Romans (8/16)  

1. म्हणून आता जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत त्यांना शिक्षा नाही.
2. कारण आत्म्याचा जो नियम ख्रिस्त येशूमध्ये जीवन देतो त्याने पापाचा नियम जो तुम्हांला मरणाकडे नेतो त्यापासून मुक्त केले आहे.
3. नियमशास्त्र समर्थ आहे पण आपण दूर्बळ आहोत त्यामुळे वाचु शकत नाही, देवाने आपल्या पुत्राला पापी देहाच्या प्रतिरुपाने व पापाकरिता पाठवून ख्रिस्ताच्या देहामध्ये पापाला न्यायदंड ठरविला.
4. यासाठी की, नीतिच्या व आवश्यक गोष्टी आपण जे देहाच्या पापमय स्वभावाप्रमाणे नव्हे तर आत्म्याप्रमाणे चालतो, त्या आमच्याद्वारे पूर्ण व्हाव्यात.
5. कारण जे त्यांच्या मानवी पापी देहाप्रमाणे जगतात ते देहाच्या गोष्टींचा विचार करतात, परंतु जे आत्म्याने चालतात व ज्यांचे मन आत्म्याच्या गोष्टींकडे लागलेले असते ते त्याप्रमाणे जीवन जगतात.
6. देहाचे चिंतन हे मरण आहे. पण आत्म्याचे मनन हे जीवन आणि शांति आहे.
7. मानवी स्वभावाचे अधिकार असलेले पापी मन म्हणजे देवाबरोबर वैर आहे. कारण ते देवाच्या नियमाच्या आधीन होत नाही, व त्याला आधीन होताही येत नाही.
8. कारण जे देहस्वभावाच्या आधीन आहेत त्यांना देवाला प्रसन्र करता येत नाही.
9. देवाचा आत्मा तुम्हांमध्ये राहतो, तर तुम्ही देहाचे नसून आत्म्याचे आहात. परंतु जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा नसेल तर तो ख्रिस्ताचा नाही.
10. उलट जर ख्रिस्त तुम्हांमध्ये आहे व तुमचा देह पापामुळे मेला आहे तरी नीतिमत्वामुळे तुमच्या आत्म्याच जीवन आहे.
11. आणि ज्या आत्म्याने येशूला मरणातून उठविले तो त्याचा आत्मा तुम्हांमध्ये राहतो त्या तुमच्या मर्त्य शरीराला जीवन देईल.
12. तर मग बंधूनो, आम्ही कर्जदार आहोत, देहाप्रमाणे जगण्यास देहाचे नव्हे.
13. कारण जर तुम्ही तुमच्या पापी देहस्वभावाप्रमाणे जीवन जगाल तर तुम्ही मरणार आहात, परंतु आत्म्याच्या करवी जर तुम्ही देहाची कर्मे ठार माराल तर तुम्ही जगाल.
14. कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवितो, तितके देवाची मुले आहेत.
15. पुन्हा भीति वाटू नये म्हणून तुम्हांला गुलामगिरीचा आत्मा मिळाला नाही, तर तुम्हांला दतकपणाचा आत्मा मिळाला आहे. त्याच्यायोगे आम्ही “अब्बा, बापा” अशी हाक मारतो.
16. तो आत्मा स्वत: आपल्याबरोबर दुजोरा देतो की, आपण देवाची मुले आहोत.
17. आपण जर देवाची मुले आहोत तर आम्ही वारसही आहोत आणि ख्रिस्ताबरोबर वारस आहोत. खरोखर आपण त्याच्याबरोबर दु:ख भोगतो यासाठी की, त्याच्याबरोबर आपणांस गौरवही मिळावे.
18. कारण भविष्यकाळात आपल्याला प्रगट करण्यात येणाऱ्या गौरवाच्या तुलनेने सध्याच्या काळातील दु:खे काहीच नाहीत असे मी मानतो.
19. कारण निर्माण केलेले जग पुत्राच्या प्रगट होण्याच्या काळाची वाट पाहत आहे.
20. निर्माण केलेले जग सर्व स्वाधीन होते ते इच्छेने नव्हे तर देवाने ते अधीन ठेवले होते म्हणून,
21. या आशेने की, निर्माण केलेले जग त्याच्या अशुद्धतेच्या गुलामगिरीतून मुक्त व्हावे, व देवाच्या मुलांचे वैभवी गौरव त्याने उपभोगावे.
