Proverbs (27/31)  

1. भविष्यात काय घडेल याबद्दलच्या फुशारक्या मारु नका. उद्या काय घडेल ते तुम्हाला माहीत नसते.
2. स्वत:चीच स्तुती कधीही करु नका. ती दुसऱ्यांना करु द्या.
3. दगड खूप वजनदार असतो आणि वाळू वाहून न्यायला कठीण असते. पण मूर्खांनी आणलेली संकटे सहन करणे या दोन्ही पेक्षा कठीण असते.
4. राग क्रूर आणि नीच असतो त्यामुळे सर्वनाश होतो. पण मत्सर त्याहीपेक्षा वाईट असतो.
5. उघड टीका ही गुप्त प्रेमापेक्षा चांगली असते.
6. मित्र तुम्हाला कधीतरी दु:ख देईल पण त्याची तसे करायची इच्छा नसते. शत्रू वेगळा असतो. शत्रू जरी तुमच्याशी कधी दयाबुध्दीने वागला तरी त्याला तुम्हाला दु:ख द्यायचीच इच्छा असते.
7. तुम्हाला जर भूक नसेल तर तुम्ही मधदेखील खाणार नाही. पण जर तुम्ही भुकेले असाल तर तुम्ही काहीही खाल. ते चवीला वाईट असले तरीही.
8. घरापासून दूर असलेला माणूस म्हणजे घरट्यापासून दूर असलेला पक्षी.
9. अत्तर आणि गोड वास असलेल्या वस्तू तुम्हाला आनंद देतात. पण संकटे तुमच्या मनाची शांती घालवतात.
10. तुमच्या आणि तुमच्या वडिलांच्या मित्रांना विसरु नका. आणि तुम्ही संकटात असाल तर मदतीसाठी दूरच्या तुमच्या भावाच्या घरी जाऊ नका. जवळच्या शेजाऱ्याला विचारणे हे दूरवरच्या तुमच्या भावाकडे जाण्यापेक्षा चांगले असते.
11. मुला शहाणा हो. त्यामुळे मला आनंद वाटेल. नंतर जो कुणी माझ्यावर टीका करेल त्याला मी उत्तर देऊ शकेन.
12. शहाण्या लोकांना संकटांचा सुगावा लागला आणि ते त्यांच्या मार्गांतून बाजूला होतात. पण मूर्ख सरळ संकटात जातात आणि त्यामुळे दु:खी होतात.
13. जर तुम्ही दुसऱ्याच्या कर्जाबद्दल स्वत: जामीन राहिलात तर तुम्हाला तुमचे कपडेदेखील गमवावे लागतील.
14. “सुप्रभात” च्या आरोळीने तुमच्या शेजाऱ्याला भल्या पहाटे उठवू नका. तो त्याला आशीर्वादाऐवजी शाप समजेल.
15. सतत वाद घालण्याची इच्छी धरणारी बायको पावसाळ्याच्या दिवसात सतत गळणाऱ्या दिवसात सतत गळणाऱ्या पाण्यासारखी असते.
16. त्या बाईला थांबवणे हे वाऱ्याला थांबवण्यासारखे आहे. हाताने तेल पकडण्यासारखे असते.
17. लोखंडाच्या सुरीला धार करण्यासाठी लोखंडाचेच तुकडे वापरतात. त्याचप्रमाणे लोक एकमेकांना धारदार बनविणे एकमेकापासूनच शिकतात.
18. जो माणूस अंजिराच्या झाडाची निगा राखतो तो त्याची फळे खाऊ शकतो. तसेच जो माणूस त्याच्या धन्याची काळजी घेतो त्याला बक्षीस मिळते. त्याचा मालक त्याची काळजी घेईल.
19. माणसाने पाण्यात पाहिले तर त्याला स्वत:चा चेहरा दिसेल. त्याचप्रमाणे माणसाचे हृदय तो माणूस खरा कसा आहे ते दाखविते.
20. मृतलोक आणि नाश ह्यांची कधीही तृप्ती होत नाही. त्याचप्रमाणे माणसाच्या डोळ्यांतील वासना कधी शमत नाही.
21. सोने आणि चांदी शुध्द करण्यासाठी लोक अग्नीचा वापर करतात. त्याच रीतीने माणसाची परीक्षा लोक त्याची स्तुती करतात त्यावरुन होते.
22. मूर्खाला दळून तुम्ही त्याचे पीठ केले तरी त्याचा मूर्खपणा तुम्ही घालवू शकणार नाही.
23. तुमच्या मेंढ्यांची आणि पशुधनाची काळजी घ्या. त्यांची तुम्ही उत्तम प्रकारे निगा राखत आहात याची खात्री करा.
24. संपत्ती कायम टिकत नाही. राष्ट्रेसुध्दा कायम राहात नसतात.
25. गवत कापल्यानंतर पुन्हा नवीन उगवते. टेकडीवर उगवणारे गवत कापा.
26. तुमच्या मेंढ्यांवरची लोकर कापा आणि तुमचे कपडे करा. तुमच्या काही बकऱ्या विका आणि जमीन विकत घ्या.
27. तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी शेळीचे बरेच दूध असेल. त्यामुळे तुमच्या सेवकमुली निरोगी राहतील.

  Proverbs (27/31)