← 1Kings (2/22) → |
1. | दावीद राजाचा मरणकाळ जवळ येऊन ठेपला होता. तेव्हा त्याने शलमोनाला जवळ बोलवून सांगितले, |
2. | “आता मी जाणार. मरण सगळ्यांनाच अटळ आहे. तूही आता चांगला खंबीर, जबाबदार पुरुष झाला आहेस. |
3. | आता परमेश्वर देवाच्या सर्व आज्ञांचे काळजीपूर्वक पालन कर. मोशेच्या नियमशास्त्रात लिहिलेल्या परमेश्वराच्या सर्व आज्ञा, नियम व निर्णय काटेकोरपणे पाळ. त्यामुळे तू जिथे जाशील तिथे, व जे कार्य हातात घेशील त्यात यशस्वी होशील. |
4. | तू परमेश्वराचे म्हणणे ऐकल्याने तो ही मला दिलेली वचने पाळील. परमेश्वराने मला सांगितले आहे ‘जर मी सांगितलेल्या मार्गाने मनपासून आणि प्रामाणिकपणाने तुझी मुले चालली तर इस्राएलचा राजा हा नेहमी तुझ्याच वंशातला असेल.”‘ |
5. | दावीद पुढे म्हणाला, “सरुवेचा मुलगा यवाब याने काय केले ते लक्षात आहे ना? त्याने इस्राएल सैन्याच्या दोन सेनापतींना, नेराचा मुलगा अबनेर आणि येथेरचा मुलगा अमासा यांना ठार केले आणि मुख्य म्हणजे हे शांततेच्या काळात केले. त्याचा तलवार खोचायचा कमरबंद आणि पायातले सैनिकी जोडे यांवर त्यांचे रक्त शिंपडले आहे. त्याला मीच शासन करायला हवे होते. |
6. | पण आता तू राजा आहेस. तेव्हा तुला योग्य वाटेल तसा तू त्यांना धडा शिकवू शकतोस. तो मारला जाईल याची तू खात्री करुन घे. त्याला शांततेने म्हातारपणी मरण येता कामा नये. |
7. | “गिलादच्या बर्जिल्ल्य याच्या मुलांवर लोभ असू दे. त्यांच्याशी सख्य ठेव आणि तुझ्या पंगतीला त्यांना बसू दे. तुझा भाऊ अबशलोम याच्यापासून मी पळ काढला तेव्हा त्यांनीच मला मदत केली. |
8. | “गेराचा मुलगा शिमी झकडे आसपासच आहे हे लक्षात ठेव. तो बहूरीम मधल्या बन्यामीन वंशातला आहे. मी महनाइमासला पळ काढला तेव्हा त्याने माझ्याविषयी फार वाईट उद्गार काढले. पुढे तो मला यार्देन नदीजवळ भेटायला आला. त्याला मी परमेश्वरासमक्ष वचन दिले की मी त्याला ठार करणार नाही. |
9. | पण आता त्याला तसा सोडू नकोस. तू सुज्ञ आहेस. काय करायचे ते तुला समजते. त्याला म्हातारपणी शांततेने मरु देऊ नकोस.” |
10. | मग दावीद मरण पावला. दावीद नगरात त्याचे दफन झाले. |
11. | हेब्रोनवर सात वर्ष आणि यरुशलेम येथे तेहतीस वर्ष असे एकंदर चाळीस वर्षे त्यांने इस्राएलवर राज्य केले. |
12. | आता शलमोन राजा होता. तो आपल्या वडीलांच्या दावीदाच्या सिंहासनावर बसला. त्याच्या राजेपणाविषयी आता कोणताही किंतु नव्हता. |
13. | यानंतर हग्गीथेचा मुलगा अदोनीया शलमोनाची आई बथशेबा हिच्याकडे गेला. बथशेबाने त्याला विचारले, “तू सद्हेतूने आला आहेस ना?” अदोनीया म्हणाला, “हो, ही शांतता भेट आहे. |
14. | मला तुमच्याशी काही बोलायचे आहे.” बथशेबा म्हणाली, “मग बोल.” |
15. | अदोनीया म्हणाला, “एक काळ असा होता की हे राज्य माझे होते. तुम्हाला हे माहीत आहे. मी राजा आहे अशीच इस्राएलच्या सर्व लोकांची भावना होती. पण पुढे सगळे बदलले. आता माझा भाऊ गादीवर आहे. परमेश्वरानेच त्याची निवड केली आहे. |
