← Numbers (11/36) → |
1. | मग इस्राएल लोक आपल्या त्रासाबद्दल परत तक्रार करु लागले. ती परमेश्वराने ऐकली व ती ऐकल्यावर त्याचा राग भडकला. परमेश्वरापासूनचा अग्नि त्यांच्यात पेटला आणि त्याने छावणीच्या कडेचा काही भाग जाळून टाकिला. |
2. | तेव्हा लोकांनी मोशेकडे मदतीसाठी आरडाओरड केली. मोशेने परमेश्वराला विनंती केली तेव्हा अग्नि शमला. |
3. | त्यामुळे त्या ठिकाणाचे नांव तबेरा असे पडले. लोकांनी त्या ठिकाणाला तसे नांव दिले कारण परमेश्वराच्या अग्निमुळे छावणीचा भाग जळून गेला. |
4. | जे विदेशी इस्राएल लोकाबरोबर राहात होते, त्यांना इतर काही पदार्थ खावेसे वाटू लागले. लवकरच इस्राएल लोकांनी पुन्हा कुरकुर करण्यास सुरवात केली. लोक म्हणाले, “आम्हांला मांस खावयास पाहिजे. |
5. | मिसरमध्ये असताना खाल्लेल्या माश्यांची आम्हाला आठवण येते; तेथे ते आम्हाला फुकट खावयास मिळत. त्याचप्रमाणे तेथे आम्हाला काकड्या, खरबूजे, भाजी, कांदे, लसूण असा चांगला भाजीपाला मिळत आसे. |
6. | परंतु आता आम्ही कमजोर झालो आहोत. मान्न्याशिवाय आम्हाला येथे काही ही खावयास मिळत नाही!” |
7. | (हा मान्ना लहान धण्यासारखा होता, आणि तो झाडाच्या डिंकासारखा दिसे. |
8. | लोक तो गोळा करीत, तो उखळात कुटीत, किंवा भांड्यात शिजवीत किंवा दळीत व त्याच्या भाकरी करी. उत्तम तेलात भाजलेल्या गोड पुऱ्या सारखी त्याची चव लागे. |
9. | रात्री दव पडल्यामुळे जमीन ओली झाल्यावर मान्ना जमिनीवर पडत असे.) |
10. | मोशेने लोकांची कुरकुर ऐकली. प्रत्येक कुटुंबातील लोक आपापल्या तंबूसमोर बसून कुरकुर करीत होते. त्यामुळे परमेश्वराचा राग भयंकर भडकला आणि त्यामुळे मोळे खिन्न झाला. |
11. | मोशेने परमेश्वराला विचारले, “परमेश्वरा, तू माझ्यावर हे संकट का आणिले? मी तुझा दास आहे. माझे काय चुकले? तुला एवढे रागावण्यासारखे मी काय केले? ह्या सर्व लोकांची जबाबदारी तू माझ्यावर का टाकलीस? |
12. | तुला माहीत आहे की मी काही ह्या सर्व लोकांचा बाप नाही, की मी ह्यांना जन्म दिला नाही. परंतु परिचारिका-जशी लहान बाळाला छातीशी धरते तशी मी त्यांची काळजी घेतली पाहिजे अशी सक्ति तू माझ्यावर का करतोस? तू आमच्या वाडबडिलांना वचन दिलेल्या देशात त्यांना घेऊन जाण्याची सक्ति माझ्यावर का करतोस? |
13. | एवढ्या लोकांना पुरेल एवढे मांस माझ्याजवळ नाही! आणि त्यांची तर माझ्यामागे कुरकुर चालूच आहे. ते म्हणतात, ‘आम्हाला खावयास मांस दे! |
14. | मी एकटा ह्या सर्वांची काळजी घेऊ शकत नाही. हे ओझे माझ्यासाठी फारच जड आहे. |
15. | त्यांचा त्रास मी सहन करण्याचे काम चालू ठेवावे असा जर तुझा विचार असेल तर मग तू आजच मला मारुन टाक. तू मला दास समजत असशील तर मग आता मला मरु दे. मग माझ्या मागचा सर्व त्रास संपून जाईल! |
16. | तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएल मंडळीतील सत्तर वडील मजकडे आण. मंडळीचे नेते असलेल्या ह्या लोकांना दर्शनमंडपाच्या दारापाशी आण; व तुझ्याबरोबर त्यांना उभे कर. |
17. | मग मी खाली येऊन तेथे तुझ्याशी बोलेन. मग तुझ्यावर असलेल्या आत्म्यातून काही भाग मी त्यांनाही देईन. मग लोकांची काळजी घेण्यास ते तुला मदत करतील. ह्या प्रकारे इस्राएल लोकांची जबाबदारी केवळ तुझ्या एकट्यावर राहणार नाही. |
18. | तू ह्या गोष्टी लोकांना सांग: उद्या तुम्ही स्वत: शुद्ध राहा म्हणजे तुम्हाला मांस खावयास मिळेल. परमेश्वराने तुमचे रडगाणे ऐकले आहे. ‘आम्हाला मांस खाण्यास पाहिजे! आम्ही मिसरमध्ये होतो ते बरे होते,’ असे तुम्ही म्हणाला ते शब्दही परमेश्वराने ऐकले आहेत. तेव्हा आता परमेश्वर तुम्हाला मांस देईल आणि तुम्ही ते खाल. |
