← Mark (7/16) → |
1. | काही परूशी आणि नियमशास्त्राचे शिक्षक जे यरूशलेमेहून आले होते ते येशूभोवती जमले. |
2. | आणि त्यांनी त्याच्या काही शिष्यांना अशुद्ध (म्हणजे हात न धुता) हातांनी जेवताना पाहिले. |
3. | (कारण परूशी व इतर सर्व यहूदी वाडवडिलांच्या रुढी पाळून विशिष्ट रीतीने नीट हात धुतल्याशिवाय जेवत नाहीत.) |
4. | बाजारातून आणलेली कुठलीही वस्तू धुतल्याशिवाय ते खात नाहीत. त्यांच्या पूर्वजांच्या इतर अनेक चालारीति ते पाळतात आणि प्याले, घागरी, तांब्याची भांडी धुणे अशा दुसऱ्या इतर रुढीही पाळतात. |
5. | मग परूशी व नियमशास्त्राचे शिक्षक यांनी येशूला विचारले, “तुझे शिष्य वाडवडिलांच्या रुढी का पाळत नाहीत? हात न धुता का जेवतात?” |
6. | येशू त्यांना म्हणाला, “यशयाने जेव्हा तुम्हा ढोंगी लोकांविषयी भविष्य केले तेव्हा त्याचे बरोबरच होते. यशया लिहितो, ‘हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात परंतु त्याची अंत:करणे माझ्यापासून दूर आहेत, |
7. | ते व्यर्थ माझी उपासना करतात कारण ते लोकांना शास्त्र म्हणून जे शिकवितात ते मनुष्यांनी केलेले नियम असतात.’ यशया 29:13 |
8. | तुम्ही देवाच्या आज्ञा पाळत नाही, तर आता तुम्ही मनुष्याची शिकवण पाळता आहात.” |
9. | आणखी’तो त्यांना म्हणाला, “आपल्या स्वत:च्या रूढी प्रस्थापित करण्यासाठी देवाच्या आज्ञा दूर करण्यात तुम्ही पटाईत आहात. |
10. | मोशे म्हणाला, “तू आपल्या आईवडिलांचा सन्मान कर.” जो मनुष्य आपल्या वडिलांबद्दल किंवा आईबद्दल वाईट बोलतो, त्याला ठार मारलेच पाहिजे. |
11. | परंतु तुम्ही शिकविता, एखादा मनुष्य आपल्या आईला व वडिलांना असे म्हणू शकतो की, तुम्हांला मदत करण्यासाठी माझ्याकडे थोडेफार आहे. परंतु तुम्हाला मदत करण्यासाठी मी ते वापरणार नाही. मी ते देवाला देईन.’ |
12. | तुम्ही त्याला त्याच्या वडिलांसाठी किंवा आईसाठी कही करू देत नाही. |
13. | तुम्ही अशा रूढी पाळण्याचे शिकवून रुढींनी देवाचे वचन रद्द करता आणि तुम्ही अशा प्रकारच्या अनेक गोष्टी करता. |
14. | येशूने लोकांना आपल्याकडे पुन्हा बोलावून म्हटले, “प्रत्येकाने माझे ऐका व हे समजून घ्या. |
15. | बाहेरून मनुष्याच्या आत जाऊन त्याला अपवित्र करील असे काही नाही. ज्या कुणाला ऐकायला कान आहेत तो ऐको.” |
17. | लोकसमुदायाला सोडून येशू घरात गेला तेव्हा शिष्यांनी त्याला या दाखल्याविषयी विचारले, |
18. | तो त्यांना म्हणाला, “तुम्हांलादेखील हे समजत नाही काय?” जे बाहेरून मनुष्याच्या आत जाते ते त्याला अपवित्र करीत नाही हे तुम्हांला समजत नाही का? |
19. | कारण ते त्याच्या अंत:करणात जात नाही तर त्याच्या पोटात जाते. नंतर ते शरीराबाहेर जाते. असे सांगून सर्व अन्न त्याने शुद्ध घोषित केले. |
20. | आणखी तो म्हणाला, “जे माणसाच्या आतून बाहेर पडते ते माणसाला अपवित्र करते. कारण आतून म्हणजे अंत:करणातून वाईट विचार बाहेर पडतात. |
21. | जारकर्म, चोरी, खून, |
22. | व्यभिचार, लोभ, वाईटपणा, कपट, असभ्यता, मत्सर, शिव्यागाळी, अहंकार आणि मूर्खपणा, |
23. | या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर पडतात आणि माणसाला अपवित्र करतात.” |
24. | येशू त्या ठिकाणाहून निघाला आणि सोर प्रांताच्या आसपासच्या प्रदेशात गेला. तो एका घरात गेला व हे कोणाला कळू नये अशी त्याची इच्छा होती. परंतु तो त्याची उपस्थिती लपवू शकला नाही. एका स्त्रीने ऐकले की येशू तेथे आहे. तिच्या मुलीला अशुद्ध आत्मा लागलेला होता. |
25. | ती स्त्री आली व येशूच्या पाया पडली. |
26. | ती स्त्री ग्रीक होती व सिरीयातील फिनीशिया येथे जन्मली होती. तिने येशूला आपल्या मुलीतून भूत काढण्याची विनंती केली. |
27. | येशू तिला म्हणाला, “प्रथम मुलांना तृप्त होऊ दे कारण मुलांची भाकरी घेऊन कुत्र्याला टाकणे योग्य नव्हे. |
28. | परंतु ती त्याला म्हणाली, “प्रभु, कुत्रीसुद्धा मुलांच्या हातून मेजाखाली पडलेला चुरा खातात.” |
29. | येशू त्या स्त्रीला म्हणाला, “तुझ्या या उत्तरामुळे तू शांतीने घरी जा. तुझ्या मुलीतून भूत निघून गेले आहे.” |
30. | मग ती घरी आली तिची मुलगी अंथरुणावर पडली आहे व तिच्यातून भूत निघून गेले आहे. असे तिने पाहिले. |
31. | येशू सोर भोवतलच्या प्रदेशातून परतला आणि सिदोनाहून दकापलिसच्या वाटेने गालील समुद्राकडे आला. |
32. | तेथे काही लोकांनी एका बहिऱ्या तोतऱ्या मनुष्याला येशूकडे आणले व आपण त्याच्यावर हात ठेवा अशी विनंति केली. |
33. | येशूने त्याला लोेकांपासून एका बाजूस घेऊन त्याच्या कानात आपली बोटे घातली. नंतर तो थुंकला आणि त्या माणसाच्या जिभेला स्पर्श केला. |
34. | त्याने स्वर्गाकडे पाहून मोठा उसासा टाकला व म्हणाला, “एफ्फात्था” म्हणजे मोकळा हो. |
35. | आणि त्याच क्षणी त्याचे कान मोकळे झाले. त्याला बोलता येऊ लागले. त्याने कोणाला सांगू नका अशी आज्ञा केली. |
36. | येशू नेहमी अशा गोष्टी न सांगण्याविषयी लोकांना सूचना देऊ लागला, (पण लोक त्याविषयी अधिकाअधिक सांगत गेले.) |
37. | ते लोक फारच आश्चर्यचकित झाले व म्हणाले, “त्याने सर्व काही चांगले केले आहे. तो बहिऱ्यांना ऐकण्यास आणि मुक्यांना बोलावयास लावतो.” |
← Mark (7/16) → |