22. कारण आपल्याला माहीत आहे की, आजपर्यंत, निर्माण केलेले संपूर्ण जग कण्हत, वेदना भोगीत आहे.
23. परंतु निर्माण केलेले जगच नव्हे तर आपणांस ज्यांना आत्म्याचे प्रथम फळही मिळाले आहे ते, आपणही संपूर्ण दत्तकपणासाठी आपल्या शरीराच्या नाशवंत, मर्त्य स्वभावापासून मुक्ती व्हावी म्हणून आतल्याआत कण्हत आहोत.
24. आपण आपल्या मनातील या आशेने तारले गेलो आहोत. परंतु आपण ज्याची आशा धरली ते पाहू शकलो तर ही आशा नसेल. कारण जे पाहतो त्याची आशा कोण धरील?
25. परंतु जर आपण जे पाहत नाही त्याची आशा धरतो तर आपण धीराने त्याची वाट पाहतो.
26. जेव्हा आपण कण्हतो तेव्हा आत्माही आपल्या अशक्तपणात आपणांस मदत करतो. कारण कशासाठी आपण प्रार्थना करावी, हे आपणांस माहीतसुद्धा नसते. परंतु आत्मा स्वत: आपणांसाठी शब्दांनी जे व्यक्त करता येत नाही, अशा कण्हण्याने मध्यस्थी करतो.
27. परंतु जो देव आपली अंत:करणे शोधतो त्याला आत्म्याचा हेतू काय आहे हे माहीत आहे. कारण देवाच्या इच्छेने आत्मा संताच्या वतीने मध्यस्थी करतो.
28. आणि आपणास माहीत आहे की, प्रत्येक गोष्टीत हेतूप्रमाणे आत्मा जे देवावर प्रेम करतात व त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेले असतात त्यांच्यासह जे चांगले आहे ते करण्याचे काम करतो.
29. ज्यांना देवाने अगोदरच निवडले होते त्यांना त्याच्या पुत्राच्या सारखे व्हावे म्हणून नेमले होते. यासाठी की देवाचा पुत्र पुष्कळ बंधूंमध्ये ज्येष्ठ व्हावा.
30. देवाने ज्यांना अगोदरच नेमले होते, ज्यांना बोलाविले होते त्यांना नीतिमान केले आणि ज्यांना नीतिमान केले त्यांना गौरवसुद्धा दिले.
31. यावरुन आपण काय म्हणावे? देव जर आपल्या बाजूचा आहे तर आपल्या विरुद्ध कोण?
32. ज्याने आपल्या पुत्राला राखून ठेवले नाही, परंतु आपणा सर्वांसाठी मरण्यासाठी दिले तो आपणांला पुत्रासह सर्व काही देणार नाही काय?
33. देवाच्या निवडलेल्या लोकांवर आरोप कोण ठेवील? देव हाच एक त्यांना निरपराध ठरवितो.
34. दोषी ठरवितो तो कोण? जो मेला आणि याहीपेक्षा अधिक महत्तवाचे म्हणजे जो उठविला गेला व देवाच्या उजवीकडे बसला आहे, जो आपल्या वतीने मध्यस्थी करतो तो ख्रिस्त येशू आहे.
35. ख्रिस्ताच्या प्रेमापासून आपणांस कोण वेगळे करील? त्रास, कष्ट, छळ, भूक, नग्नता, संकटे किंवा तलवारीने वध हे वेगळे करतील काय?
36. असे लिहिले आहे की, “दिवसभर आम्ही तुझ्यामुळे वधले जात आहोत. आम्हांला कापायला नेत असलेल्या मेंढराप्रमाणे समजतात.” स्तोत्र. 44:22
37. तरी या सर्व गोष्टींमध्ये आम्ही ज्याने आम्हांवर प्रीति केली त्याच्याद्वारे अत्यंत वैभवी जय मिळवीत आहोत.
38. कारण माझी खात्री आहे की, मरण किंवा जीवन, देवदूत, अधिकारी आत्मे हल्लीच्या किंवा भविष्यकाळात,
39. येशूचे सामर्थ्य, उंच किंवा खाली, जगात निर्माण केलेली कुठलीही गोष्ट आपणांस देवाचे प्रेम जे ख्रिस्तामध्ये आढळते त्यापासून वेगळे करु शकणार नाही.

  Romans (8/16)