19. | तुम्ही ते एक, किंवा दोन, किंवा पाच, किंवा दहा दिवसच नव्हे तर वीस दिवस देखील खाल. |
20. | येवढेच नव्हे तर तुम्ही ते पूर्ण महिनाभर खाल. तुम्हाला त्याचा तिटकारा येईपर्यंत ते खाल. हे असे होईल कारण तुम्ही आपल्या परमेश्वराविरुद्ध कुरकुर केली. परमेश्वर तुम्हामध्ये राहतो आणि तुम्हाला काय पाहिजे ते त्याला माहीत आहे; परंतु तुम्ही त्याच्या विरुद्ध ओरड केली आणि म्हणाला, ‘आम्ही का बरे मिसर सोडले?”‘ |
21. | मोशे म्हणाला, “परमेश्वरा येथे सहा लाख लोक आहेत आणि तू म्हणतोस की ‘ह्याना पूर्ण महिनाभर पुरेल एवढे मांस मी खावयास देईन!’ |
22. | आम्ही जरी सर्व शेरडेमेंढरे व गुरेढोर कापली तरी ह्या सर्व लोकांना महिनाभर खाण्यास तेवढेही पुरे पडणार नाहीत.” |
23. | परंतु परमेश्वर मोशेला म्हणाला, “परमेश्वराचा हात असमर्थ तोकडा पडला आहे काय? मी माझे म्हणणे खरे करुन दाखवीन हे तुला दिसेल.” |
24. | तेव्हा मोशे लोकांशी बोलण्याकरिता बाहेर गेला. परमेश्वर जे बोलला ते त्याने त्यांना सांगितले. मग मोशेने मंडळीच्या सत्तर वडिलांना (नेत्यांना) एकत्र जमविले; त्याने त्यांना तंबू भोंवती उभे राहण्यास सांगितले. |
25. | मग परमेश्वर ढगातून खाली आला आणि मोशेशी बोलला. मोशेवर परमेश्वराचा आत्मा होता. त्यातून काही घेऊन परमेश्वराने ते त्या सत्तर वडिलावर (नेत्यावर) ठेवला. तो आत्मा आल्यावर ते संदेश सांगू लागले. परंतू त्यानंतर मात्र त्यांनी पुन्हा संदेश सांगीतला नाही. |
26. | त्यातील दोन वडील (नेते) एलदाद व मेदाद छावणीच्या बाहेर गेले नाहीत. त्यांची नांवे वडीलांच्या (नेत्यांच्या) यादीत होती. परंतु ते छावणीतच राहिले; त्यामुळे आत्मा त्यांच्यावरही आला आणि ते छावणीतच संदेश सांगू लागले. |
27. | तेव्हा एका तरुणाने पळत जाऊन मोशेला हे सांगितले. तो म्हणाला, “एलदाद व मेदाद हे छावणीत संदेश सांगत आहेत.” |
28. | तेव्हा नूनाचा मुलगा यहोशवा मोशेला म्हणाला, “मोशे, माझे स्वामी तुम्ही त्यांना बंदी घाला.” (यहोशवा तरुण असल्यापासून मोशेचा मदतनीस होता.) |
29. | मोशेने त्याला उत्तर दिले, “ह्याच्या योगाने माझ्या नेतेपणाला कमीपणा येईल असे तुला वाटते काय? परमेश्वराचे सर्वच लोक संदेष्टे असते आणि परमेश्वराने त्या सर्वांवर आपला आत्मा ठेविला असता तर किती बरें होते.” |
30. | मग मोशे व इस्राएलांचे नेते छावणीमध्ये परत गेले. |
31. | मग परमेश्वराने समुद्रावरुन जोरदार वारा वाहावयास लाविला. त्या वाऱ्याने लावे पक्षी त्या भागात वाहून आणिले. ते लावे पक्षी सर्व छावणीच्या भोंवती उडत राहिले. ते इतके होते की छावणीचे अंगण व सारा परिसर त्यांनी भरुन गेला. त्यांचा जमिनीपासून तीन फूट वरपर्यंत थर साचला. माणूस एक दिवसभरात जितका दूर चालत जाईल तेथ पर्यंत तो थर होता. |
32. | लोक बाहेर पडले व त्यांनी दिवसभर व रात्रभर लावे पक्षी गोळा केले आणि त्यांनी पूर्ण दुसरा दिवसभरही ते गोळा केले. कोणत्याही माणसाने गोळा केलेले पक्षी कमीत कमी साठ बुशेल भरले. मग लोकांनी लावे पक्षांचे मांस सर्व छावणी सभोंवती पसरवले. |
33. | लोकांनी मांस खाण्यास सुरवात केली परंतु परमेश्वराचा राग भयंकर भडकला. ते मांस त्यांच्या तोंडात होते तोच म्हणजे ते पूर्ण खाऊन होण्यापूर्वी परमेश्वराने त्यांना भयंकर आजारी पाडले व मारुन टाकिले. |
34. | म्हणून लोकांनी त्या ठिकाणाला किब्रोथ-हत्तव्वा असे नांव दिले. कारण ह्याच ठिकाणी, ज्या लोकांना मांस खाण्याची अतिशय कडक इच्छा झाली होती त्यांना पुरण्यात आले. |
35. | किब्रोथ हत्तव्वापासून लोकांनी हसेरोथपर्यंत प्रवास केला व तेथे त्यांनी मुक्काम केला. |
← Numbers (11/36) → |