← Matthew (25/28) → |
1. | “त्या दिवसांत स्वर्गाचे राज्य दहा कुमारिकांसारखे असेल, त्यांनी त्यांचे दिवे घेतले व वराला भेटण्यास गेल्या. |
2. | त्या दहा मुलींपैकी पाच मुर्ख होत्या आणि पाच शहाण्या होत्या. मूर्ख मुलींनी आपले दिवे घेतले, पण दिव्यासाठी तेल घेतले नाही. |
4. | शहाण्या मुलींनी दिव्याबरोबर तेलही घेतले. |
5. | वराला उशीर झाल्याने सर्वच मुलींना डुलक्या लागल्या व त्या झोपी गेल्या. |
6. | “मध्यरात्री कोणीतरी घोषणा केली, वर येत आहे! बाहेर जाऊन त्याला भेटा!’ |
7. | “सर्व मुली जाग्या झाल्या आणि त्यांनी आपले दिवे तयार केले. |
8. | पण मूर्ख मुली, हुशार मुलींना म्हणाल्या, ‘तुमच्यातील काही तेल अम्हांला द्या. आमचे दिवे विझत आहेत.’ |
9. | “पण उत्तरादाखल हुशार मुली म्हणाल्या, ‘नाही, आम्ही तुम्हांला काहीच देऊ शकत नाही, नाही तर तुम्हांला व आम्हांलाही पुरणार नाही. त्याऐवजी ते विकणाऱ्याकडे जा आणि आपणांसाठी तेल विकत आणा.’ |
10. | “पाच मूर्ख मुली तेल विकत घ्यायला निघाल्या तेव्हा वर आला. तेव्हा ज्या मुली तयार होत्या त्या मेजवानीसाठी त्याच्याबरोबर आत गेल्या. मग दार बंद झाले. |
11. | “शेवटी उरलेल्या पाच मुली आल्या आणि म्हणाल्या, ‘महाराज! महाराज! दार उघडा! |
12. | “पण तो त्यांना उत्तरादाखल म्हणाला, मी तुम्हांला खरे सांगतो: मा तुम्हांला ओळखत नाही!” |
13. | “म्हणून नेहमी तयार असा. कारण मनुष्याचा पुत्र कधी येणार तो दिवस व ती वेळ तुम्हांला माहीत नाही. |
14. | स्वर्गाचे राज्य अशा मनुष्यासारखे आहे, जो प्रवासला जाण्याअगोदर आपल्या नोकरांना बोलावून आपल्या मालमत्तेवर लक्ष देण्यास सांगणाऱ्या मनुष्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे. |
15. | त्याच्यांतील एकाला त्याने पाच थैल्या रुपये दिले. दुसऱ्याला त्याने दोन थैल्या रुपये दिले आणि तिसऱ्याला त्याने एक थैली रुपये दिले. प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे त्याने पैसे दिले. मग तो आपल्या प्रवासाला गेला. |
16. | ज्याला पाच थैल्या रुपये दिले होते त्याने त्याप्रमाणे काम करायला सुरूवात केली आणि आणखी पाच थैल्या रुपये त्याने मिळविळे. |
17. | त्याचप्रमाणे, ज्याला दोन थैल्या रूपये मिळले होते त्याने आणखी दोन थैल्या रुपये कमविले. |
18. | पण ज्याला एक थैली मिळाली होती, त्याने जमिनीत एक खड्डा खोदला आणि मालकाचे पैसे त्यात लपविले. |
19. | “बराच काळ लोटल्यांनंतर त्या नोकरांचा मालक आला व त्याने त्यांचा हिशेब घ्यायला सुरुवात केली. |
20. | ज्याला पाच थैल्या रुपये मिळाले होते, त्याने मालकाकडे रुपयाच्या आणखी पाच थैल्या आणून दिल्या, तो म्हणाला, मालक, तुम्ही दिलेल्या रुपयांवर मी आणखी पाच थैल्या रुपये मिळविले.’ |
21. | त्याचा मालक म्हणाला, शाब्बास, चांगल्या आणि इमानी दासा, तू भरंवसा ठेवण्यायोग्य नोकर आहेस. त्या थोड्या पैशांचा तू चांगला वापर केलास म्हणून मी पुष्कळांवर तुझी नेमणूक करीन. आत जा आणि आपल्या मालकाच्या आनंदात सहभागी हो! |
22. | “नंतर ज्या मनुष्याला रुपयांच्या दोन थैल्या मिळाल्या होत्या, तो मालकाकडे आला आणि म्हणाला, ‘मालक, तुम्ही मला रुपयांच्या दोन थैल्या दिल्या होत्या त्यापासून मी आणखी दोन थैल्या कमाविल्या. |
23. | “मालक म्हणाला, चांगल्या आणि इमानी दासा! तू थोड्या पैशाविषयी इमानीपणे वागलास, म्हणून मी तुझी आणखी पुष्कळशा गोष्टींवर नेमणूक करीन. आत जा आणि आपल्या मालकाच्या आनंदात सहभागी हो! |
24. | “नंतर ज्याला रुपयाची एक थैली मिळाली होती तो मालकाकडे आला व म्हणाला, मालक, मला माहीत होते की आपण एक करड्या शिस्तीचे मनुष्य आहात. जेथे पेरणी केली नाही तेथे तुम्ही कापणी करता आणि जेथे बी पेरले नाही तेथे पीक घेता. |