16. | आता माझे एक मागणे आहे. कृपा करुन नाही म्हणून नकोस.” बथशेबाने “तुला काय हवे?” असे विचारले. |
17. | अदोनीया म्हणाला, “राजा शलमोन तुला नाही म्हणणार नाही, तू सांगशील ते काहीही करील तेव्हा शुनेममधल्या त्या अबीशग नावाच्या तरुणीशी मला लग्र करायची संमती हवी आहे.” |
18. | बथशेबा म्हणाली, “ठीक आहे, मी राजाशी बोलते.” |
19. | मग बथशेबा राजा शलमोनाकडे गेली. तिला पाहिल्यावर तो उठून उभा राहिला. मग तिला वंदन करुन तो सिंहासनावर बसला. सेवकांना सांगून त्याने आईसाठी दुसरे सिंहासन आणवले. ती त्याच्या उजव्या हाताला बसली. |
20. | बथशेबा त्याला म्हणाली, “मला एक छोटीशी गोष्ट तुझ्याजवळ मागायची आहे. कृपाकरुन नाही म्हणून नकोस.” राजा म्हणाला, “आई, तुला काय हवे ते माग मी नकार देणार नाही.” |
21. | तेव्हा बथशेबा म्हणाली, “तुझा भाऊ अदोनीया याला शुनेमच्या अबीशगेशी लग्र करु दे.” |
22. | राजा शलमोन आपल्या आईला म्हणाला, “अदोनीयासाठी अबीशगेचीच मागणी कशाला करतेस? त्याच्यासाठी हे राज्यच का मागत नाहीस? बोलून चालून तो माझा मोठा भाऊ आहे. याजक अब्याथार आणि यवाब त्याला पाठिंबा देतीलच.” |
23. | मग परमेश्वराची शपथ घेऊन शलमोन म्हणाला, “अदोनीयाला मी याची अद्दल घडवीन. त्याला आता प्राणाला मुकावे लागेल. |
24. | इस्राएलचा राजा म्हणून परमेश्वराने माझी निवड केली आहे. माझ्या वडीलांच्या गादीवर त्याने मला बसवले आहे. आपण दिलेला शब्द पाळून राज्याची सत्ता परमेश्वराने आमच्या घराण्यात ठेवली आहे. तेव्हा आता त्याची शपथ घेऊन सांगतो की अदोनीयाला आज मृत्युदंड होईल.” |
25. | राजा शलमोनाने मग बनायाला आज्ञा दिली आणि बनायाने बाहेर जाऊन अदोनीयाला ठार केले. |
26. | मग राजा शलमोन अब्याथार याजकाला म्हणाला, “तुलाही मी मारायला हवे पण अनाथोथ येथल्या आपल्याघरी मी तुला जाऊ देतो. माझ्या वडीलांबरोबर मार्गक्रमण करताना परमेश्वराचा पवित्र करारकोश उचलून न्यायला तू मदत केलीस म्हणून तुला मी यावेळी जिवे मारत नाही. शिवाय त्यांच्या कठीण काळातही तू त्यांना साथ दिली आहेस” |
27. | परमेश्वराचा याजक म्हणून त्याला यापुढे काम करता येणार नाही असे शलमोनाने अब्याथार याजकाला सांगितले. असे होणार हे परमेश्वराने सांगितलेच होते. शिलो येथील याजक एली आणि त्याचे कुटुंब यांच्याविषयी देवाने असेच सांगितले होते. अब्याथार याजक एलीच्या कुटुंबातील होता. |
28. | हे सर्व यवाबाच्या कानावर गेल्यावर तो भयभीत झाला. त्याने अबशालोमला न देता अदोनीयाला पठिंबा दिला होता. म्हणून तो त्वरीत परमेश्वराच्या पवित्र मंडपात गेला आणि वेदीची शिंगे घटृ धरुन बसला. |
29. | कोणीतरी यवाब हा परमेश्वराच्या मंडपात वेदीपाशी आहे हे राजा शलमोनाला सांगितले. तेव्हा शलमोनाने बनायाला यवाबाला मारण्यासाठी पाठवले. |
