Zechariah (11/14)  

1. लबानोन, तू आपली दारे उघड म्हणजे अग्नी आत शिरुन तुझे गंधसरु जाळून टाकील.
2. गंधसरु उन्मळून पडले म्हणून देवदार आक्रोश करतील. ते प्रचंड वृक्ष दुसरीकडे नेले जातील. जंगलतोड पाहून बाशानचे अल्लोन वृक्ष आकांत करतील.
3. रडणाऱ्या मेंढपाळांचा आक्रोश ऐका. त्यांच्या बलवान पुढाऱ्यांना दूर नेले गेले. तरुण सिंहाच्या गर्जना ऐका. यार्देन नदीकाठची दाट झुडुपे काढून नेली.
4. परमेश्वर, माझा देव, म्हणतो, “मारण्यासाठी वाढविलेल्या मेंढ्यांची काळजी घ्या.
5. त्याचे पुढारी मालकांसारखे व व्यापाऱ्यांसारखे आहेत. मालकांनी मेंढ्या मारल्या. तरी त्यांना शिक्षा होत नाही. व्यापारी मेंढ्या विकतात आणि म्हणतात, “परमेश्वराचे स्तुतिस्तोत्र गा. मी श्रीमंत झालो.” मेंढपाळांना मेंढ्यांबद्दल वाईट वाटत नाही.
6. मला या देशात राहणाऱ्या लोकांबद्दल दु:ख होत नाही.” परमेश्वर असे म्हणाला, “पाहा! मी प्रत्येकाचा शेजाऱ्याकडून व राजाकडून छळ मांडीन आणि अशारीतीने त्यांच्या देशाचा नाश करवीन - मी त्यांना अडविणार नाही.”
7. म्हणून मी त्या बळी देण्यासाठी पोसलेल्या मेंढ्यांची काळजी घेतली. गरीब बिचाऱ्या मेंढ्या! मला दोन काठ्या मिळाल्या. एका काठीला मी नाव दिले कृपा व दुसरीला ऐक्य मग मी मेंढ्यांची निगा राखण्यास सुरवात केली.
8. एका महिन्यात मी तीन मेंढपाळांना कामावरुन काढून टाकले. मला मेंढ्यांचा राग आला व त्या माझा तिरस्कार करु लागल्या.
9. मग मी त्यांना म्हणालो, “मी जातो मी तुमचा सांभाळ करणार नाही. ज्यांना मरायचे आहे, त्यांना मी मरु देईन. ज्यांना नाश पावायचे आहे, त्यांचा नाश होऊ देईन यातून उरलेल्या एकमेकींचा नाश करतील.”
10. मग मी “कृपा नावाची काठी उचलली आणि मोडली. लोकांचा देवाशी झालेला करार मोडल्याचे मी यावरुन सूचित केले.
11. म्हणून त्या दिवसापासून करार संपुष्टात आला आणि माझ्याकडे निरखून पाहणाऱ्या त्या गरीब मेंढ्यांची खात्री पटली की हा परमेश्वराकडून आलेला संदेश होता.
12. मग मी म्हणालो, “तुमची इच्छा असल्यास माझा पगार द्या. इच्छा नसल्यास देऊ नका.” तेव्हा त्यांनी मला तीस चांदीची नाणी दिली.
13. तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, “त्यांच्यालेखी माझी किंमत एवढी आहे. एवढी मोठी रक्कम तू मंदिराच्या खजिन्यात फेकून दे.” मग मी तीस चांदीची नाणी परमेश्वराच्या मंदिराच्या पैशाच्या पेटीत टाकली.
14. मग मी ऐक्य नावाच्या काठीचे दोन तुकडे केले. यहूदा आणि इस्राएल यांच्यामधील ऐक्य संपल्याचे दाखविण्यासाठी मी असे केले.
15. मग परमेश्वर मला म्हणाला, “आता, मेंढ्या वळविण्यासाठी मूर्ख मेंढपाळ कदाचित वापरतील अशा वस्तू शोधून काढ.
16. ह्याचा अर्थ मी ह्या देशासाठी नवीन मेंढपाळ निवडीन असा होईल. पण ह्या तरुण माणसाला हरवलेल्या मेंढ्यांची काळजी घेणे जमणार नाही. त्याला जखमी मेंढ्यांचा औषघोपचार करुन त्यांच्या जखमा भरुन काढणे जमणार नाही. ज्या मेंढ्या वाचल्यात त्यांचा चारापाणी तो करु शकणार नाही. सशक्त मेंढ्या संपूर्ण खाल्ल्या जातील. फक्त त्यांचे खूर शिल्लक राहतील.”
17. हे माझ्या कुचकामी मेंढपाळा, तू माझ्या मेंढ्यांना टाकून गेलास! त्याला शिक्षा करा! त्याच्या उजव्या खांद्यावर व उजव्या डोळ्यावर तलवारीने वार करा. म्हणजे त्याचा उजवा खांदा निकामी होईल आणि तो उजव्या डोळ्याने अंधळा होईल.

  Zechariah (11/14)