25. | मला आपली भीति होती. म्हणून मी जाऊन तुमच्या रुपयाची थैली जमिनीत लपवून ठेवली. हे घ्या! हे तुमचेच आहेत! |
26. | “मालकाने उत्तर दिले, अरे वाईट आणि आळशी नोकरा! मी जेथे पेरणी केली नाही तेथे कापणी करतो आणि जेथे बी पेरले नाही तेथे पीक घेतो, हे तुला माहीत होते. |
27. | तर तू माझे पैसे पेढीत ठेवायचे होतेस म्हणजे मी घरी आल्यावर मला व्याजासहित पैसे मिळाले असते. |
28. | “म्हणून मालकाने दुसऱ्या नोकरांना सांगितले, याच्याजवळची रुपयांची थैली घ्या आणि ज्याच्याजवळ रुपयांच्या दहा थैल्या आहेत त्याला द्या. |
29. | कारण आपल्याकडे जे आहे, त्याचा वापर करणाऱ्याला आणखी देण्यात येईल, आणि त्याला त्याच्या गरजेपेक्षा जास्त मिळेल. पण जो आपल्याजवळ असलेल्याचा उपयोग करीत नाही त्याच्याजवळ जे काही असेल ते सर्व त्याजपासून काढून घेण्यात येईल. |
30. | नंतर मालक म्हणाला, त्या निकामी नोकराला बाहेरच्या अंधारात घालवून द्या. तेथे रडणे व दात खाणे चालेल. |
31. | “मनुष्याचा पुत्र जेव्हा त्याच्या स्वर्गीय गौरवाने आपल्या देवदूतांसह येईल तेव्हा तो त्याच्या गौरवी आसनावर बसेल. |
32. | मग सर्व राष्ट्रे त्याच्यासमोर एकत्र जमतील. त्यांना तो एकमेकांपासून विभक्त करील. ज्याप्रमाणे मेंढपाळ मेंढरे शेरडांपासून वेगळी करतो. |
33. | तो मेंढरांना आपल्या उजवीकडे बसवील पण शेरडांना तो डावीकडे बसवील. |
34. | “मग राजा जे त्याच्या उजवीकडे आहेत त्यांना म्हणेल, या, जे तुम्ही माझ्या पित्याचे आशीर्वादित आहात! जे तुमच्यासाठी तयार केले आहे त्या राज्याचे वतनदार व्हा. हे राज्य जगाच्या स्थापनेपासून तयार केले आहे. |
35. | हे तुमचे राज्य आहे कारण जेव्हा मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले. मी तहानेला होतो तेव्हा तुम्ही मला प्यावयास दिले. मी प्रवासी असता तुम्ही माझा पाहुणचार केलात |
36. | मी कपड्यांशिवाय होतो तेव्हा तुम्ही मला कपडे दिलेत. मी आजारी होतो, तेव्हा तुम्ही माझी काळजी घेतलीत. मी तुरूंगात होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे समाचारासाठी आलात. |
37. | ‘मग जे नीतिमान आहेत ते उत्तर देतील, प्रभु आम्ही तुला केव्हा भुकेला व तहानेला पाहिला आणि तुला खायला आणि प्यायला दिले? |
38. | आम्ही तुला प्रवासी म्हणून कधी पाहिले आणि तुझा पाहुणचार केला? किंवा आम्ही तुला केव्हा उघडे पाहिले व कपडे दिले? |
39. | आणि तू आजारी असताना आम्ही तुला कधी भेटायला आलो? किंवा तुरूंगात असताना कधी तुझ्या समाचारास आलो? |
40. | “मग राजा त्यांना उत्तर देईल, मी तुम्हांला खरे सांगतो: येथे असलेल्या माझ्या बांधवातील अगदी लहानातील एकाला तुम्ही केले, तर ते तुम्ही मलाच केले. |
41. | मग राजा आपल्या डाव्या बाजूच्यांना म्हणेल, ‘माझ्यापासून दूर जा, तुम्ही शापित आहात, अनंतकाळच्या अग्नीत जा. हा अग्नी सैतान व त्याच्या दूतांसाठी तयार केला आहे. |
42. | ही तुमची शिक्षा आहे कारण मी भुकेला होतो पण तुम्ही मला काही खायला दिले नाही, मी तहानेला होतो पण तुम्ही मला काही प्यावयास दिले नाही. |
43. | मी प्रवासी असता माझा पाहुणचार केला नाही. मी वस्त्रहीन होतो. पण तुम्ही मला कपडे दिले नाहीत. मी आजारी आणि तुरूंगात होतो पण तुम्ही माझी काळजी घेतली नाही. |
44. | “मग ते लोक सुद्धा त्याला उत्तर देतील, प्रभु आम्ही कधी तुला उपाशी अगर तहानेले पाहिले किंवा प्रवासी म्हणून कधी पाहिले? किंवा वस्त्रहीन, आजारी किंवा तुरूंगात कधी पाहिले आणि तुला मदत केली नाही? |
45. | “मग राजा त्यांना उत्तर देईल, मी तुम्हांला खरे सांगतो: माझ्या अनुयायतील लहानातील लहानाला काही करण्याचे जेव्हा तुम्ही नाकारले, तेव्हा तेव्हा ते तुम्ही मला करण्याचे नाकारले. |
46. | मग ते अनीतिमान लोक अनंतकाळच्या शिक्षेसाठी जातील, पण नीतिमान अनंतकाळच्या जीवनासाठी जातील.” |
← Matthew (25/28) → |