Mark (1/16) → |
1. | देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या शुभवर्तमानाची सुरूवात. |
2. | यशया संदेष्ट्याच्या पुस्तकात असे लिहिले आहे: “ऐका! मी माझ्या दूताला तुझ्याकडे पाठवीत आहे तो तुझ्यासाठी मार्ग तयार करील. मलाखी 3:1 |
3. | तेथे रानात एक व्यक्ति ओरडून सांगत होती: ‘प्रभूसाठी मार्ग तयार करा, त्याच्यासाठी वाटा सरळ करा.”‘ यशया 40:3 |
4. | मग बाप्तिस्मा करणारा योहान आला व रानात लोकांचे बाप्तिस्मे करू लागला. लोकांना त्याने सांगीतले की, जर त्यांना त्यांची अंत:करणे बदलायची असतील तर त्यांनी पश्चात्तापाचा बाप्तिस्मा घ्यायला पाहिजे. मग त्यांच्या पापांची क्षमा केली जाईल. |
5. | यहूदीया व यरूशलेम येथील सर्व लोक योहानाकडे आले, त्यांनी आपली पापे कबूल केल्यावर त्याने त्यांचा यार्देन नदीत बाप्तिस्मा केला. |
6. | योहान उंटाच्या केसांपासून केलेली वस्त्रे वापरीत असे. त्याच्या कंबरेला कातड्याचा पट्टा होता आणि तो टोळ व रानमध खात असे. |
7. | योहानाने लोकांना हा संदेश दिला: “माझ्यापेक्षाही महान असा कोणी एक येत आहे, तो माझ्यानंतर येत आहे. मी त्याच्या वहाणांचा बंद सोडण्याच्यादेखील पात्रतेचा नाही. |
8. | मी तुमचा पाण्याने बाप्तिस्मा करतो पण तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करील.” |
9. | त्यावेळी येशू गालीलातील नासरेथहून जेथे योहान होता त्या ठिकाणी आला. यार्देन नदीत योहानाने येशूचा बाप्तिस्मा केला. |
10. | येशू पाण्यातून वर येत असता त्याने आकाश उघडलेले पाहिले. आणि पवित्र आत्मा त्याच्यावर कबुतरासारखा आला. |
11. | आकाशातून वाणी झाली. ती म्हणाली, “तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्यावर मी प्रेम करतो. तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.” |
12. | नंतर आत्म्याने येशूला एकट्याला रानात पाठविले. |
13. | येशू रानात चाळीस दिवस होता. तो तेथे हिंस्त्र प्राण्यांबरोबर होता. तो तेथे असता सैतान त्याला मोह पाडून त्याची परीक्षा बघत होता. पण दूत येऊन त्याची सेवा करीत होते. |
14. | यानंतर, योहानाला तुरुंगात टाकण्यात आले. येशू गालीलास गेला व देवाकडून आलेली सुवार्ता त्याने सांगितली. |
15. | येशू म्हणाला, “आता योग्य वेळ आली आहे. देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चात्ताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा. |
16. | येशू गालीलाच्या सरोवराजवळून जात होता तेव्हा त्याने शिमोन व शिमोनाचा भाऊ अंद्रिया याला सरोवरात जाळे टाकताना पाहिले कारण ते मासे धरणारे होते. |
17. | येशू त्यांना म्हणाला, “माझ्या मागे या म्हणजे मी तुम्हांला माणसे धरणारे करीन. |
18. | मग ते लगेचच जाळी सोडून त्याच्यामागे चालू लागले. |
19. | आणि तो थोडा पुढे गेल्यावर त्याला जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान हे दिसले. ते त्यांच्या नावेत होते व आपली जाळी तयार करीत होते. |
20. | त्याने लगेच त्यांना हाक मारली. मग त्यांनी आपले वडील जब्दी व नोकरचाकर यांना नावेत सोडले आणि ते त्याच्या मागे गेले. |
21. | येशू व त्याचे शिष्य कफर्णहूमास गेले. लगेच येणाऱ्या शब्बाथ दिवशी येशू सभास्थानात गेला आणि लोकांना त्याने शिकविले. |
22. | त्याच्या शिकवणुकीने ते चकित झाले, कारण येशू नियमशास्त्राच्या शिक्षकांप्रमाणे शिकवीत नव्हता, तर त्याला अधिकार असल्यासारखा शिकवीत होता. |
