← Proverbs (16/31) → |
1. | लोक त्यांच्या योजना तयार करतात. पण परमेश्वरच त्या योजना प्रत्यक्षात आणतो. |
2. | माणसाला तो जे करतो ते बरोबर आहे असे वाटते. पण माणसाने केलेल्या गोष्टी मागच्या खऱ्या कारणांचा न्यायनिवाडा परमेश्वरच करतो. |
3. | तुम्ही जे जे करता त्या सगळ्याच्या मदतीसाठी परमेश्वराकडे वळा म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल. |
4. | परमेश्वराकडे सगळ्यासाठी योजना आहेत. आणि परमेश्वराच्या योजनेत दुष्ट माणसांचा नाश होईल. |
5. | जो माणूस आपण इतरांपेक्षा चांगले आहोत, असा विचार करतो त्याचा परमेश्वर तिरस्कार करतो. परमेश्वर त्या सर्व गर्विष्ठ लोकांना नक्कीच शिक्षा करील. |
6. | खरे प्रेम आणि इमानदारी तुम्हाला शुध्द करील. परमेश्वराचा आदर करा म्हणजे तुम्ही वाईटापासून खूप दूर राहाल. |
7. | जर एखादा माणूस चांगले आयुष्य जगत असेल, परमेश्वराला खुष करत असेल तर त्या माणसाचे शत्रूदेखील त्याच्याबरोबर शांतता राखतील. |
8. | योग्य मार्गाने थोडेसे मिळवणे हे फसवणूक करुन खूप मिळवण्यापेक्षा चांगले आहे. |
9. | माणूस त्याला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्याबद्दलच्या योजना करु शकतो. पण काय घडेल ते मात्र परमेश्वरच ठरवतो. |
10. | राजा बोलतो तेव्हा त्याचे म्हणजे कायदा असतो. त्याचे निर्णय नेहमी योग्य असायला हवेत |
11. | परमेश्वराला सर्व काटे आणि तराजू योग्य असायला हवे असतात. त्याला सर्व व्यापारातील करार न्यायी असायला हवे असतात. |
12. | राजे लोक वाईट गोष्टी करणाऱ्यांचा तिरस्कार करतात. चांगुलपणा त्याच्या राज्याला मजबूत करील. |
13. | राजाला सत्य ऐकायचे असते. राजांना खोटे ने बोलणारे लोक आवडतात. |
14. | जेव्हा राजा रागावतो तेव्हा तो कुणालाही ठार मारु शकतो. आणि शहाणा माणूस राजाला आनंदी ठेवायचा प्रयत्न करतो. |
15. | राजा जेव्हा आनंदी असतो तेव्हा जीवन सगळ्यांसाठी चांगले असते. राजा जर तुमच्यावर खुष असला तर ते वसंतात ढगातून पडणाऱ्या पावसासारखे असते. |
16. | ज्ञान हे सोन्यापेक्षा अधिक किंमती आहे. समजुतदारपणा चांदीपेक्षा अधिक मौल्यवान आहे. |
17. | चांगले लोक वाईटापासून दूर राहाण्याचा प्रयत्न करीत आपले आयुष्य जगतात. जो माणूस जीवनात काळजी घेतो तो आपल्या आत्म्याचे रक्षण करतो. |
18. | जर माणूस गर्विष्ठ असला तर तो सर्वनाशाच्या संकटात असतो. जर एखादा माणूस आपण इतरांपेक्षा चांगले आहोत, असा विचार करत असला तर तो पराभवाच्या संकटात असतो. |
19. | विनम्र राहून गरीब लोकांबरोबर राहणे हे जे लोक स्वत:ला इतरांपेक्षा चांगले समजतात, त्यांच्याबरोबर राहून श्रीमंतीचे वाटेकरी होण्यापेक्षा चांगले असते. |
20. | जर एखादा माणूस लोकांच्या शिकवण्याकडे लक्ष देईल तर त्याचा फायदा होईल. आणि जो माणूस परमेश्वरावर विश्वास ठेवतो त्याला आशीर्वाद मिळतो. |
21. | माणूस शहाणा आहे की नाही ते लोकांना कळेल. आणि जो माणूस अतिशय काळजीपूर्वक आपले शब्द निवडतो तो ज्ञानात भर घालतो. |
22. | ज्यांच्याकडे ज्ञान आहे त्या लोकांना ते खरेखरे आयुष्य देते. पण मूर्ख अधिक मूर्ख व्हायला शिकतात. |
23. | शहाणा माणूस नेहमी बोलण्याआधी विचार करतो आणि तो जे शब्द बोलतो ते चांगले आणि ऐकण्यायोग्य असतात. |
24. | मायेच शब्द मद्यासारखे असतात. त्यांचा स्वीकार करणे सोपे असते आणि ते प्रकृतीसाठी चांगले असतात. |
25. | एखादा मार्ग लोकांना योग्य वाटतो. पण तो मार्ग मृत्यूकडे नेतो. |
26. | कामगाराची भूक त्याला काम करायला लावते. त्याची भूक त्याला खाण्यासाठी काम करायला लावते. |
27. | कवडीमोल माणूस वाईट गोष्टींच्या योजना आखतो. त्याचा उपदेश आगीप्रमाणे नाश करतो. |
28. | संकट आणणारे लोक नेहमी समस्या निर्माण करतात. आणि जो माणूस अफवा पसरवतो तो जवळच्या मित्रात समस्या निर्माण करतो. |
29. | जो माणूस लवकर रागावतो तो त्याच्या शेजाऱ्याला आमिष दाखवून वळवतो. तो त्यांना वाईट मार्गाने नेतो. |
30. | जो माणूस डोळे मिचकावतो आणि हसतो तो चुकीच्या आणि वाईट गोष्टींच्या योजना आखतो. |
31. | जी माणसे चांगले आयुष्य जगली त्यांचे पांढरे केस म्हणजे वैभवाचा मुकुट आहे. |
32. | सहनशील असणे हे शक्तिमान सैनिक असण्यापेक्षा चांगले आहे. स्वत:च्या रागाला काबूत ठेवणे हे सबंध शहर आपल्या काबूत आणण्यापेक्षा चांगले आहे. |
33. | लोक निर्णय घेण्यासाठी फासे टाकतात. पण निर्णय नेहमी देवाकडून येतात. |
← Proverbs (16/31) → |