Micah (4/7)  

1. शेवटल्या दिवसांत, देवाचे मंदिर ज्या पर्वतावर आहे, तो पर्वत सर्व पर्वतांत उंच असेल. टेकड्यांपेक्षा तो उंच होईल. आणि तिथे जाणाऱ्या लोकांचा प्रवाह सतत वाहत राहील.
2. तेथे पुष्कळ देशातले लोक जातील. ते म्हणतील, “या! आपण परमेश्वराच्या पर्वतावर जाऊ या. याकोबच्या देवाच्या मंदिरात आपण जाऊ या. मग परमेश्वर आपल्याला त्याचा आचारधर्म शिकवील व आपण त्याचे अनुसरण करु.” परमेश्वराच्या शिकवणुकीचा आणि परमेश्वराच्या संदेशाचा प्रारंभ यरुशलेममधून सियोन पर्वतावरुन होईल. मग तो सर्व जगात पसरेल.
3. तेव्हा सर्व राष्ट्रांतील लोकांचा परमेश्वर न्यायाधीश असेल. दूरच्या देशातील पुष्कळ लोकांमधील वाद परमेश्वर मिटवील. ते लोक लढण्यासाठी शस्त्रे वापरण्याचे सोडून देतील. ते त्यांच्या तलवारीपासून नांगर बनवतील आणि भाल्यांचा उपयोग झाडे छाटण्यासाठी करतील. लोक एकमेकांशी लढाई करणार नाहीत. लोकांना कधीही युध्दाचे शिक्षा दिले जाणार नाही.
4. प्रत्येकजण आपल्या द्राक्षवेलीखाली व अंजिराच्या झाडाखाली बसेल. त्यांना कोणीही घाबविणार नाही. का? कारण सर्व शक्तिमान परमेश्वराने असे घडेल म्हणून सांगितले आहे.
5. दुसऱ्या राष्ट्रातील लोक आपापल्या दैवतांना अनुसरतात. पण आम्ही आमच्या परमेश्वर देवाचे नाव घेत सदासर्वकाळ चालत राहू.
6. परमेश्वर म्हणतो, “यरुशलेमला दुखापत झाली व ती लंगडी झाली. ती दूर फेकली गेली तिला दुखविले गेले व शिक्षा झाली. पण मी तिला माझ्याकडे परत आणीन.
7. त्या लंगड्या नगरीतील लोकच वाचतील एके काळी त्या नगरीतील लोकांना बळजबरीने ती नगरी सोडावी लागली. पण मी त्यांचे एक बलशाली राष्ट्र करीन.” परमेश्वर त्यांचा राजा असेल. तो सियोन पर्वतावरुन चिरंतन काळापर्यत राज्य करील.
8. आणि तू, कळपाच्या मनोऱ्या, तुझी वेळ येईल. योफल, सियोनच्या टेकाडा, तू पुन्हा शासनाची जागा होशील. हो! पूर्वीप्रमाणेच राज्य यरुशलेममध्ये असेल.”
9. आता, तू एवढ्या मोठ्याने का रडत आहेस? तुझा राजा गेला का? तुझ्या नेत्याला तू गमावलेस का? प्रसूतिवेदना होणाऱ्या स्त्रीप्रमाणे तुला त्रास होत आहे.
10. सियोनच्या कन्ये, तुला वेदना जाणवू दे. तू आपल्या बाळाला जन्म दे.” तुला या नगरीतून (यरुशलेममधून) बाहेर गेलेच पाहिजे. तू रानात राहशील. मला असे म्हणायचे आहे की तू बाबेलला जाशील. पण त्या ठिकाणापासून तुझे रक्षण केले जाईल. परमेश्वर तेथे जाऊन तुझी सुटका करील. तो, तुला, तुझ्या शत्रूंपासून दूर नेईल.
11. पुष्कळ राष्ट्रे तुझ्याविरुध्द लढण्यास आली आहेत. ती म्हणतात, “ती पाहा सियोन! या, आपण तिच्यावर हल्ला करु या.”
12. त्या लोकांनी त्यांचे बेत केलेत. पण परमेश्वर काय बेत करीत आहे. हे त्यांना माहीत नाही. परमेश्वराने त्या लोकांना विशेष उद्देशाने येथे आणले आहे. ते लोक, खळ्यातील धान्याप्रमाणे चिरडले जातील.
13. “सियोनच्या कन्ये, ऊठ आणि त्या लोकांना चिरडून टाक. मी तुला खूप सामर्थ्यवान करीन. तुला जणू काही लोखंडाची शिंगे व कास्याचे खूर असतील. तू पुष्कळांवर आघात करुन त्यांचे तुकडे तुकडे करशील. तू त्यांची संपत्ती परमेश्वराला देशील. तू त्याचे धन जगाच्या परमेश्वराला देशील.”

  Micah (4/7)