Mark (14/16)  

1. वल्हांडण आणि बेखमीर भाकरीच्या सणाच्या दोन दिवस अगोदर प्रमुख याजक आणि नियमशास्त्राचे शिक्षक कपटाने त्याला धरून जिवे मारण्याचा मार्ग शोधीत होते.
2. कारण ते म्हणत होते “आपण ते सणात करू नये नाही तर लोक दंगा करतील.”
3. येशू बेथानी येथे शिमोन कुष्ठरोगी याच्या घरी मेजावर जेवायला बसला असता कोणी एक स्त्री वनस्पतींपासून बनविलेल्या शूद्ध, सुगंधी तेलाची फार मौल्यवान अलाबास्त्र कुपी घेऊन आली. तिने अलाबास्त्र कुपी फोडली आणि सुगंधी तेल येशूच्या मस्तकावर ओतले.
4. तेथे असलले काही लोक रागावले, ते एकमेकांना म्हणाले, “सुगंधी तेलाचा असा नाश व्हावा हे बरे नाही.
5. कारण हे सुगंधी तेल तीस दिनारापेक्षा अधिक किंमतीला विकता आले असते आणि ते पैसे गरीबांना देता आले असते.” त्यांनी तिच्यावर कडक टीका केली.
6. पण येशू म्हणाला, “तिला एकाकी असू द्या. तिला का त्रास देता? तिने माझ्यासाठी एक सुंदर कृत्य केले आहे.
7. गरीब तर नेहमी तुमच्याजवळ असतील आणि पाहिजे त्या वेळेला त्यांना मदत करणे तुम्हांला शक्य आहे. परंतु मी नेहमीच तुमच्याबरोबर असेन असे नाही.
8. तिला शक्य झाले ते तिने केले. तिने दफनविधीच्या तयारीच्या काळाअगोदरच माझ्या शरीरावर सुगांधी तेल ओतले आहे.
9. मी तुम्हांला खरे सांगतो सर्व जगात जेथे कोठे सुवार्तेची घोषणा केली जाईल तेथे तिची आठवण म्हणून तिने जे केले ते नेहमीच सांगतले जाईल.”
10. नंतर बारा शिष्यांपैकी एक, यहूदा इस्कर्योत येशूला विश्वासघाताने धरून देण्यासाठी प्रमुख याजकांकडे गेला.
11. त्यांना हे ऐकून आनंद झाला. आणि त्यांनी त्याला पैसे देण्याचे वचन दिले. मग यहूदा येशूला धरून त्यांच्या हातात देण्याची संधि पाहू लागला.
12. बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी जेव्हा वल्हांडण सणाचा कोकरा मारीत असत तेव्हा येशूचे शिष्य त्याला म्हणाले, “आम्ही जातो आणि वल्हांडण सणाच्या भोजनाची तयारी करतो. आम्ही कोठे जाऊन तयारी करावी अशी आपली इच्छा आहे?”
13. येशूने आपल्या दोघा शिष्यांना पाठविले आणि त्यांना सांगितले, “शहरात जा, आणि पाण्याचे भांडे घेऊन जाणारा मनुष्य तुम्हांला भेटेल, त्याच्या मागे जा.
14. आणि जेथे तो आत जाईल त्या घराच्या मालकास सांगा, ‘गुरुजी म्हणतात, जेथे मला माझ्या शिष्यांबरोबर वल्हांडण सणाचे भोजन करणे शक्य होईल अशी खोली कोठे आहे?’
15. आणि तो तुम्हांला माडीवरची एक मोठी नीटनेटकी केलेली खोली दाखवील, तेथे आपांसाठी तयारी करा.”
16. शिष्य निघाले आणि ते शहरात गेले. आणि येशूने सांगितल्याप्रमाणे त्यांना सर्व आढळले. मग त्यांनी वल्हांडण सणाच्या भोजनाची तयारी केली.
17. संध्याकाळ झाली तेव्हा येशू बारा जणांसह आला.
18. मेजावर बसून ते जेवीत असता येशू म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो, तुमच्यापैकी जो एक जण मला शत्रूच्या स्वाधीन करून देईल, तो माझ्याबरोबर येथे जेवीत आहे.”
19. शिष्य अतिशय खिन्न झाले व प्रत्येक जण त्याला म्हणू लागला, “तो मी आहे का?”
20. तो त्यांना म्हणाला, “बारा जणांपैकी एक जो माझ्याबरोबर ताटात भाकर बुडवीत आहे तोच.
21. हाय, हाय, त्याच्याविषयी पवित्र शास्त्रात जसे लिहिले आहे, तसा मनुष्याचा पुत्र जाईल, परंतु ज्याच्याकडून मनुष्याचा पुत्र धरून दिला जाईल, त्याचा नाश होवो. तो जन्मला नसता तर ते त्याच्यासाठी बरे झाले असते.”
