← Isaiah (40/66) → |
1. | तुमचा देव म्हणतो, “माझ्या लोकांचे सांत्वन करा, माझ्या लोकांचे सांत्वन करा. |
2. | यरूशलेमशी ममतेने बोला यरूशलेमला सांगा: ‘तुझ्या सेवेचा काळ संपला तुझ्या पापांची किंमत तू मोजली आहेस.”‘ परमेश्वराने यरूशलेमला शिक्षा केली. तिने केलेल्या प्रत्येक पापाकरिता दोनदा शिक्षा केली. |
3. | ऐका! कोणीतरी ओरडत आहे, “परमेश्वरासाठी वाळवंटातून मार्ग काढा. आमच्या देवासाठी वाळवंटात सपाट रस्ता तयार करा. |
4. | प्रत्येक दरी भरून काढा. प्रत्येक डोंगर आणि टेकडी सपाट करा. वेडेवाकडे रस्ते सरळ करा. खडकाळ जमीन गुळगुळीत करा. |
5. | मग देवाची प्रभा फाकेल आणि सर्व लोक एकत्रितपणे परमेश्वराचे तेज पाहतील. हो! स्वत: परमेश्वराने हे सर्व सांगितले आहे.” |
6. | एक आवाज आला, “बोल!” मग माणूस म्हणाला, “मी काय बोलू?” आवाज म्हणाला, हे बोल: “सर्व माणसे गवतासारखी आहेत. माणसाचा चांगुलपणा कोवळ्या गवताच्या पात्यासारखा आहे. |
7. | परमेश्वराकडून येणाऱ्या जोरदार वाऱ्याने हे गवत सुकते व मरते, सर्व माणसे गवतासारखी आहेत हेच सत्य आहे.” |
8. | “गवत सुकते आणि फुले कोमेजतात पण आमच्या देवाची वाणी सदासर्वकाळ राहते.” |
9. | सियोन, तुझ्याकडे सांगण्यासाठी एक सुर्वाता आहे. उंच डोंगरावर चढून जा आणि ही सुवार्ता ओरडून सांग. यरूशलेम, तुझ्यासाठी चांगली वार्ता आहे. घाबरू नकोस. मोठ्याने बोल. यहुदातील सर्व शहरांना ही वार्ता सांग, “हा पाहा तुमचा देव! |
10. | परमेश्वर, माझा प्रभू सर्व सामर्थ्यानिशी येत आहे लोकांवर अधिकार चालविण्यासाठी तो त्याचे सामर्थ्य वापरील तो आपल्या लोकांसाठी बक्षिस आणील. तो त्यांचा मोबदला चुकता करील. |
11. | ज्याप्रमाणे मेंढपाळ मेंढ्या वळवतो त्याप्रमाणे परमेश्वर आपल्या लोकांना वळवेल. परमेश्वर आपल्या हाताने (सामर्थ्याने) त्यांना एकत्र गोळा करील. तो लहान मेढ्यांना हातांत उचलून घेईल व त्या लहानग्यांच्या आया परमेश्वराच्या बाजूबाजूने चालतील. |
12. | आपल्या ओंजळीने समुद्राचे पाणी कोणी मोजले? आकाशाचे मोजमाप करण्यासाठी कोणी आपला हात वापरला? पृथ्वीवरची धूळ वाडग्याने कोणी मापली? डोंगर आणि टेकड्या तराजूने कोणी तोलल्या? हे सर्व करणारा परमेश्वर होता. |
13. | काय करावे हे कोणीही माणसाने परमेश्वराला सांगितले नाही. त्याने ज्या गोष्टी केल्या, त्या कशा कराव्या हे ही परमेश्वराला कोणी माणसाने सांगितले नाही. |
14. | परमेश्वराने कोणा माणसाची मदत मागितली का? कोणा माणसाने परमेश्वराला प्रामाणिकपणा शिकविला का? परमेश्वराला कोणा माणसाने ज्ञान दिले का? कोणी परमेश्वराला शहाणपण शिकविले का? नाही. या गोष्टी परमेश्वराला अगोदरच माहीत होत्या. |
15. | हे बघा! राष्ट्र हा परमेश्वराच्या सृष्टीचा फार सूक्ष्म अंश आहे. राष्ट्र हे बादलीतल्या पाण्याच्या एका थेंबाप्रमाणे आहे. जर परमेश्वराने सर्व राष्ट्रे गोळा करून त्याच्या तराजूच्या पारडयात टाकली तर ती धुळीच्या लहान लहान कणांप्रमाणे दिसतील. |
