← Lamentations (2/5) → |
1. | परमेश्वराने सियोनकन्येला कसे अभ्राच्छादित केले आहे पाहा! त्याने इस्राएलचे वौभन धुळीला मिळविले .कोपाच्या दिवशी, इस्राएल आपले पायाखालचे आसन आहे. ह्याची परमेश्वराने आठवण ठेवली नाही. |
2. | परमेश्वराने अजिबात दया न दाखविता याकोबच्या घरांचा नाश केला. संतापाच्या भरात त्याने यहूदाकन्येच्या गडांचा नाश केला. देवाने यहूदाचे राज्य व राज्यकर्ते धुळीला मिळविले. त्याने यहूदाच्या राज्याचा विध्वंस केला. |
3. | परमेश्वर रागावला आणि त्याने इस्राएलाची सर्व शक्ती नष्ट केली. शत्रू येताच त्याने आपला उजवा हात इस्राएलापासून काढून घेतला. सर्वत्र पेट घेणाऱ्या ज्वालेप्रमाणे तो याकोबमध्ये पेटला. |
4. | शत्रूप्रमाणे परमेश्वराने धनुष्याला बाण लावला. त्याने स्वत:ची तलवार उजव्या हातात धरली. यहूदाचा शत्रू असल्याप्रमाणे देवाने यहूदातील देखण्या पुरुषांना ठार केले. सियोनच्या तंबूवर परमेश्वराने आपला राग ओकला. |
5. | परमेश्वर शत्रूप्रमाणे वागला. त्याने इस्राएल गिळले. त्याने तेथील सर्व राजवाडे, गड गिळंकृत केली. यहूदाच्या कन्येमधे त्याने मृतासाठी खूप शोक आक्रंदन निर्माण केले. |
6. | बाग उपटून टाकावी, तसा परमेश्वराने आपला स्वत:चा तंबू उखडला. त्याची उपासना करण्यासाठी लोक जेथे जमत, ती जागा त्याने नष्ट केली. परमेश्वराने सण व शब्बाथ दिवस हग्रंचा विसर पाडला आहे. परमेश्वर रागावला व त्याने राजा व याजक यांना दूर लोटले. |
7. | परमेश्वर आपली वेदी व उपासनेचे पवित्रस्थान नापसंत केले. यरुशलेमच्या राजवाड्याच्या भिंती त्याने शत्रूला जमीनदोस्त करु दिल्या. परमेश्वराच्या मंदिरात शत्रूने जयघोष केला. पर्वणीचा दिवस असल्याप्रमाणे त्यांनी गोंगाट केला. |
8. | सियोनकन्येची तटबंदी नष्ट करण्याचा परमेश्वराने बेत केला. तट कोठे फोडायचा हे दाखविण्यासाठी ओळंब्याने त्याने खूण केली. नाश थांबविण्यासाठी त्यांने स्वत:ने काही केले नाही. म्हणून त्याने सर्व तटांना शोक करण्यास भाग पाडले. त्या सर्व ओस पडल्या. |
9. | यरुशलेमची द्वारे जमीनदोस्त झाली आहेत. परमेश्वराने द्वारांचे अडसर मोडूनतोडून नष्ट केले. तिचे राजे व राजपुत्र इतर राष्ट्रांत आहेत. तेथे त्यांना परमेश्वराविषयक शिकवण मिळत नाही. यरुशलेमच्या संदेष्ठ्यांनासुध्दा परमेश्वराकडून दृष्टान्त मिळत नाहीत. |
10. | सियोनेची वडिल धारी मंडळी अगदी मूकपणे धुळीत बसते. ते डोक्यात माती भरून घेतात. ते गोणपाटाचे कपडे घालतात. यरुशलेमच्या तरुणी दु:खाने मान खाली घालून बसतात. |
11. | रडून रडून माझे डोळे थकले आहेत. माझे अंत:करण अस्वस्थ झाले आहे. माझे हृदय जमिनीवर टाकल्याप्रमाणे तळमळत आहे. कारण माझ्या लोकांचा नाश झाला आहे. मुले आणि तान्ही मूर्छित पडत आहेत. सार्वजनिक चौकांत ती मूर्छित पडत आहेत. |
12. | ती मुले त्यांच्या आयांना म्हणतात, “भाकर आणि द्राक्षारस कोठे आहे?” मरतानाही ते हाच प्रश्न विचारतात, आणि आपल्या आईच्या मांडीवरच प्राण सोडतात |