30. | बनाया परमेश्वराच्या पवित्र मंडपात जाऊन यवाबाला म्हणाला, “तेथून बाहेर पड ही राजाची आज्ञा आहे.” पण यवाबाने तेथेच मरण पत्करायला तयार असल्याचे सांगितले. तेव्हा बनायाने राजाकडे जाऊन त्याला हे सांगितले. |
31. | तेव्हा राजाने बनायाला हुकुम केला, “तो म्हणतो तसे कर त्याला तिथेच ठार कर. मग त्याचे दफन कर. म्हणजे मग आमच्या घराण्यावरचा यवाबाचा कलंक पुसला जाईल. यवाबाने निरपराधांची हत्या केली तो हा कलंक होय. |
32. | नेराचा मुलगा अबनेर आणि येथेरचा मुलगा अमासा या आपल्यापेक्षा चांगल्या अशा दोन माणसांना त्याने मारले होते. अबनेर इस्राएल सैन्याचा सेनापती तर अमासा यहूदा सैन्याचा सेनापती होता. माझे वडील दावीद यांना त्यावेळी या हत्येची कल्पना नव्हती. तेव्हा परमेश्वरच यवाबाला त्याच्या कृत्यांबद्दल शासन करत आहे. |
33. | त्यांच्या हत्येबद्दल यवाब अपराधी आहे. त्याच्या कुटुंबालाही हे ओझे कायमचे वागवावे लागेल. पण दावीद, त्यांचे वंशज, त्याच्या घराण्यातील राजे आणि त्याचे राज्य यांना देवाच्या कृपेने निरंतर शांतता लाभेल.” |
34. | तेव्हा यहोयादाचा मुलगा बनाया याने यवाबाला ठार केले व वाळवंटातील त्याच्या घराजवळ त्याचे दफन करण्यात आले. |
35. | यवाबाच्या जागी मग शलमोनाने बनायाची सेनापती म्हणून नेमणूक केली आणि अब्याथारच्या जागी मुख्य याजक म्हणून सादोकची केली. |
36. | मग त्याने शिमीला बोलावणे पाठवले. त्याला सांगितले, “इथे यरुशलेममध्ये स्वत:साठी घर बांधून राहा. हे नगर सोडू नको. |
37. | हे नगर सोडून किद्रोन झऱ्यापलीकडे गेलास तर त्या गुन्ह्याबद्दल तुला जीव गमवावा लागेल. तो तुझा अपराध असेल.” |
38. | तेव्हा शिमी म्हणाला, “ठीक आहे, महाराज मी तुमच्या आज्ञेत आहे.” शिमी मग यरुशलेममध्येच बराच काळ राहिला. |
39. | पण तीन वर्षांनंतर शिमीचे दोन नोकर पळून गेले. गथचा राजा आणि माकाचा मुलगा आखीश याच्याकडे ते गेले. आपले चाकर गथ येथे असल्याचे शिमीला कळले. |
40. | तेव्हा त्याने आपल्या गाढवावर खोगीर चढवले आणि तो आखीश राजाकडे आपले नोकर शोधायला निघाला. तिथे ते मिळाल्यावर त्यांना त्याने परत घरी आणले. |
41. | शिमी यरुशलेमहून गथला जाऊन आल्याचे कोणीतरी शलमोनाला सांगितले. |
42. | तेव्हा शलमोनाने त्याला बोलावून घेतले. शलमोन त्याला म्हणाला, ‘यरुशलेम सोडलेस तर तुझा वध होईल हे मी तुला देवाची शपथ घेऊन सांगितले होते. तू हे गाव सोडून इतरत्र गेलास तर तुझ्या मृत्यूला तूच जबाबदार राहशील असे मी तुला बजावले होते. आणि तू त्याला कबूल झाला होतास. माझा शब्द पाळायचे तू मान्य केले होतेस. |
43. | मग तू आज्ञाभंग का केलास? तू वचन का मोडलेस? |
44. | माझे वडील दावीद यांचे तू बरेच अपराध केले आहेस त्याबद्दल आता परमेश्वरच तुला शासन करील. |
45. | पण मला परमेश्वराचे आशीर्वाद राहतील. दावीदाचे राज्य तो सदासर्वकाळ सुरक्षित ठेवील. |
46. | मग राजाने बनायाला शिमीचा वध करायची आज्ञा दिली आणि बनायाने ती अंमलात आणली. आता शलमोनाची आपल्या राज्यावर पूर्ण पकड बसली.” |
← 1Kings (2/22) → |