16. | परमेश्वरापुढे होम करायला लबानोनमधील सर्व झाडेही पुरणार नाहीत. आणि त्याच्यापुढे बळी देण्यासाठी तेथील सर्व प्राणी मारले तरी अपुरेच पडतील. |
17. | तुलनेने देवापुढे जगातील सर्व राष्ट्रे म्हणजे काहीच नाहीत. देवाच्या तुलनेत जगातील सर्व राष्ट्रांची किंमत शून्य आहे. |
18. | देवाची तुलना तुम्ही कशाशी करू शकता का? नाही. तुम्ही देवाचे चित्र काढू शकता का? नाही. |
19. | पण काहीजण लाकूड आणि दगड यांपासून मूर्ती तयार करतात आणि त्यांनाच देव मानतात. एक कारागीर मूर्ती तयार करतो. दुसरा तिला सोन्याने मढवतो आणि तिच्यासाठी चांदीच्या साखळ्या करतो. |
20. | पायासाठी तो न कुजणारे विशेष प्रकारचे लाकूड निवडतो. नंतर तो चांगला सुतार शोधतो आणि “देवाच्या” मूर्तीसाठी भक्कम पाया तयार करतो. |
21. | तुम्हाला सत्य नक्कीच माहीत आहे. नाही का? तुम्ही नक्कीच त्याबद्दल ऐकले आहे. फार पूर्वी नक्कीच कोणीतरी तुम्हाला ते सांगितले आहे. ही पृथ्वी कोणी निर्मिली हे तुम्ही जाणता. |
22. | परमेश्वरच खरा देव आहे तो पृथ्वीगोलावर स्थानापन्न होतो. त्याच्या तुलनेत लोक म्हणजे नाकतोडे आहेत. त्याने कापडाच्या गुंडाळीप्रमाणे आकाश उलगडून उघडले. आकाशाखाली बसण्यासाठी त्याने ते तंबूच्या कनातीप्रमाणे ताणले. |
23. | तो अधिपतींना निरूपयोगी करतो आणि जगातील न्यायाधीशांना पूर्णपणे कवडीमोल ठरवितो. |
24. | ते राजे (अधिपती) रोपट्यांप्रमाणे आहेत. जमिनीत लावल्यावर ती रूजायच्या आधीच देवाच्या जोरदार वाऱ्याने ती “रोपटी” सुकतात आणि मरतात व वारा त्यांना गवताच्या काडीप्रमाणे दूर उडवून देतो. |
25. | पवित्र देव म्हणतो, “तुम्ही माझी तुलना कोणाशी करू शकता का? नाही. कोणीही माझ्या बरोबरीचे नाही. |
26. | आकाशाकडे पाहा. हे तारे कोणी निर्मिले? ही आकाशातील ‘सेना’ कोणाची निर्मिती आहे. प्रत्येक ताऱ्याला त्याच्या नावाने कोण ओळखतो? खरा देव फार बलवान व सामर्थ्यवान आहे. म्हणून त्यातील एकही तारा हरवत नाही.” |
27. | याकोब, हे खरे आहे इस्राएल, तू ह्यावर विश्वास ठेवावा. मग तुम्ही “मी कसा जगतो हे परमेश्वराला दिसू शकत नाही. देव मला शोधून शिक्षा करणार नाही.” असे का म्हणता? |
28. | परमेश्वर देव फार सुज्ञ आहे, हे तुम्ही नक्कीच ऐकले आहे व तुम्हाला ते माहीतही आहे. देवाला ज्ञान असलेली प्रत्येक गोष्ट माणूस शिकू शकत नाही. परमेश्वर कधी दमत नाही, आणि त्याला विश्रांतीची गरज नाही. जगातील दूरदूरची स्थळे परमेश्वरानेच निर्मिली. परमेश्वर चिरंजीव आहे. |
29. | परमेश्वर दुबळ्यांना सबळ व्हायला मदत करतो. तो लोकांना शक्तीशिवाय सामर्थ्यवान होण्यास कारणीभूत होतो. |
30. | तरूण माणसे थकतात आणि त्यांना विश्रांतीची गरज वाटते. लहान मुलेसुध्दा अडखळतात आणि पडतात. |
31. | पण परमेश्वरावर विश्वास ठेवणारे, ज्याप्रमाणे गरूड पंख पसरून वर उडतात, त्याप्रमाणे पुन्हा सामर्थ्यशाली होतात. ही माणसे न दमता धावतात व न थकता चालतात. |
← Isaiah (40/66) → |