← James (3/5) → |
1. | माझ्या बंधूंनो, तुमच्यापैकी पुष्कळजण शिक्षक होऊ पाहत नाहीत काय? तुम्हांला माहीत आहे की, जे आपण शिक्षक आहोत त्या आपला काटेकोरपणे न्याय होईल. |
2. | मी तुम्हाला सावध करीत आहे, कारण आपण पुष्कळ पापे करतो आणि जर कोणी त्याच्या बोलण्यात चुका करीत नाही तर तो परिपूर्ण मनुष्य आहे. |
3. | आपण घोड्यांच्या तोंडांना लगाम घालतो यासाठी की, त्यांनी आपल्या आज्ञा पाळाव्यात. आणि अशा प्रकारे आपण त्यांचे संपूर्ण शरीर नियंत्रणात ठेऊ शकतो. |
4. | किंवा जहाजाचे उदाहरण घ्या. जरी ते खूप मोठे असले व जोरदार वाऱ्यामुळे चालविले जाते तरी ते लहान सुकाणूद्वारे ताब्यात ठेवता येते व सुकाणूधर नावाड्याच्या इच्छेला येईल तिकडे नेता येते. |
5. | त्याचप्रकारे जीभ ही शरीराचा लहानसा भाग आहे, पण ती मोठमोठ्या गोष्टी केल्याची बढाई मारते. फक्त विचार करा, कितीतरी मोठे जंगल लहानशा आगीन पेट घेते! |
6. | होय, जीभ ही ज्वाला आहे. आपल्या शरीराच्या सर्व अवयवामध्ये वाईट गोष्टींची ती खाणच आहे. जीभ ही आपल्या सर्व शरीराला विटाळविणारी आहे. ती आपल्याला अपवित्र करते. आपल्या सर्व अस्तित्वालाच ती आग लावते. ती तरकाच्या ज्वालांनी जीवन पेटवते. |
7. | पशू, पक्षी, सरपटणारे जीवजंतु, साप आणि समुद्रातील निरनिरा या जातीचे जीव माणूस पाळू शकतो आणि प्रत्यक्षात त्याने तसे केले आहे. |
8. | पण कोणताही मनुष्य आपली जीभ ताब्यात ठेवू शकत नाही. ती फार चंचल, भयंकर, हिंस्र, दुराचारी आणि जहाल विषाने भरलेली असते. |
9. | आपला प्रभु आणि स्वर्गीय पिता याची स्तुति आपण आपल्या जिभेने करतो आणि जे मानव देवाच्या प्रतिमेचे बनविलेले आहेत, त्यांना जिभेने शापही देतो! |
10. | एकाच तोंडातून आशीर्वाद निघतात व शापही निघतात. माझ्या बंधूंनो, हे असे असू नये. |
11. | एकाच झऱ्यातून गोड व कडू पाणी येऊ शकत नाही. |
12. | माझ्या बंधूंनो, अंजिराच्या झाडाला जैतुनाची फळे येतील काय? किंवा द्राक्षवेलीला अंजिर लागतील काय? कधीच नाही. तसेच खारट पाण्याच्या झऱ्यातून गोड पाणी येऊ शकणार नाही. |
13. | तुमच्यामध्ये कोण शहाणा व ज्ञानाने भरलेला आहे? त्याने त्याचे शहाणपण त्याच्या चांगल्या वागणुकीने दाखवावे. नम्रतेने केल्या जाणाऱ्या कृतीद्वारे त्याने आपले शहाणपण दाखवावे. |
14. | पण जर तुमच्या ह्रदयात कटूरता, मत्सर व स्वार्थी उद्देश असतील तर तुम्ही तुमच्या शहाणपणाची फुशारकी मारू शकणार नाही. कारण तसे करणे म्हणजे खोटेपणाच्या आड सत्य लपविण्यासारखे आहे. |
15. | कारण अशा प्रकारचे शहाणपण वरून, स्वर्गातून आलेले नाही, तर ते पृथ्वीवरचे आहे. अधार्मिक आणि सैतानी आहे. |
16. | कारण जेथे मत्सर व स्वार्थी ध्येये आढळतात तेथे अव्यवस्थितपणा व सर्व प्रकारचे वाईट व्यवहारही आढळतात. |
17. | पण वरून लाभलेले शहाणपण मुळात शुद्ध, शातिदायक, समजूतदारपणाचे आणि मनमोकळे असून ते दयेचे व चांगली कामे यांना उत्तेजन देणारे असते. तसेच ते पक्षपात न करणारे व कळकळीचे असते. |
18. | जे लोक शांततेच्या मार्गाने शांति स्थापन करण्याचा प्रयत्न करतात त्यांना सरळ, नीतिपूर्ण वागण्यामुळे मिळणाऱ्या चांगल्या गोष्टींचा लाभ होतो. |
← James (3/5) → |