← Malachi (2/4) → |
1. | “याजकांनो, हा नियम तुमच्यासाठी आहे. माझे म्हणणे ऐका. मी काय म्हणतो तिकडे लक्ष द्या. माझ्या नावाला मान द्या. |
2. | तसे न केल्यास, तुमचेच वाईट होईल. तुम्ही ज्यांना आशीर्वाद म्हणाल, त्याचे रुपांतर शापांत होईल माझ्या नावाबद्दल आदर न दाखविल्यामुळे मी वाईट गोष्टी घडवून आणीन.” सर्वशक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या. |
3. | “लक्षात ठेवा! मी तुमच्या वंशजांना शिक्षा करीन. याजकांनो, सणांमध्ये, तुम्ही मला यज्ञबली अर्पण करता. मेलेल्या जनावरांच्या शरीरांतील आतील भाग व विष्ठा काढून तुम्ही फेकून देता. पण मी ती विष्ठा तुमच्या तोंडाना फासून, त्याबरोबर तुम्हालाही फेकून देईन. |
4. | मगच तुम्हाला मी ही आज्ञा का देत आहे, हे कळेल. माझा लेवीबरोबरचा करार राहावा म्हणून मी हे सांगत आहे” सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणाला: |
5. | परमेश्वर म्हणाला, “मी लेवीबरोबर करार केला. मी त्याला जीवन व शांती देण्याचे वचन दिले. आणि मी ते त्याला दिले. लेवीने मला मान दिला. त्याने माझ्या नावाचा आदर केला. |
6. | लेवीने मला मान दिला. त्याने खोटे शिकविले नाही लेवी प्रामाणिक होता आणि त्याला शांदीची आवड होती. तो मला मनुसरला आणि त्याने पुष्कळांना त्यांच्या पापाचरणापासून परावृत्त केले. |
7. | परमेश्वराची शिकवण याजकांना माहीत असली पाहिजे. लोकांना याजकांकडून देवाची शिकवण घेता यावी. याजक लोकांसाठी देवाचा दूत असावा.” |
8. | परमेश्वर म्हणाला, “तुम्ही याजकांनी मला अनुसरायचे सोडून दिले. तुम्ही अनेक लोकांना चुकीने वागण्यासाठी आपल्या शिकवणुकीचा उपयोग केलात. लेवीबरोबरच्या कराराचा तुम्ही भंग केलात.” सर्वशक्तिमान परमेश्वर हे म्हणाला. |
9. | “तुम्ही मी सांगितलेल्या मार्गाने जात नाही. माझी शिकवण लोकांना सांगत असता तुम्ही पक्षपात केलात. म्हणून मी तुम्हाला महत्वहीन करीन. लोक तुम्हाला मान देणार नाहीत.” |
10. | आमचा पिता (देव) एकच आहे. आपल्यातील प्रत्येकाला एकाच देवाने निर्माण केले आहे. मग लोक आपल्या भावांनाच का फसवितात? ते लोक कराराचा मान ठेवीत नाहीत. आमच्या पूर्वजांनी देवाशी केलेल्या कराराचा ते मान राखत नाहीत. |
11. | यहूद्यांच्या लोकांनी इतरांना फसविले. यरुशलेमवासीयांनी आणि इस्राएल लोकांनी भयानक कृत्ये केली. यहूद्यांच्या लोकांनी परमेश्वराच्या पवित्र मंदिराचा अपमान केला. देवाला ते स्थान प्रिय आहे. यहूद्यांच्या लोकांनी त्या परक्या देवतेची पूजा करण्यास सुरवात केली. |
12. | त्या लोकांना, परमेश्वर, यहूदाच्या कुळांतून वगळेल. ते कदाचित् परमेश्वराला अर्पण करण्यासाठी भेटी आणतील. पण त्याचा उपयोग होणार नाही. |
13. | तुम्ही आक्रंदन करुन, परमेश्वराची वेदी अश्रूंनी भिजविलीत, तरी परमेश्वर तुमच्या भेटी स्वीकारणार नाही. तुम्ही परमेश्वराला अर्पण करण्यास आणलेल्या गोष्टींनी, तो प्रसन्न होणार नाही. |
14. | तुम्ही विचारता “परमेश्वर आमच्या भेटी का स्वीकारत नाही?” का? कारण तुम्ही केलेली दुष्कृत्ये त्याने पाहिली आहेत. परमेश्वर तुमच्याविरुध्दचा साक्षीदार आहे. तुम्ही तुमच्या पत्नीची फसवणूक करताना त्याने पाहिले. तरुण असताना तिच्याशी विवाह केलास. ती तुमची मैत्रीण होती. नंतर तुम्ही एकमेकांजवळ शपथा घेतल्या व ती तुझी पत्नी झाली. पण तू तिला फसविलेस. |
15. | पती-पत्नींनी शरीरांनी व मनांनी एक व्हावे अशी देवाची इच्छा आहे. का? मग त्यांची मुलेही पवित्र होतील. म्हणून आध्यात्मिक ऐक्याचे रक्षण करा. तुमच्या पत्नीला फसवू नका. तुमच्या तारुण्यापासून ती तुमची अधार्गांगिती आहे. |
16. | इस्राएलचा परमेश्वर देव म्हणतो, “घटस्फोटाचा मला तिटकारा आहे. आणि पुरुष करीत असलेल्या दुष्ट कर्मांची मला घृणा वाटते. म्हणून तुमच्या आध्यात्मिक ऐक्याचे रक्षण करा. तुमच्या पत्नीला फसवू नका.” |
17. | तुम्ही चुकीच्या गोष्टी शिकविल्या त्यामुळे परमेश्वराला फार दु:ख झाले. दुष्कृत्ये करणारे लोक देवाला आवडतात, असे तुम्ही शिकविले. देवाला हे लोक चांगले वाटतात, असे तुम्ही सांगितले. दुष्कृत्ये करणाऱ्यांना देव शिक्षा करीत नाही, असे तुम्ही शिकविले. |
← Malachi (2/4) → |