22. ते भोजन करीत असता येशूने भाकर घेतली, उपकारस्तुति केली, ती मोडली आणि त्यांना दिली. तो म्हणाला, “घ्या, हे माझे शरीर आहे.”
23. नंतर येशूूने प्याला घेतला, उपकारस्तुति केली. तो प्याला त्यांना दिला आणि सर्व त्यांतून प्याले.
24. मग येशू म्हणाला, “हे माझे नव्या कराराचे रक्त आहे. पुष्कळांसाठी ते ओतले जात आहे.
25. मी तुम्हांला खरे सांगतो की, देवाच्या राज्यात मी नवा द्राक्षारस पिईन त्या दिवसापर्यंत मी यापुढे द्राक्षाचा उपज (द्राक्षारस) पिणार नाही.”
26. नंतर त्यांनी उपकारस्तुतिचे गीत गाईले व ते जैतुनाच्या डोंगराकडे निघून गेले.
27. येशू शिष्यांना म्हणाला, “तुम्ही सर्व विशवास गमावून बसाल. कारण असे लिहिले आहे की, ‘मी मेंढपाळास मारीन आणि मेंढरे विखुरली जातील.’ जखऱ्या 13:7
28. परंतु माझे पुनरूत्थान झाल्यावर मी तुमच्यापुढे गालीलात जाईन.”
29. पेत्र म्हणाला, “इतर सर्वांनी जरी त्यांचा विश्वास गमावला तरी मी गमावणार नाही.”
30. मग येशू त्याला म्हणाला, “मी तुला खरे सांगतो, आज रात्री दोनदा कोंबडा आरवण्यापुर्वी तू तीन वेळा मला नाकारशील.”
31. तरीही पेत्र अधिक आवेशाने म्हणाला, “जरी मला आपणांबरोबर मरावे लागले तरी सुद्धा मी आपणांला नाकारणार नाही.” आणि इतर सर्व जण तसेच म्हणाले.
32. नंतर ते गेथशेमाने म्हटलेल्या जागी आले, तेव्हा येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, “मी प्रार्थना करीपर्यंत येथे बसा.”
33. येशूने आपल्याबरोबर पेत्र, याकोब व योहान यांना घेतले. दु:ख व वेदनांनी त्याचे मन भरून आले.
34. तो त्यांना म्हणाला, “माझा जीव मरणाइतका वेदना सोशीत आहे. येथे राहा व जागृत असा.”
35. त्यांच्यापासून थोडे दूर अंतरावर जाऊन तो जमिनीवर पडला आणि त्याने प्रार्थना केली की, “शक्य असेल तर ही घटका मजपासून टळून जावो.”
36. तो म्हणाला, “अब्बा बापा, तुला सर्व काही शक्य आहे. हा प्याला मजपासून दूर कर पण मला पाहिजे ते नको तर तुला पाहिजे ते कर. (माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे कर.)”
37. नंतर येशू आला आणि त्यांना झोपलेले पाहिले. तो पेत्राला म्हणाला, “शिमोना, तू झोपी गेलास काय? तासभर तुझ्याच्याने जागे राहवत नाही काय?
38. जागृत राहा आणि प्रार्थना करा म्हणजे तुम्ही मोहात पडणार नाही. आत्मा उत्सुक आहे पण देह अशक्त आहे.”
39. पुन्हा येशू दूर गेला आणि त्याच गोष्टी उच्चारून त्याने प्रार्थना केली.
40. नंतर तो परत आला व त्याला ते झोपलेले आढळले. कारण त्यांचे डोळे जड झाले होते आणि त्याला काय उत्तर द्यावे हे त्यांना कळेना.
41. तो पुन्हा तिसऱ्या वेळेस आला आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही अजूनही झोपलेले आणि विश्रांति घेत आहात काय? पुरे झाले! आता वेळ आली आहे. मनुष्याचा पुत्र पाप्यांच्या हाती धरून दिला जात आहे.
42. उठा, आपण जाऊ या. पाहा, मला धरून देणारा मनुष्य इकडे इकडे येत आहे.”
43. आणि येशू बोलत आहे तोपर्यंत बारा जणांपैकी एक - यहूदा आला. त्याच्याबरोबर मुख्य याजक व नियमशास्त्रचे शिक्षक आणि वडील यांनी पाठविलेले अनेक लोक तलवारी व सोटे घेऊन आले.
44. घात करून देणाऱ्याने त्यांना अशी खूण दिली होती की, “मी ज्या कोणाचे चुंबन घेईन तोच तो आहे, त्याला धरा आणि बाजूला काढा.”
45. मग यहूदा आल्याबरोबर तो येशूकडे गेला आणि म्हणाला, “गुरूजी!” आणि यहूदाने येशूचे चुंबन घेतले.
46. नंतर त्यांनी त्याच्यावर हात टाकले आणि त्याला अटक केली.
47. तेथे जवळ उभे असलेल्यांपैकी एकाने आपली तलवार काढली आणि मुख्य याजाकाच्या नोकरावर वार करून त्याचा कान कापून टाकला.
