Numbers (12/36)  

1. मिर्याम व अहरोन मोशेविरुद्ध बोलू लागले. त्यांनी त्याच्यावर टीका केली कारण त्याने एका इथिओपीयन-कुशी-स्त्रीशी लग्न केले. मोशेने त्या इथिओपीयन-कुशी-स्त्रीशी लग्न केले ते योग्य केले नाही असे त्यांना वाटले.
2. ते स्वत:शीच म्हणाले, “परमेश्वराने लोकांशी बोलण्यासाठी मोशेचा उपयोग केला. पण मोशे काय असा एकच नव्हे. परमेश्वर आमच्याद्वारेही बोलला आहे!” परमेश्वराने हे ऐकले.
3. (मोशे फार नम्र माणूस होता. त्याने कधी अभिमान धरला नाही किंवा बढाई मारली नाही पृथ्वीवरील कोणत्याही माणसापेक्षा मोशे अधिक नम्र होता.)
4. तेव्हा परमेश्वर आला आणि मोशे, अहरोन व मिर्याम ह्यांच्याशी बोलला. परमेश्वर म्हणाला, “तुम्ही तिघे आत्ताच्या आता दर्शनमंडपापाशी या!” तेव्हा मोशे, अहरोन व मिर्याम दर्शनमंडपापाशी गेले.
5. परमेश्वर एका उंच ढगातून खाली आला दर्शनमंडपाचा दारापाशी उभा राहिला. परमेश्वराने हाक मारली, “अहरोन व मिर्याम!” तेव्हा अहरोन व मिर्याम त्याच्याकडे गेले.
6. परमेश्वर म्हणाला, “माझे ऐका!” तुमच्यातील संदेष्ट्यांना मी परमेश्वर दृष्टांतातून दर्शन देतो, मी त्यांच्याशी स्वप्नात बोलतो
7. परंतु मोशेचे तसे नाही. मोशे माझ्या सर्व घरण्यात विश्वासू आहे.
8. मी त्याच्याशी बोलताना समोरासमोर बोलतो. मी त्याच्याशी दाखल्याने किंवा गुप्त अर्थ असलेल्या गोष्टींनी बोलत नाही-त्याला समजाव्यात अशा गोष्टी मी त्याला स्पष्टपणे दाखवितो. आणि मोशे परमेश्वराचे रुप स्पष्टपणे बघतो. तर असे असताना माझा सेवक मोशे ह्याच्या विरुद्ध बोलण्याची हिंमत तुम्हाला कशी झाली?”
9. परमेश्वराचा राग त्यांच्यावर खूप भडकला आणि तो त्यांना सोडून निघून गेला.
10. ढग पवित्र निवास मंडपापासून वर गेला. तेव्हा अहरोनाने वळून मिर्यामकडे पाहिले. तिचे अंग बफर्ासारखे पांढरे झाले होते. तिला भयंकर त्वचेचा रोग झाला होता!
11. म्हणून अहरोन मोशेला विनंती करुन म्हणाला, “माझे स्वामी, आम्ही केलेल्या मूर्खपणाच्या पापाबद्दल आमची क्षमा करा.
12. मेलेल्या जन्मलेल्या बाळाच्या चामड्यासारखे तिचे चामडे होऊ देऊ नका.” (कधी कधी आपले अर्धे चामडे खाऊन टाकल्याप्रमाणे एकादे बाळ जन्मते.)
13. म्हणून मोशेने परमेश्वराला विनंती केली, “देवा, तिला ह्या रोगापासून बरे कर.”
14. परमेश्वराने मोशेला उत्तर दिले, “जर तिचा बाप तिच्या तोंडावर थुंकला असता तर तिला सात दिवस लाज वाटली असती ना! तेव्हा सात दिवस तिला छावणीच्या बाहेर काढ मग ती बरी होईल; मग तिने परत छावणीत यावे.
15. म्हणून त्यांनी तिला सात दिवस छावणीच्याबाहेर काढले आणि ती छावणीत परत येईपर्यंत लोकांनी आपला मुक्काम हलविला नाही.
16. त्यानंतर लोकांनी हसेरोथ सोडले आणि पारानाच्या रानापर्यंत त्यांनी प्रवास केला आणि तेथे रानातच त्यांनी आपला तळ ठोकला.”

  Numbers (12/36)