← Exodus (27/40) → |
1. | परमेश्वर मोशेला म्हणाला, “होमर्पणाकरता बाभळीच्या लाकडाची साडेसात फूट लांब, साडेसात फूट रुंद व साडे चार फूट उंच अशी चौरस वेदी तयार कर. |
2. | वेदीच्या चार कोपऱ्यांना प्रत्येकी एक अशी चार शिंगे बनवावी; प्रत्येक शिंग त्याच्या कोपऱ्यास जोडावे म्हणजे ते सर्व सलग व अखंड दिसेल; मग वेदी पितळेने मढवावी. |
3. | “वेदीवरील राख काढण्यासाठी लागणारी भांडी, फावडी, कटोरे, काटे व अग्नीपात्रे ही सर्व उपकरणे पितळेची बनवावी. |
4. | तिच्यासाठी पितळेच्या जाळीची एक चाळण बनवावी. |
5. | ही चाळण वेदीच्या कंगोऱ्याखालीं, वेदीच्या तळापासून अर्ध्या उंची इतकी येईल अशा अंतरावर लावावी. |
6. | “वेदीसाठी बाभळीच्या लाकडाचे दांडे करावेत व ते पितळेने मढवावेत. |
7. | ते वेदीच्या दोन्ही बाजूच्या कड्यांत घालावेत म्हणजे वेदी उचलून नेण्यासाठी त्यांचा उपयोग होईल. |
8. | वेदीच्या बाजूंना फव्व्या बसवाव्यात; पर्वतावर मी तुला दाखविल्याप्रमाणे ती तयार करावी. |
9. | “पवित्र निवास मंडपाला अंगण तयार कर; त्याच्या दक्षिणेला कातलेल्या तलम सणाच्या पडद्यांची पन्नास यार्ड (वार) लांबीची कनात बनवावी. |
10. | तिच्याकरिता वीस खांब करावेत व त्यांच्यासाठी पितळेच्या वीस बैठका बनावाव्यात; खांबाच्या आकड्या व पडद्याचे गज चांदीचे करावेत. |
11. | वेदीच्या उत्तर बाजूसही दक्षिण बाजूप्रमाणे पन्नास यार्ड (वार) लांबीची कनात, तिच्यासाठी वीस खांब, पितळेच्या वीस बैठका आणि चांदीच्या आकड्या व गज हे सर्व असावे. |
12. | “अंगणाच्या पश्चिम बाजूस पडद्यांची पंचवीस यार्ड (वार) लांबीची एक कनात असावी; तिला दहा खांब व खांबांना दहा खुर्च्या असाव्यात. |
13. | अंगणाची पूर्वेकडील म्हणजे प्रवेश द्वाराकडील बाजूही पंचवीस यार्ड (वार) असावी. |
14. | अंगणाच्या फाटकाच्या एका बाजूला साडे सात यार्ड (वार) लांबीची पडद्याची कनात असावी; ह्या बाजूस तीन खांब व तीन खुर्च्या असाव्यात; |
15. | फाटकाच्या दुसऱ्या बाजूलाही तेवढ्याच लांबीची पडद्याची कनात, व तिलाही तीन खांब व तीन खुर्च्या हे सर्व असावे. |
16. | “अंगणाच्या फाटकासाठी निळया, जांभळया व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा दहा यार्ड (वार) लांबीचा पडदा असावा व त्यावर नक्षीचे विणकाम असावे; पडद्यासाठी चार खांब व चार खुर्च्या असाव्यात. |
17. | अंगणाभोवतीचे सर्व खांब चांदीच्या बांधपट्टयांनी जोडलेले असावेत; त्यांच्या आकड्या चांदीच्या व खुर्च्या पितळेच्या असाव्यात. |
18. | अंगण पन्नास गज लांब व पंचवीस गज रुंद असावे; अंगणाभोवतीची पडद्याची कनात अडीच गज उंच असावी व ती कातलेल्या तनलम सणाच्या सुताची बनविलेली असावी; आणि तिच्या खांबाच्या खुर्च्या पितळेच्या असाव्यात. |
19. | पवित्र निवास मंडपातील सर्व उपकरणे, तंबूच्या मेखा आणि इतर वस्तू आणि अंगणाभोवतीच्या कनातीच्या मेखा पितळेच्या असाव्यात. |
20. | “इस्राएल लोकांनी दीपवृक्ष सतत जळत ठेवण्यासाठी जैतुनाचे उत्तम तेल रोज संध्याकाळी आणावे अशी तू त्यांना आज्ञा कर; |
21. | अहरोन व त्याची मुले यांनी दिवा जळत ठेवण्याची काळजी घ्यावी; अंतरपटातील पडद्यामागील आज्ञापटाच्या बाहेर असलेल्या दर्शन मंडपात त्यांनी जावे; आणि तो दीपवृक्ष संध्याकाळापासून सकाळपर्यंत परमेश्वरासमोर जळत ठेवण्याची खातरीने सोय करावी; हा इस्राएल लोकांसाठी व त्यांच्या वंशासाठी पिढ्यान्पिढ्या कायमचा विधी आहे; तो त्यांनी पाळलाच पाहिचे.” |
← Exodus (27/40) → |