48. नंतर येशू त्यांना म्हणाला, “मी लूटारू असल्याप्रमाणे तुम्ही तलवारी आणि सोटे घेऊन मला पकाडायला बाहेर पडलात काय?”
49. मी दररोज मंदिरात शिकवीत असता तुम्हांबरोबर होतो आणि तुम्ही मला अटक केली नाही. परंतु शास्त्रलेख पूर्ण झालाच पाहिजे.”
50. सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले.
51. एक तरूण मनुष्य अंगावर तागाचे वस्त्र पांघरून त्याच्या मागे चालत होता. त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला,
52. परंतु तो तागाचे वस्त्र टाकून उघाडाच पळून गेला.
53. नंतर त्यांनी येशूला तेथून मुख्य याजकाकडे नेले. आणि सर्व मुख्य याजक, वडील व नियमशास्त्राचे शिक्षक जमा झाले.
54. थोडे अंतर ठेवून पेत्र येशूच्या मागे थेट मुख्य याजकाच्या वाड्यात गेला. तेथे पेत्र पहारेकऱ्याबरोबर विस्तवाजवळ शेकत बसला.
55. मुख्य याजक आणि सर्व यहूदी सभा येशूला जिवे मारण्यासाठी पुरावा गोळा करण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु त्यांना काही मिळेना.
56. पुष्कळांनी त्याच्याविरूद्ध खोटी साक्ष दिली. परंतु त्यांची साक्ष सारखी नव्हाती.
57. नंतर काही जण उभे राहीले आणि त्याच्या विरूद्ध साक्ष देऊन म्हणाले, “आम्ही त्याला असे म्हणताना ऐकले की,
58. “हाताने बांधलेले मंदिर मी पाडून टाकीन आणि हातांनी न बांधलेले असे दुसरे मंदिर तीन दिवसात उभारीन.’
59. परंतु तरीही या बाबातीत त्यांच्या साक्षीत मेळ नव्हता.
60. नंतर मुख्य याजक त्यांच्यापुढे उभा राहिले आणि त्याने येशूला विचारले, “तू उत्तर देणार नाहीस काय? हे लोक तुझ्याविरूद्ध आरोप करताहेत हे कसे?”
61. परंतु येशू गप्प राहिला. त्याने उत्तर दिले नाही. नंतर मुख्य याजकाने पुन्हा विचारले, “धन्य देवाचा पुत्र तो तू रिव्रस्त आहेस काय?”
62. येशू म्हणाला, “मी आहे, आणि तुम्ही मनुष्याच्या पुत्राला सर्वसमर्थ देवाच्या उजवीकडे बसलेले व आकाशातील मेघांसह येताना पाहाल.”
63. मुख्य याजकाने आपले कपडे फाडले आणि म्हणाला, “आपणांला अधिक साक्षीदारांची काय गरज आहे?
64. तुम्ही निंदा ऐकली आहे. तुम्हांला काय वाटते?” सर्वांनी त्याला मरणदंड योग्य आहे अशी शिक्षा फर्माविली.
65. काही जण त्याच्यावर थंुकू लागले. त्याचे तोंड झाकून बुक्के मारू लागले व त्याला म्हणू लागले, “ओळख बरे, तुला कोणी मारले?” पाहारेकऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले आणि मारले.
66. पेत्र अंगणात असतानाच मुख्य याजकांच्या दासींपैकी एक आली.
67. आणि तिने पेत्राला शेकताना पाहिले. तेव्हा तिने त्याच्याकडे निरखून पाहिले व म्हणाली, “तू सुद्धा नासरेथकर येशूबरोबर होतास ना?”
68. परंतु पेत्राने ते नाकारले, आणि म्हणाला, “तू काय म्हणतेस हे मला कळत नाही व समजतही नाही.” पेत्र अंगणाच्या दरवाजाच्या देवडीवर गेला आणि कोंबडा आरवला.
69. जेव्हा दासीने त्याला पाहिले तेव्हा जे लोक तेथे होते त्यांना ती म्हणू लागली की, “हा मनुष्य त्यांच्यापैकीच एक आहे.”
70. पेत्राने पुन्हा ते नाकारले. नंतर थोड्या वेळाने तेथे उभे असलेले लोक पेत्राला म्हणाले, “खात्रीने तू त्यांच्यापैकी एक आहेस, कारण तू सुद्धा गालीली आहेस.”
71. पेत्र स्वत:ची निर्भत्सना करीत व शपथ वाहून म्हणाला, “तुम्ही ज्या माणसाविषयी बोलत आहात त्याला मी ओळखत नाही!”
72. आणि लगेच दुसऱ्यांदा कोंबडा आरवला. “दोन वेळा कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील,” असे येशू म्हणाला होता याची पेत्राला आठवण झाली व तो अतिशय दु:खी झाला व ढसढसा रडला.

  Mark (14/16)