← Proverbs (7/31) → |
1. | मुला, माझे शब्द लक्षात ठेव. मी देतो त्या आज्ञा विसरु नकोस. |
2. | माझ्या आज्ञा पाळ म्हणजे तुला जीवन मिळेल. माझ्या शिकवणुकीला तुझ्या आयुष्यातली एक महत्वाची गोष्ट बनव. |
3. | माझ्या आज्ञा आणि माझी शिकवण सदैव तुझ्याजवळ राहू दे. त्यांना तुझ्या बोटांभोवती बांध. तुझ्या हृदयावर ते कोरुन ठेव. |
4. | शहाणपणाला बहिणीसारखे वागव. समजुतदारपणाला तुझ्या कुटुंबाचाच एक घटक बनव. |
5. | नंतर ते तुझा दुसऱ्या स्त्रीपासून बचाव करतील. ते तुला तिच्या पापाकडे नेणाऱ्या गोड शब्दांपासून वाचवतील. |
6. | एक दिवस मी माझ्या खिडकीतून पाहिले आणि मला |
7. | बरेच मूर्ख तरुण दिसले. मला एक तरुण दिसला जो खूपच मूर्ख होता. |
8. | त्याने वाईट स्त्रीच्या घराचा रस्ता धरला. त्याला भेटण्यासाठी ती घरातून बाहेर आली. |
9. | तेव्हा अंधार होत होता - सूर्य मावळत होता व रात्र पडायला सुरुवात झाली होती. |
10. | ती स्त्री त्याला भेटायला घरातून बाहेर आली. तिने वेश्येसारखा पोशाख केला होता. तिने त्याच्याबरोबर पाप करायचे ठरवले. |
11. | तिला पापाची पर्वा नव्हती. तिला चांगल्या वाईटाची पर्वा नव्हती. ती कधीच घरी राहात नसे. |
12. | ती नेहमी रस्त्यातून हिंडे. ती संकटांना बोलावत सर्वत्र हिंडे. |
13. | तिने त्या तरुणाला पकडले आणि त्याचे चुंबन घेतले. लाज न वाटता ती म्हणाली, |
14. | “आज मी (शांत्यर्पणाची) मेजवानी दिली. मी जे द्यायचे वचन दिले होते ते सर्व मी दिले आणि अजूनही माझ्याकडे खूप अन्न उरले आहे. |
15. | म्हणून मी तुला माझ्याकडे येण्याचे आमंत्रण देण्यासाठी बाहेर आले. मी तुलाच शोधत होते. आणि आता तू मला सापडलास. |
16. | मी माझ्या अंथरुणावर स्वच्छ चादर टाकली आहे. त्या मिसर देशातल्या सुंदर चादरी आहेत. |
17. | मी माझ्या अंथरुणावर अत्तर शिंपडले आहे. मी बोळ, अगरु आणि दालचिनीचा वापर केला आहे. |
18. | चल, आपण सकाळ होईपर्यंत प्रेम करु या. आपण रात्रभर उपभोग घेऊ. |
19. | माझा नवरा दूर गेला आहे. तो व्यवसायासाठी बाहेरगावी गेला आहे. |
20. | त्याने दूरच्या प्रवासासाठी पुरेसे पैसे बरोबर घेतले आहेत. तो दोन आठवडे घरी येणार नाही.” |
21. | त्या बाईने त्या तरुणाला भुलविण्यासाठी हे शब्द वापरले. तिच्या गोड बोलण्याला तो भुलला. |
22. | आणि तो तरुण तिच्या मागोमाग जाळ्यात गेला. तो कत्तलखान्यात नेल्या जाणाऱ्या बैलाप्रमाणे होता. शिकारी ज्याच्या हृदयात बाण सोडायला. |
23. | तयार आहेत अशा हरिणाप्रमाणे तो होता. तो ज्या संकटात होता ते त्याला कळले नाही. |
24. | मुलांनो आता माझे ऐका. माझ्या शब्दांकडे लक्ष द्या. |
25. | दुष्ट स्त्रीला तुमचा कब्जा घेऊ देऊ नका. तिच्या मार्गावरुन जाऊ नका. |
26. | तिने खूप माणसांना पाडले आहे. तिने खूप जणांचा नाश केला आहे. |
27. | तिचे घर म्हणजे मृत्यूचा सापळा आहे. तिचा मार्ग सरळ मरणातच जातो. |
← Proverbs (7/31) → |