Numbers (22/36)  

1. नंतर इस्राएल लोक मवाबमधल्या यार्देन नदीच्या खोऱ्याकडे निघाले. यरिहोच्या पलिकडे असलेल्या यार्देन नदीजवळ त्यांनी तळ दिला.
4. मवाबचा राजा मिद्यानींच्या नेत्यांना म्हणाला, “गाय जशी शेतातले सगळे गवत खाऊन टाकते तसेच हे लोक आपला नाश करतील.” त्यावेळी सिप्पोराचा मुलगा बालाक मवाबचा राजा होता.
5. त्याने बौराचा मुलगा बलाम ह्याला बोलवायला काही माणसे पाठवली. बलाम फरात नदीकाठी पथोर शहरात रहात होता. इथेच बलामचे लोक रहात असत. बालाकाचा निरोप हा होता: “एका नवीन राष्ट्राचे लोक मिसर मधून आले आहेत. ते इतके आहेत की ते सगळा प्रदेश व्यापून टाकतात. त्यांनी माझ्याजवळच तळ ठोकला आहे.
6. ये आणि मला मदत कर. मला एकट्याला हे लोक खूप भारी आहेत. तुझ्याजवळ खूप शक्ति आहे हे मला माहीत आहे. जर तू एखाद्याला आशीर्वाद दिलास तर त्याच्या बाबतीत चांगल्या गोष्टी घडतात. आणि जर एखाद्याला शाप दिलास तर त्याच्या बाबतीत वाईट गोष्टी घडतात. म्हणून ये आणि या लोकांविरुद्ध बोल. कदाचित त्यानंतर मी त्यांचा पराभव करु शकेन. मी त्यांना माझा देश सोडायला भाग पाडू शकेन.”
7. मवाब आणि मिद्यानचे पुढारी बलामशी बोलायला गेले. त्याच्या कामाचा मोबदला म्हणून त्यांनी बरोबर पैसै नेले. नंतर त्यांनी बालाक काय म्हणाला ते बलामाला सांगितले.
8. बलाम त्यांना म्हणाला, “रात्री इथे रहा. मी परमेश्वराशी बोलेन आणि तो काय उत्तर देतो ते तुम्हाला सांगेन.” मवाबचे पुढारी त्या रात्री बलामबरोबर राहिले.
9. देव बलामकडे आला आणि त्याने विचारले, “तुझ्याकडे हे कोण लोक आले आहेत?”
10. बलाम देवाला म्हणाला, “सिप्पोरचा मुलगा बालाकने, मवाबच्या राजाने यांना माझ्याकडे एक निरोप देऊन पाठवले आहे.
11. तो निरोप हा: एका नवीन राष्ट्राचे लोक मिसरमधून आले आहेत. ते इतके आहेत की ते सगळा प्रदेश व्यापून टाकतात. म्हणून ये आणि त्या लोकांविरुद्ध बोल. नंतर कदाचित मी त्या लोकांचा पराभव करु शकेन. आणि त्यांना माझ्या देशातून जायला भाग पाडू शकेन.”
12. पण देव बलामला म्हणाला, “त्यांच्याबरोबर जाऊ नकोस. तू त्या लोकांविरुद्ध बोलू नकोस. ती माझा आशीर्वाद मिळालेली माणसे आहेत.”
13. दुसऱ्या दिवशी बलाम उठला आणि बालाकच्या पुढाऱ्यांना म्हणाला, “तुम्ही तुमच्या देशात परत जा. परमेश्वर मला तुमच्या बरोबर जाऊ देणार नाही.”
14. त्यामुळे मवाबचे पुढारी बालाककडे परत गेले आणि त्यांनी त्याला हे सांगितले. ते म्हणाले, “बलामने आमच्या बरोबर यायला नकार दिला.”
15. म्हणून बालाकने बलामकडे दुसरे पुढारी पाठवले. यावेळी त्याने पहिल्या वेळेपेक्षा खूप जास्त पुढारी पाठवले. हे पुढारी पहिल्या पुढाऱ्यांपेक्षा अधिक महत्वाचे होते.
16. ते बलामकडे गेले आणि म्हणाले, “बालाक, सिप्पोराचा मुलगा तुला हे सांगतो: तुझ्या इथे येण्याच्या आड कुठलीही गोष्ट येऊ देवू नको.
17. मी जे सांगतो ते तू केलेस तर मी तुला नक्कीच मान देईन आणि तू मला जे काही विनवशिल ते मी करीन पण तू ये व या लोकांविरुद्ध माझ्यासाठी बोल.”
18. बलामने बालाकाच्या पुढाऱ्यांना उत्तर दिले. तो म्हणाला, “मी माझ्या देवाची, परमेश्वराची आज्ञा पाळली पाहिजे. मी त्याच्या आज्ञे विरुद्ध काहीही करु शकत नाही. परमेश्वराने सांगितल्या खेरीज मी कुठलीही लहान-मोठी गोष्ट करणार नाही. बालाकाने मला त्याचे सुंदर घर सोन्या चांदीने भरुन दिले तरीही मी काही करणार नाही.
19. परंतु आजच्या रात्रीपुरते तुम्ही इथे मागच्या सारखे राहू शकता. आणि परमेश्वर मला काय सांगतो ते मला रात्रीतून कळू शकेल.”
20. त्या रात्री देव बलामकडे आला. देव म्हणाला, “तुला घेऊन जाण्यासाठी हे लोक पुन्हा आले आहेत. म्हणून तू त्यांच्या बरोबर जाऊ शकतोस. पण मी जे सांगेन तेवढेच तू कर.”
21. दुसऱ्या दिवशी सकाळी बलाम उठला आणि त्याने आपल्या गाढवीवर खोगीर घातले. नंतर तो मवाबच्या पुढाऱ्यांबरोबर चालला.
