Ruth (1/4)  

1. फारपूर्वी शास्त्यांच्या अमदानीत एकदा दुष्काळ पडला आणि अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली. तेव्हा अलीमलेख नावाचा गृहस्थ आपली बायको आणि दोन मुले यांच्यासह यहूदा बेथलेहेम सोडून मवाब या डोंगराळ प्रांतात राहायला आला.
2. त्याच्या बायकोचे नाव नामी आणि मुलांची नावे महलोन आणि खिल्योन अशी होती. हे लोक बेथलेहेम यहूदातील एफ्राथा कुळातील होते. मवाबात येऊन ते राहू लागले.
3. पुढे अलीमलेख वारला आणि त्याची बायको नामी व दोन मुले मागे राहिली.
4. नामीच्या मुलांनी मवाबातील दोन मुलींशी लग्ने केली. एकाच्या बायकोचे होते अर्पा आणि दुसरीचे नाव रूथ. जवळपास दहा वर्ष ते तिथे राहिले.
5. आणि महलोन व खिल्योन दोघेही मरण पावले.नामी तिचा नवरा आणि मुलं यांच्यावाचून एकटीच राहिली.
6. यहूदात आता दुष्काळ राहिलेला नाही परमेश्वर आपल्या लोकांच्या मदतीला धावून आला आहे, आणि त्याने त्यांना अन्न पुरवलेले आहे असे मवाबात नामीच्या कानालर आले. तेव्हा तिने घरी परत जायचे ठरवले तिच्या सुनाही तिच्याबरोबर जायला तयार झल्या.
7. तव्हा त्या ज्या ठिकाणी राहात होत्या ते ठिकाण सोडून त्या यहूदाला परत जायला निघाल्या.
8. तेव्हा नामीने आपल्या सुनांना सांगितले,” तुम्ही आपल्या माहेरी परत जा. मला आणि माझ्या मुलांना तुम्ही प्रेम दिलेत. तुम्ही जशा आमच्याशी दयाळू आणि प्रेमळ राहिलात तसाच परमेश्वर ही तुमच्याशी राहो.
9. परमेश्वर कृपेने तुम्हाला नवरा, सुखाचे घरदार मिळो” एवढे म्हणून नामीने त्यांचे चुंबन घेतले आणि तिघीना रडू कोसळले.
10. “आम्हाला तुमच्याबरोबर आणि तुमच्याच लोकात यायचे आहे” असे त्या दोघी नामीला म्हणू लागल्या.
11. पण नामी त्यांना म्हणाली,” नाही मुलींनो तुम्ही आपापल्या घरी जा. माझ्याबरोबर येऊन तरी काय फायदा? मी ही अशी. माझ्या पोटी आणखी मुलगे नाहीत.नाहीतर तुम्ही त्यांच्याशी लग्न केले असते.
12. तेव्ही तुम्ही परत गेलेले बरे. पुन्हा लग्न करायचेही माझे वय राहिले नाही आणि अजून माझे लग्न झाले तेरी त्याचा तुम्हाला काय उपयोग? मला अगदी या घटकेला दिवस राहून दोन मुले झाली तरी काय फायदा?
13. ते वाढून लग्नाचे होई पर्यंत तुम्हाला थांबावे लागेल. पतिप्राप्तीसाठी मी तुम्हाला एवढे थांबवून ठेवू शकत नाही. माझ्या मनाला त्यामुळे फार यातना होतील. आधीच मी खूप सोसले आहे.परमेश्वराने माझी खूप परीक्षा पाहिली आहे,
14. पुन्हा एकदा त्यांना रडू फुटले, मग अर्पाने चुंबन घेऊन नामीचा निरोप घेतला. पण रूथ मात्र तिला बिलगली.
15. नामी तिला म्हणाली,” तुझी जाऊ बघ कशी आपल्या लोकांत,आपल्या देवाकडे गेली, तूही तसेच केले पाहिजेस,.
16. पण रूथ हटून बसली आणि म्हणाली,”तुम्हाला सोडून जायची माझ्यावर जबरदस्ती करू नका. मला माहेरी जायला लावू नका.मी तुमच्याबरोबर येईन. जिथे तुम्ही जाल तिथे मी येईन. जिथे तुम्ही पथारी टाकाल तिथेच मीही पडेन. तुमचे लोक ते माझे लोक. तुमचा देव तो माझा देव.
17. तुम्ही जिथे मराल, तिथेच मी ही मरेन. जिथे तुम्हाला तिथेच मला पुरावे. हा शब्द मी पाळला नाही तर परमेश्वराने मला खूशाल शिक्षा करावी. आता आपली ताटातूट फक्त मरणानेच.”
18. रूथचा आपल्या बरोबरच यायचा निधोर आहे हे पाहिल्यावर नामीने तिचे मन वळवायचा प्रयत्न सोडून दिला.
19. त्या दोघी मजल दरमजल करत बेथलेहेमपर्यंत आल्या. त्यांना पाहून लोकांना एकदम भरून आले. “ही नामी की काय” असे ते म्हणू लागले.
20. पण नामी म्हणाली, “मला नामी (आनंदी) का म्हणता? ‘मारा’(म्हणजे कष्टी दु:खी)म्हणा. सर्वशक्तिमान देवाने मला फार दु:ख दिले आहे.
21. “येथून मी गेले तेव्हा सर्व काही माझ्याकडे पुष्कळ होते.आता परमेश्वराने मला रिकाम्या हाताने परत आणले आहे. परमेश्वरानेच मला दु:खी केले. तेव्हा मला ‘आनंदी’ कशाला म्हणता? सर्वशक्तिमान देवाने मला फार वाईट दिवस दाखवले.”
22. अशा प्रकारे सातूच्या पिकाच्या हंगामाच्या सुरूवातीला नामी आणि तिची मवाबातील सून रूथ या दोघी मवाबातून बेथलेहेम यहूदा येथे परतल्या.

      Ruth (1/4)