Romans (12/16)  

1. म्हणून बंधूनो, देवाच्या दयेमुळे मी तुम्हांला विनवितो की, तुमची शरीरे देवाला संतोष देणारा जिवंत यज्ञ अशी अर्पण करा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे.
2. आणि यापुढे या जगाच्या आदर्शाप्रमाणे आचरण करु नका, त्याऐवजी तुमच्या मनाच्या नवीनपणामुळे तुमचा बदल होऊ द्या. यासाठी की देवाची पूर्ण आणि त्याला आनंद देणारी उत्तम इच्छा काय आहे हे तुम्हांला कळावे व तिचा तुम्ही स्वीकार करावा.
3. मला देण्यात आलेल्या कृपादानाच्या दृष्टीने मी तुम्हांतील प्रत्येकाला सांगतो की, विचार करण्यास योग्य आहे त्या आपल्या योग्यतेपेक्षा आपणांला अधिक श्रेष्ठ मानू नका. तर देवाने सोपवून दिलेल्या परिमाणाप्रमाणे समंजस असा जो मार्ग त्या दृष्टीने विचार करा.
4. कारण एका शरीरात आपले अनेक अवयव आहेत तरी सर्व अवयवांचे कार्य एकच नसते.
5. त्याचप्रमाणे, आपण पुष्कळ अंग असून ख्रिस्तामध्ये एक शरीर व एकमेकांचे अवयव आहोत.
6. देवाने दाखविलेल्या दयेनुसार आपणांस निरनिराळी दाने आहेत, जर कोणाला देवाचा संदेश देण्याचे दान आहे तर त्याने ते आपल्या विश्वासाच्या प्रमाणाने उपयोगात आणावे.
7. जर कोणाला सेवेचे दान असेल तर त्याने सेवेला वाहून घ्यावे, कोणाला शिक्षणाचे दान असेल तर त्याने शिक्षणाला वाहून घ्यावे.
8. कोणाला बोध करण्याचे दान असेल तर त्याने बोध करण्यास वाहून घ्यावे. ज्याला दानधर्म देण्याचे दान असेल त्याने ते सद्हेतूने द्यावे. ज्याला अधिकाराचे दान असेल त्याने दक्षतेने ते काम करावे ज्याला देयेचे दान असेल त्याने आनंदाने दया करावी.
9. तुमची प्रीति प्रामाणिक असावी. जे वाईट त्याचा द्वेष करा व बऱ्याला चिकटून राहा.
10. बंधूप्रेमाच्याबाबतीत एकमेकांशी ममतेने वागा, आदराच्या बाबतीत स्वत:पेक्षा इतरांचा बहुमान करा.
11. आस्थेविषयी आळशी होऊ नका. आत्म्यात उत्सुक असा. प्रभूची सेवा करा.
12. आपल्या घरात आनंदी राहा. संकटात सहनशील राहा. चिकाठीने प्रार्थना करा.
13. पवित्र जनांच्या गरजा भागवा. आदरातिथ्य करण्यात तत्पर असा.
14. जे तुमचा छळ करतात त्यांना आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या. शाप देऊ नका.
15. जे आनंद करतात त्यांच्याबरोबर आनंद करा. रडणाऱ्यांबररोबर रडा.
16. एकमेकांबरोबर ऐक्याने रहा, गर्व करु नका. त्याऐवजी नम्र लोकांच्या सहवासात रहा. स्वत:स शहाणे समजू नका.
17. कोणाचीही वाईटाबद्दल वाईट अशी फेड करुन नका. सर्व लोकांच्या दृष्टीने चांगले ते करण्याचा प्रयत्न करा.
18. शक्य असेल तर ते तुमच्यावर अवलंबून असल्याने सर्व लोकांबरोबर शांतीने राहा.
19. प्रिय बंधूंनो, सूड उगवू नका, देवाच्या रागाला वाट द्या. असे लिहिले आहे, “सूड घेणे माझ्याकडे आहे. मी फेड करीन असे प्रभु म्हणतो.’
20. “तुमचा शत्रू भुकेला असल्यास त्यास खावयास द्या, तहानेला असेल तर प्यावयास द्या. कारण असे केल्याने तुम्ही त्याच्या डोक्यावर निखाऱ्यांची रास कराल.” वाइटाने जिंकले जाऊ नका तर चांगल्याने वाइटास जिंका.

  Romans (12/16)