22. बलाम त्याच्या गाढवीवर बसला होता. त्याचे दोन नोकर त्याच्याबरोबर होते. बलाम प्रवास करीत होता तेव्हा देव त्याच्यावर रागावला. परमेश्वराचा दूत रस्त्यावर बलामपुढे येऊन उभा राहिला. देवदूत बलामला थांबवणार होता.
23. बलामच्या गाढवीने परमेश्वराच्या दूताला रस्त्यात उभे असलेले पाहिले. देवदूताने हातात तलवार घेतली होती. म्हणून गाढवी रस्ता सोडून शेतात गेली. बलामला देवदूत दिसू शकला नाही. म्हणून तो गाढवीवर खूप रागावला. त्याने गाढवीला मारले आणि जबरदस्तीने रस्त्यावर आणले.
24. नंतर परमेश्वराचा दूत रस्ता जिथे अरुंद होता तिथे थांबला. हा दोन द्राक्षांच्या मव्व्यांच्या मधला भाग होता. रस्ताच्या दोन्ही बाजूला भिंती होत्या.
25. गाढवीने पुन्हा परमेश्वराच्या दूताला पाहिले म्हणून ती एका भिंतीला चिकटून चालू लागली त्यामुळे बलामचा पाय भिंतीला लागून चिरडला गेला. म्हणून बलामने गाढवीला पुन्हा मारले.
26. नंतर परमेश्वराचा दूत दुसऱ्या ठिकाणी उभा राहिला. अरुंद रस्ता असलेले हे दुसरे ठिकाण होते. येथे वळायला सुद्धा मुळीच जागा नव्हती गाढवीला त्याला वळसा घालून जाणे शक्य नव्हते.
27. गाढवीने परमेश्वराच्या दूताला पाहिले म्हणून बलाम तिच्यावर बसला असतानाच ती खाली बसली त्यामुळे बलाम खूप रागावला आणि त्याने गाढवीला त्याच्या चालण्याच्या काठीने मारायला सुरुवात केली.
28. नंतर परमेश्वराने गाढवीला बोलते केले. गाढवी बलामला म्हणाली, “तू माझ्यावर का रागावला आहेस? मी तुला काय केले आहे? तू मला तीन वेळा मारलेस.”
29. बलामने गाढवीला उत्तर दिले, “तू मला मूर्ख बनवलेस. जर माझ्या हातात तलवार असती तर मी तुला मारुन टाकले असते.”
30. पण गाढवी बलामला म्हणाली, “बघ मी तुझीच गाढवी आहे. खूप वर्षे तू माझ्यावर बसत आला आहेस. आणि या पूर्वी मी असे काही केले नाही हे तुला माहीत आहे.” ‘हे खरे आहे’ बलाम म्हणाला.
31. नंतर परमेश्वराने बलामाचे डोळे उघडले, तेव्हा त्याला परमेश्वराचा दूत दिसला. तो रस्त्यात तलवार घेऊन उभा होता. त्याने परमेश्वराच्या दूताला रस्त्यात जमिनीपर्यंत वाकून नमस्कार केला.
32. परमेश्वराच्या दूताने बलामला विचारले, “तू तुझ्या गाढवीला तीनदा का मारलेस? तुला थांबवण्यासाठी मी आलो आहे. पण अगदी ऐनवेळी
33. तुझ्या गाढवीने मला पाहिले आणि ती दूर गेली. असे तीन वेळा घडले. जर गाढवी वळली नसती तर आतापर्यंत मी तुला मारले असते आणि तुझ्या गाढवीला जिवंत राहू दिले असते.”
34. तेव्हा बलाम परमेश्वराच्या दूताला म्हणाला, “मी पाप केले आहे. तू रस्त्यात उभा आहेस हे मला माहीत नव्हते. मी जर चूक करीत असेन तर मी घरी परत जाईन.”
35. तेव्हा परमेश्वराचा दूत बलामला म्हणाला, “नाही! तू या लोकांबरोबर जाऊ शकतोस. पण सावध रहा. मी जे सांगेन तेच शब्द बोल.” म्हणून बलाम बालाकाने पाठवलेल्या पुढाऱ्यांबरोबर गेला.
36. बलाम येत असल्याचे बालाकाला समजले. म्हणून तो बलामला भेटायला अर्णोन नदी जवळच्या मवाबच्या शहरात गेला. ते त्याच्या देशाच्या उत्तर सरहद्दीवर होते.
37. जेव्हा बालाकाने बलामला पाहिले तेव्हा तो त्याला म्हणाला, “मी तुला आधीच यायला सांगितले होते. हे खूप खूप महत्त्वाचे आहे असे मी तुला सांगत होतो. तू माझ्याकडे का आला नाहीस? आता मी तुला कदाचित पैसे देऊ शकणार नाही.”
38. बलामने उत्तर दिले, “पण आताच मी येथे आलो आहे. मी आलो आहे पण तू सांगितलेल्या गोष्टी मला कदाचित करता येणार नाहीत. परमेश्वर देव जेवढे सांगेत तेवढेच मी बोलू शकतो.
39. नंतर बलाम बालाकाबरोबर किर्याथ-हसोथ येथे गेला.
40. बालाकाने काही गुरे व मेंढ्या बळी म्हणून मारल्या. त्याने थोडे मास बलामला दिले आणि थोडे त्याच्याबरोबर असलेल्या पुढाऱ्यांना दिले.
41. दुसऱ्या दिवशी सकाळी बालाक बलामला घेऊन बामोथबाल शहरी गेला. तेथून त्यांना इस्राएल लोकांच्या तळाचा शेवटचा भाग दिसू शकत होता.

  Numbers (22/36)