23. | त्यांच्या सभास्थानात एक भूतबाधा झालेला मनुष्य होता, तो एकदम मोठ्याने ओरडला, |
24. | आणि म्हणाला, “नासरेथच्या येशू, तुला आमच्याकडून काय पाहिजे? तू आमचा नाश करावयास आला आहेस काय? तू कोण आहेस हे मला माहीत आहे, देवाचा पवित्र असा तू आहेस.” |
25. | परंतु येशूने त्याला अधिकारवाणीने म्हटले, “शांत राहा व याच्यातून नीघ.” |
26. | नंतर अशुद्ध आत्म्याने त्याला पिळले व तो मोठ्याने ओरडून त्याच्यातून बाहेर गेला. |
27. | आणि लोक आश्चर्यचकित झाले, व एकमेकांस विचारू लागले, “येथे काय चालले आहे? हा मनुष्य कही तरी नवीन शिकवीत आहे. आणि तो अधिकाराने शिकवीत आहे. तो दुष्ट आत्म्यांना आज्ञा करतो आणि ते त्याचे ऐकातात! |
28. | मग येशूविषयीची बातमी ताबडतोब गालीलाच्या सर्व प्रदेशात पसरली. |
29. | येशू व त्याच्या शिष्यांनी सभास्थान सोडले आणि लागलीच ते योहान व याकोब यांच्याबरोबर शिमोन व अंद्रिया यांच्या घरी गेले. |
30. | शिमोनाची सासू तापाने बिछान्यावर पडली होती. तेव्हा त्यांनी ताबडतोब येशूला तिच्याविषयी सांगिताले. |
31. | तो तिच्याकडे गेला आणि तिला हाताला धरून त्याने उठविले. आणि तिचा ताप निघून गेला व ती त्याची सेवा करू लागली. |
32. | संध्याकाळ झाली आणि सूर्य अस्ताला गेल्यावर त्यांनी सर्व आजारी लोकांस आणि भुतांनी पछाडलेल्या लोकांस त्याच्याकडे आणले. |
33. | तेव्हा सर्व शहर घरापाशी दारापुढे जमा झाले. |
34. | त्याने निरनिराळ्या रोगांनी आजारी असलेल्यांना बरे केले व अनेक लोकांतून भुते काढली. पण त्याने भुतांना बोलू दिले नाही कारण ती त्याला ओळखत होती. |
35. | अगदी पहाटेच अंधार असतानाच त्याने घर सोडले आणि तो एकांत स्थळी गेला. तेथे त्याने प्रार्थना केली. |
36. | शिमोन व त्याच्यासोबत असलेले येशूचा शोध करीत होते, |
37. | आणि जेव्हा त्यांना तो सापडला तेव्हा ते त्याला म्हणाले, “सर्वजण तुमचा शोध करीत आहेत.” |
38. | तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “आपण जवळपासच्या ठिकाणी जाऊ या, म्हणजे मला तेथे देखील उपदेश करणे शक्य होईल. कारण त्या कारणासाठीच मी बाहेर पडलो आहे.” |
39. | मग तो सर्व गालीलातून, त्यांच्या सभास्थातून उपदेश करीत आणि भुते काढीत फिरला. |
40. | एक कुष्ठरोगी येशूकडे आला व त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याने स्वत:ला बरे करण्याची विनंति केली. तो येशूला म्हणाला, “जर तुमची इच्छा असेल तर तुम्हामध्ये मला शुद्ध करण्याचे सामर्थ आहे. |
41. | येशूला त्याची दया आली. मग त्याने हात लांब केला आणि त्याला स्पर्श केला व त्याला म्हणाला, “मला तुला बरे करावयाचे आहे. तुझा कुष्टरोग बरा होवो.” |
42. | आणि लगेच त्याचे कुष्ठ गेले व तो शूद्ध झाला. |
43. | येशूने त्याला सक्त ताकीद दिली व लगेच जाण्यास सांगितले. येशू त्याला म्हणाला, |
44. | “पाहा, याविषयी कोणाला काहीही सांगू नकोस, परंतु जा आणि स्वत:ला याजकाला दाखव. व स्वत:च्या शुद्धीकरणासाठी मोशेच्या आज्ञेप्रमाणे अर्पण कर. हे यासाठी कर की, तू शुद्ध झाला आहेस याची त्या सवांर्ना साक्ष पटावी. |
45. | परंतु तो मनुष्य गेला व त्याने मोकळेपणाने सांगण्यास सुरुवात केली व ही बातमी पसरविली. याचा परिणाम असा झाला की, येशूला उघडपणे शहरात जाता येईना. म्हणून तो एकांतवासात राहिला. आणि चोहोबाजूंनी लोक त्याच्याकडे आले. |
Mark (1/16) → |