← Numbers (24/36) → |
1. | इस्राएलला आशीर्वाद द्यायची परमेशवराची इच्छा आहे हे बलामने पाहिले. म्हणून त्याने ते कुठल्याही प्रकारची जादू वापरुन थांबवायचा प्रयत्न केला नाही. पण तो वळला आणि त्याने वाळवंटाकडे पाहिले. |
2. | बलामने वाळवंटाच्या कडे पाहिले आणि त्याला इस्राएलचे सगळे लोक दिसले. त्यांनी आपापल्या भागात आपापल्या गंटासह तळ दिला होता. नंतर देवाचा आत्मा बलामावर आला. |
3. | आणि बलामने हे शब्द उच्चारले: “हा निरोप बौराचा मुलगा बलाम याच्याकडून आहे. मला ज्या गोष्टी स्पष्ट दिसतात त्याविषयी मी बोलतो. |
4. | मी हा निरोप देवाकडून ऐकला. सर्वशक्तिमान देवाने मला जे दाखविले ते मी पाहिले. मला जे दिसले त्याबद्दल मी नतमस्तक होऊन सांगत आहे. |
5. | “याकोबाच्या माणसांने तुमचे तंबू सुंदर आहेत. इस्राएल लोकांनो तुमचीघरे सुंदर आहेत. |
6. | तुम्ही झऱ्याच्या काठी लावलेल्या बागेसारखे आहात. नदीकाठी वाढणाऱ्या बागे प्रमाणे तुम्ही आहात. तुम्ही परमेश्वराने लावलेल्या, गोड सुगंध असणाऱ्या झुडपाप्रमाणे आहात. पाण्याजवळ वाढणाऱ्या सुंदर झाडाप्रमाणे तुम्ही आहात. |
7. | तुमच्याकडे नेहमी भरपूर पाणी असेल. तुमचे बी वाढण्यासाठी लागणारे पाणी तुमच्याकडे भरपूर असेल. तुमचा राजा अगागच्या राजापेक्षा थोर असेल. तुमचे राज्य खूप महान असेल. |
8. | “देवाने त्या लोकांना मिसरमधून आणले. ते रानटी बैलासारखे शक्तिशाली आहेत. ते त्यांच्या सर्व शत्रूंचा पराभव करतील. ते त्यांची हाडे मोडतील आणि त्यांचे बाण तोडतील. |
9. | “इस्राएल सिंहासारखा आहे. तो वेटोळे करून झोपला आहे. होय. तो लहान सिंहाप्रमाणे आहे आणि त्याला उठवायची कोणीही इच्छा धरत नाही. जो माणूस तुला आशीर्वाद देईल त्याला आशीर्वाद मिळेल. जो माणूस तुझ्या विरुद्ध बोलेल त्याच्यावर संकटे येतील.” |
10. | बालाक बलामवर खूप रागावला. तो बलामला म्हणाला, “मी तुला माझ्या शत्रूंविरुद्ध बोलण्यासाठी बोलावले, पण तू त्यांना आशीर्वाद दिलास. तू त्यांना तीन वेळा आशीर्वाद दिलास. |
11. | आता इथून जा. घरी जा. मी तुला चांगला मोबदला देईन असे म्हटले होते. परंतु परमेश्वराने तुझे इनाम हिरावून घेतले.” |
12. | बलाम बालाकाला म्हणाला, “तूच माझ्याकडे माणसे पाठविलीस. त्या माणसांनी मला येण्याबद्दल विचारले. पण मी त्यांना म्हणालो, |
13. | “बालाक मला त्याचे सोन्या-चांदीने भरलेले घर देऊ शकेल. पण मी परमेश्वराने आज्ञा केलेल्या गोष्टीच बोलेन. मी स्वत: काहीही चांगले अथवा वाईट करु शकत नाही. परमेश्वर जेवढी आज्ञा देईल तेव्हढीच मी बोलतो.’ तुला या गोष्टी नक्कीच आठवत असतील की मी हे तुझ्या माणसांना सांगितले होते. |
14. | आता मी माझ्या माणसांकडे परत जात आहे. पण मी तुला एक इशारा देतो. इस्राएलचे हे लोक भविष्यात तुला आणि तुझ्या लोकांना काय करतील ते सांगतो.” |
15. | नंतर बलामने या गोष्टी सांगितल्या: “हा निरोप बौरचा मुलगा बलाम याचा आहे. मला ज्या गोष्टी स्पष्ट दिसतात त्याबद्दल मी बोलतो. |
16. | मी हा निरोप देवाकडून ऐकला. परात्पर देवाने मला जे शिकविले ते मी शिकलो. सर्वशक्तिमान देवाने मला जे दाखविले ते मी पाहिले. मला जे स्पष्ट दिसते ते मी नतमस्तक होऊन सांगतो. |
17. | “मला परमेश्वर येताना दिसतो, पण एवढ्यात नाही. तो मला एवढ्या लवकर येताना दिसत नाही. याकोबच्या घराण्यातून एक तारा उदय पावेल इस्राएल मधून एक राजा निघेल. तो राजा मवाबच्या लोकांना चिरडून टाकील. सेथच्या सर्व मुलांचा तो चुराडा करील. |
18. | इस्राएल सर्वशक्तिमान बनेल. त्याला अदोमचा प्रदेश मिळेल. त्याला सेईरचा, त्याच्या शत्रूचा प्रदेश मिळेल. |
19. | “याकोबाच्या घराण्यातून नवा राजा येईल. त्या शहरात जे लोक जिवंत राहिले असतील त्यांचा तो नाश करील.” |
20. | नंतर बलामने अमालेकी लोकांना पाहिले आणि तो हे म्हणाला: “सर्व अमालेकी बलिष्ठ आहेत. पण अमालेकचा सुद्धा नाश होईल.” |
21. | नंतर बलामने केनी लोकांना पाहिले आणि तो म्हणाला: “उंच पर्वतावर असलेल्या पक्षाच्या घरट्याप्रमाणे तुमचा प्रदेश सुरक्षित आहे असे तुम्हाला वाटते.” |
22. | पण केनी लोकांचासुद्धा नाश होईल. परमेश्वराने काईनाचा जसा नाश केला त्याप्रमाणे. अश्शूर तुला बंदिवान करील.” |
23. | नंतर बलाम हे शब्द बोलला: “देव जेव्हा असे करतो तेव्हा कोणीही जिवंत रहात नाही. |
24. | कित्तीच्या किनाऱ्यावरुन बोटी येतील. त्या अश्शूर आणि एबेर याचा नाश करतील. पण त्या बोटींचासुद्धा नाश होईल.” |
25. | नंतर बलाम उठला आणि त्याच्या घरी परत गेला आणि बालाकही मार्गस्थ झाला. |
← Numbers (24/36) → |