← Numbers (2/36) → |
1. | परमेश्वर, मोशे व अहरोन यांना म्हणाला, |
2. | “इस्राएल लोकांनी दर्शनमंडपाभोवती आपापले तंबू ठोकावेत; प्रत्येक दलाला आपले स्वत:चे निशाण असावे आणि प्रत्येकाने आपापल्या दलाच्या निशाणाजवळ आपला तंबू ठोकावा. |
3. | “यहुदावंशाच्या छावणीचे निशाण उगवत्या सूर्याच्या दिशेला म्हणजे पूर्व दिशेला असावे. यहुदावंशातील सर्व लोकांनी आपली छावणी त्या निशाणाजवळ ठोकावी. अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन हा यहुदावंशाचा प्रमुख सरदार असावा. |
4. | त्याच्या दलात चौऱ्याहत्तर हजार सहाशे लोक होते. |
5. | “इस्साखार वंशाच्या लोकांनी यहुदावंशाच्या छावणी शेजारी आपली छावणी ठोकावी. सुवाराचा मुलगा नथनेल हा इस्साखारवंशाचा प्रमुख सरदार असावा. |
6. | त्याच्या दलात चोपन्न हजार चारशे लोक होते. |
7. | “जबुलून वंशाच्या लोकांनीही यहुदावंशाच्या छावणीनंतर जवळच आपली छावणी उभारावी. हेलोनाचा मुलगा अलीयाब हा जबुलून वंशाचा प्रमुख सरदार असावा. |
8. | त्याच्या दलात सत्तावन्न हजार चारशे लोक होते. |
9. | “यहुदावंशाच्या छावणीत एकूण एक लाख शहाऐंशी हजार चारशे लोक होते. ते त्यांच्या कुळाप्रमाणे विभागलेले होते. इस्राएल लोकांनी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे प्रवास करिताना यहुदावंशाच्या दलाने सर्वात पुढे चालावे. |
10. | “पवित्रनिवास मंडपाच्या दक्षिण बाजूस रऊबेन वंशाच्या छावणीचे निशाण असावे. प्रत्येक गटाने आपापल्या निशाणाजवळ आपली छावणी उभारावी. शदेउराचा मुलगा अलीसूरहा रऊबेन वंशाचा प्रमुख सरदार असावा. |
11. | त्याच्या दलात शेहेचाळीस हजार पाचशे लोक होते. |
12. | “शिमोन वंशातल्या कुळांनी रऊबेन वंशाच्या छावणी शेजारी आपली छावणी उभारावी. सुरीशादैचा मुलगा शलूमीयेल हा शिमोन वंशाचा प्रमुख सरदार असावा. |
13. | त्याच्या दलात एकोणसाठ हजार तीनशें लोक होते. |
14. | “गादवंशाच्या कुळांनीही रऊबेन वंशाच्या छावणी जवळ आपली छावणी उभारावी. रगुवेलाचा मुलगा एल्यासाप हा गाद वंशाचा प्रमुख सरदार असावा. |
15. | त्याच्या दलात पंचेचाळीस हजार सहाशें पन्नास लोक होते. |
16. | “रऊबेनच्या छावणीत कुळांप्रमाणे एकंदर एक लाख एकावन्न हजार चारशें पन्नास लोक होते. इस्राएल लोकांचा मुक्काम हलविताना रऊबेनच्या दलातील लोकांनी दुसऱ्या क्रमांकावर चालावे. |
17. | “त्यानंतर इस्राएलचे लोक हालल्यावर लेवीच्या लोकांनी मुक्काम हलवावा (यहूदा आणि रऊबेन नंतर) दर्शनमंडप त्यांच्याबरोबर असावा व तो इतर छावण्याच्या लोकांच्या मध्ये असावा. प्रवास करताना छावण्या ज्या क्रमाने निघतात त्याच क्रमाने मुक्काम करताना त्यांनी आपापल्या छावण्या ठोकाव्यात. प्रत्येक माणसाने आपल्या कुळाच्या निशाणाजवळ राहावे. |
18. | “एफ्राइम वंशाच्या छावणीचे निशाण पश्चिम बाजूस असावे व त्याच्या कुळातल्या लोकांनी आपली छावणी तेथे उभारावी. अम्मीहुदाचा मुलगा अलीशामा एफ्राइम वंशाचा प्रमुख सरदार असावा. |
19. | त्याच्या दलात चाळीस हजार पाचशे लोक होते. |
20. | “मनश्शेवंशाच्या दलाने एफ्राइम वंशाच्या छावणी शेजारी आपली छावणी ठोकावी. पदासुराचा मुलगा गमलीयेल हा मनश्शेवंशाचा प्रमुख सरदार असावा. |
21. | त्याच्या दलात बत्तीस दोनशें लोक होते. |
22. | “बन्यामीन वंशाच्या दलानेही एफ्राइमाच्या दलाशेजारी आपली छावणी ठोकावी. बन्यामीन वंशाच्या प्रमुख सरदार गिदोनीचा मुलगा अबीदान हा असावा. |
23. | त्याच्या दलात पस्तीस हजार चारशें लोक होते. |
24. | “एफ्राइम वंशाच्या छावणीत एकण एक लाख आठ हजार शंभर लोक होते. इस्राएल लोकांचा मुक्काम हलविताना एफ्राइम वंशाचा तिसरा क्रमांक असावा. |
25. | “दान वंशाच्या छावणीचे निशाण उत्तरेकडील बाजूस असावे. त्यांच्या कुळातल्या लोकांनी आपल्या दलाची छावणी तेथे उभारावी. अम्मीशादैचा मुलगा अहीयेजर हा दानवंशाचा सरदार असावा. |
26. | त्याच्या दलात बासष्ट हजार सातशें लोक होते. |
27. | “आशेर वंशाच्या दलाने दान वंशाच्या छावणी शेजारी आपली छावणी उभारावी. आक्रानाचा मुलगा पगीयेल हा आशेर वंशाचा सरदार असावा. |
28. | त्याच्या दलात एकेचाळीस हजार पाचशे लोक होते. |
29. | “नफताली वंशाच्या कुळांनीही दान वंशाच्या छावणीजवळ आपली छावणी उभारावी. एनानाचा मुलगा अहीरा हा नफताली वंशाचा पुढारी असावा. |
30. | त्याच्या दलात त्रेपन्न हजार चारशें लोक होते. |
31. | “दान वंशाच्या छावणीत एक लाख सत्तावन्न हजार सहाशें लोक होते. इस्राएल लोकांचा तळ ठिकठिकाणाहून हलविताना दानवंशाच्या कुळांनी सर्वात शेवटी चालावे. प्रत्येक माणसाने आपल्या कुळाच्या निशाणाजवळ राहावे.” |
32. | अशी ही इस्राएल लोकांची मंडळी होती. त्यांच्या वंशात त्यांच्या कुळाप्रमाणे व त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे त्यांची गणती केली तेव्हा त्यांची एकूण संख्या सहा लाख तीन हजार पाचशें पन्नास होती. |
33. | मोशेने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोकांबरोबर लेवी लोकांची गणती केली नाही. |
34. | तेव्हा परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञाप्रमाणे सर्वकाही इस्राएल लोकांनी केले. प्रत्येक दलाने आपल्या निशाणापाशी तळ दिला आणि प्रत्येक जण आपापल्या कुळात व आपापल्या वाडवडिलांच्या घराण्यांच्या छावणीत राहिला. |
← Numbers (2/36) → |