास खोटे बोलून नकार दिला. किंवा एखाद्याची चोरी केली किंवा कोणाला फसवीले.” |
3. | किंवा एखाद्याची हरवलेली वस्तू सापडली असता सापडली नाही अशी लबाडी केली किंवा एखादे काम करण्याचे वचन दिले, पण मग ते काम करणार नाही किंवा एखादे वाईट काम केले; |
4. | जर कोणी वरील प्रमाणे काही केले तर त्याच्यावर पाप केल्याचा दोष येईल; त्याने चोरलेली वस्तू माघारी आणावी; किंवा फसवून काही घेतलेले किंवा गहाण ठेवलेली वस्तू किंवा ठेव किंवा जिच्याबद्दल त्याने लबाडी केली अशी सापडलेली वस्तू किंवा |
5. | खोटे वचन देऊन न केलेले काम त्या प्रत्येकाबद्दल त्याने पूर्ण भरपाई करावी आणि त्या त्या वस्तूंच्या किंमतीचा पांचवा हिस्सा अधिक भरावा. त्याने खऱ्या मालकाला पैसे द्यावेत; दोषार्पण आणण्याच्या दिवशीच त्याने हे करावे. |
6. | “त्याने परमेश्वरासाठी याजकाने सांगितलेल्या किंमतीचा एक निर्दोष मेंढा दोषार्पण म्हणून याजकापाशी आणावा; |
7. | मग याजकाने तो मेंढा घेऊन परमेश्वरासमोर जावे व त्या माणसासाठी प्रायश्चित करावे; आणि मग ज्या अपराधामुळे तो दोषी ठरला असेल त्याची त्याला देव क्षमा करील.” |
8. | परमेश्वर मोशेला म्हणाला, |
9. | “अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना आज्ञा कर की होमापर्णाचे असे नियम आहेत. होमबली अग्नीकुंडावर रात्रभर ठेवून तो सकाळपर्यत राहू द्यावा; आणि वेदीवरील अग्नी तिच्यावर जळतच ठेवावा. |
10. | मग याजकाने आपला सणाचा झगा व चोळणा अंगात घालून होमार्पणमुळे वेदीवर राहिलेली राख उचलावी व ती वेदी जवळ ठेवावी. |
11. | मग याजकाने आपली वस्त्रे बदलावी व दुसरी वस्त्रे घालून ती राख छावणी बाहेर एखाद्या स्वच्छ ठिकाणी न्यावी; |
12. | “परंतु वेदीवरील अग्नी तिच्यावर जळतच ठेवावा, तो विझू देऊ नये; याजकाने रोज सकाळी त्या अग्नीवर जळावू लाकडे ठेवून तो पेटत ठेवावा व त्याच्यावर शांत्यार्पणाच्या अर्पणातील चरबीचा होम करावा. |
13. | वेदीवरील अग्नी सतत जळत ठेवावा, तो विझू देऊ नये. |
14. | “अन्नार्पणाचा नियम असा आहे: अहरोनाच्या मुलांनी परमेश्वरासमोर वेदीपुढे ते आणावे; |
15. | याजकाने त्या अन्नार्पणातून मूठभर मैदा, थोडे तेल व सगळा धूप घ्यावा व त्याचा वेदीवर होम करावा; तो परमेश्वरासाठी स्मारक अर्पण होईल; त्याच्या सुवासाने परमेश्वराला संतोष होतो. |
16. | “त्यातून उरलेले, खमीर नसलेले हे अन्नार्पण अहरोन व त्याच्या मुलांनी दर्शनमंडपाच्या अंगणात पवित्र ठिकाणी बसून खावे. |
17. | ते खमीर घालून भाजू नये; माझ्या अर्पणातून याजकाचा वाटा म्हणून मी ते त्याना दिलेले आहे; पापार्पण व दोषार्पण ह्या सारखेच हेही परमपवित्र आहे. |
18. | ह्या अर्पणातून अहरोनाच्या संतानातील प्रत्येक पुरुष हे खाऊ शकतो परमेश्वराच्या अर्पणातून हा त्यांचा वाटा पिढ्यान्पिढ्या सतत चालू राहावा; ह्या अर्पणास स्पर्श झाल्याने ते पवित्र होतील. |
19. | परमेश्वर मोशेला म्हणाला, |
20. | “अहरोन व त्याच्या मुलांनी अहरोनाच्या अभिषेकाच्या दिवशी परमेश्वराला अर्पण आणावयाचे ते हे: आठ वाट्या म्हणजे एक दशांश एफा मैदा रोजच्या अर्पणाच्यावेळी आणावा, व त्यापैकी अर्धा सकाळी व अर्धा संध्याकाळी अर्पावा. |
21. | “तो तेलात चांगला मळावा आणि तव्यावर चांगला भाजल्यावर व तेलात परतल्यावर आत आणावा व परतलेल्या त्या अन्नार्पणाचे तुकडे करावेत; त्यांचा सुवास परमेश्वराला आनंद देईल. |
22. | “अहरोनाच्या मुलांपैकी त्याच्या जागी अभिषिक्त याजक म्हणून ज्याची निवड होईल त्यानेही असेच अर्पण आणावे. कायमचा विधी म्हणून ह्या अन्नार्पणाचा परमेश्वरासाठी पूर्णपणे होम करावा. |
23. | याजकाच्या प्रत्येक अन्नार्पणाचा संपूर्ण होम करावा; ते अन्नार्पण खाऊ नये.” |
24. | परमेश्वर मोशेले म्हणाला, |
25. | “अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना सांग की पापार्पणाचा विधि असा. ज्या ठिकाणी होमबलीचा वध करतात त्याच ठिकाणी परमेश्वरासमोर पापबलीचाही वध करावा; तो परमपवित्र आहे. |
26. | “जो याजक पापबली अर्पील त्याने तो दर्शनमंडपाच्या अंगणात पवित्र ठिकाणी खावा. |
27. | ज्या माणसाला किंवा वस्तूला त्या मांसाचा स्पर्श होईल तो माणूस किंवा ती वस्तू पवित्र होईल; “त्याचे रक्त जर कोणाच्या वस्त्रावर उडाले तर ते वस्त्र तू पवित्र स्थानीं धुवावे. |
28. | पापार्पणाचे मांस जर मडक्यात शिजवले असेल तर ते मडके फोडून टाकावे; पण ते जर पितळेच्या भांड्यात शिजवले असेल तर ते भांडे घासून पाण्याने धुवावे. |
29. | “याजकाच्या घराण्यातील प्रत्येक पुरुषाला पापार्पणाचे मांस खाण्याचा हक्क आहे; ते परम पवित्र आहे; |
30. | पण ज्या पापबलीचे थोडे रक्त दर्शनमंडपात पवित्र ठिकाणी प्रायश्चितासाठी आणले जाईल त्याचे मांस खाऊ नये; ते अग्नीत जाळावे.” |
← Leviticus (6/27) → |