13. | सियोनच्या कुमारी कन्ये, मी तुझी तुलना कोणाशी करू शकतो? कशाबरोबर मी तुझी तुलना करू हे सियोनच्या कुमारी कन्ये? मी तुझे सांत्वन कसे करू? तुझा नाश समुद्राप्रमाणे प्रचंड आहे. तुला कोणी बरे करु शकेल असे मला वाटत नाही. |
14. | तुझ्या संदेष्ट्यांनी तुझ्यासाठी दृष्टान्त पाहिले. पण त्यांचे दृष्टान्त म्हणजे निरर्थक व मुर्खपणाचे होते. तुझ्या पापाबद्दल त्यांनी उपदेश केला नाही. त्यांनी स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला नाही. पण त्यांनी खोटे संदेश देऊन तुला मूर्ख बनविले. |
15. | रस्त्यावरून जाणारे तुला पाहून हादरतात व हळहळतात. यरुशलेमच्या कन्येकडे बघून ते चुकचुकतात. ते विचारतात, “लोक जिला “सौंदर्यपूर्ण नगरी” अथवा “पृथ्वीवरचा आनंद म्हणतात, ती नगरी हीच का?”” |
16. | तुझे सर्व शत्रू तुला हसतात. ते तुझ्याकडे पाहून फूत्कार टाकतात आणि दातओठ खातात ते म्हणतात, “आम्ही त्यांना गिळले आहे. आम्ही खरोखरच ह्या दिवसाची वाट पाहात होतो. अखेर तो उजाडला.” |
17. | देवाने ठरविल्याप्रमाणे केले. तो जे करीन म्हणाला होता, तसेच त्याने केले. फार पूर्वी त्याने जी आज्ञा केली होती. ती त्याने पूर्ण केली. त्याने नाश केला व त्याला दया आली नाही. तुझ्याबाबतीत जे घडले, ते पाहून तुझ्या शत्रूंना आनंद झाला. हा आनंद त्यांना देवाने मिळवून दिला. देवाने तुझ्या शत्रूंना सामर्थ्यशाली बनविले. |
18. | मनापासून परमेश्वराचा धावा करा. सियोनकन्येच्या तटबंदी, तू रात्रंदिवस झऱ्याप्रमाणे अश्रू ढाळ, थांबू नकोस! तुझे डोळे कोरडे पडू देऊ नकोस. |
19. | ऊठ! रात्री आक्रोश कर. रात्रीच्या प्रत्येक प्रहराच्या आरंभाला रड. आपण पाणी ओततो. तसे मन मोकळे कर. परमेश्वरापुढे मन मोकळे कर. परमेश्वरापुढे हात जोड. तुज्या मुलांच्या प्राणरक्षणासाठी परमेश्वराजवळ प्रार्थना कर. कारण तुझी मुले उपासमारीने मूर्छित पडत आहेत. नगराच्या रस्त्या-रस्त्यावर ती बेशुध्द होऊन पडत आहेत. |
20. | परमेश्वरा, माझ्याकडे बघ! तू अशा रीतीने जिला वागविलेस ती कोण आहे ते तरी पाहा! मला तुला एक प्रश्न विचारू दे: स्त्रियांनी पोटच्या मुलांना, खावे काय? ज्या मुलांची त्यांनी काळजी काळजी घेतली त्यांना स्त्रियांनी खावे काय? परमेश्वराच्या मंदिरात धर्मगुरु व संदेष्टे मारले जावेत का? |
21. | नगरीच्या रस्त्यांवर तरुण तरुणी आणि वृध्द पडले आहेत. माझ्या तरुण तलवारीने मृत्यू पावल्या आहेत. परमेश्वरा, तू कोपलास त्या दिवशी, अजिबात दया न दाखविता तू त्यांना मारलेस! |
22. | तू माझ्या सर्व बाजूंनी दहशत निर्माण केलीस. मेजवानीला एखाद्याला आमंत्रण द्यावे त्याप्रमाणे तू दहशतीला आमंत्रण दिलेस. परमेश्वराच्या कोपाच्या दिवशी कोणीही सुटला नाही. मी ज्यांना जन्म दिला व ज्यांचे लालनपासन केले. त्यांना माझ्या शत्रूने ठार केले. |
← Lamentations (2/5) → |