Luke (11/24)  

1. मग असे झाले की, तो एका ठिकाणी प्रार्थना करीत होता. प्रार्थना संपल्यावर शिष्यांपैकी एक जण त्याला म्हणाला, “प्रभु, योहानाने जशी त्याच्या शिष्यांना प्रार्थना शिकवली:” त्याचप्रमाणे आम्ही प्रार्थना कशी करावी ते आम्हास शिकवा.”
2. मग तो त्यांना म्हणाला, “जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा असे म्हणा: ‘पित्या, तुझे नाव पवित्र राखले जावो. तुझे राज्य येवो,
3. आम्हाला रोज लागणारी भाकर आज आम्हांला दे,
4. आणि आमच्या पापांची आम्हांला क्षमा कर, कारण आम्ही सुद्धा जे आमचे वाईट करतात त्यांची क्षमा करतो. आणि आम्हांला परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाइटापासून सोडीव.”‘
5. मग येशू त्यास म्हणाला, “समजा तुमच्यापैकी कोणाला तरी एक मित्र होता. आणि तो त्याच्याकडे मध्यरात्री गेला व त्याला म्हणाला, “मित्रा, मला तीन भाकरी उसन्या दे,
6. कारण माझा मित्र नुकताच प्रवास करुन माझ्याकडे आला आहे. आणि त्याला वाढायला माझ्याजवळ काहीही नाही.’
7. आणि समजा तो मनुष्य आतून म्हणाला, “मला त्रास देऊ नको! अगोदरच दार लावलेले आहे. आणि माझी मुले माझ्याजवळ झोपलेली आहेत. मी तुला देण्यासाठी उठू शकत नाही.’
8. मी तुम्हाला सांगतो जरी तो उठून त्याला कांही देण्याची टाळटाळ करील तरी त्याच्या मित्राच्या आग्रही वृत्तीमुळे तो खात्रीने उठून त्याला पाहिजे ते देईल.
9. आणि म्हणून मी तुम्हांला सांगतो, मागा म्हणजे तुम्हांला दिले जाईल. शोधा म्हणजे तुम्हांस सापडेल आणि ठोठवा म्हणजे तुम्हांसाठी उघडले जाईल.
10. कारण जो कोणी मागतो त्याला मिळेल. जो शोधतो त्याला सापडेल आणि जो कोणी ठोठावतो त्याच्यासाठी दार उघडले जाईल.
11. तुम्हांमध्ये असा कोण पिता आहे की, त्याच्या मुलाने त्याला मासा मागितला असता त्यास माशाऐवजी साप देईल?
12. किंवा जर मुलाने अंडे मागितले तर कोणता पिता त्याला विंचू देईल?
13. जर तुम्ही इतके वाईट असताना तुम्हांला तुमच्या मुलांना चांगल्या देण्याचे समजते, तर जे त्याच्याकडे मागतात त्यांना स्वर्गातील पिता किती तरी अधिक पवित्र आत्मा देईल?”
14. येशू एक भूत काढीत होता. ते मुके होते. मग असे झाले की, जो मनुष्य बोलू शकत नव्हता तो, भूत बाहेर आल्यावर, बोलू लागला व लोकांचा जमाव चकित झाला.
15. परंतु त्यांच्यातील काही लोक म्हणाले की, “भुतांचा प्रमुख जो बालजबूल याच्या साहाय्याने तो भुते काढतो.”
16. काहींनी त्याची परीक्षा पाहण्यासाठी स्वर्गातून चिन्ह मागितले.
17. पण त्यांच्या मनात काय होत हे त्याला माहीत होते आणि तो त्यांना म्हणाला, “आपसात फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडते आणि एखाद्या घरात एकमेकांविरुद्ध भांडतात तेव्हा त्या घराचे तुकडे होतात.
18. आणि तुम्ही म्हणता तशी जर भुतांमध्येही फूट पडली तर त्याचे राज्य कसे टिकेल? मी तुम्हांला हे विचारतो, कारण तुम्ही म्हणता मी बालजबूलच्या साहाय्याने भुते काढतो..
19. पण जर मी बालजबूलच्या साहाय्याने भुते काढतो, तर तुमचे अनुयायी (तुमची मुले) कोणाच्या साहाय्याने भुते काढतात? म्हणून तेच तुमचा न्याय करतील.
20. परंतु जर मी देवाच्या साहाय्याने भुते काढतो, तर मग हे स्पष्ट आहे की, देवाचे राज्य तुमच्याकडे आले आहे.
21. जेव्हा एखादा बलवान मनुष्य आपल्या सुरक्षिततेसाठी पूर्ण शस्त्रसामग्री बाळगतो आणि स्वत:चे रक्षण करतो तेव्हा त्याची मालमता सुरक्षित राहते.
22. परंतु कोणी त्याच्याहीपेक्षा अधिक बलवान त्याच्यावर हल्ला करुन त्याचा पराभव करतो, तेव्हा ज्या शस्त्रसामग्रीवर त्यांने भरंवसा ठेवला होता, ती तो घेऊन जातो व त्याला मिळालेली लूट आपल्या मित्रांना वाटतो.
23. जो माझ्या पक्षाचा नाही, तो माझ्याविरुद्ध आहे आणि जो माझ्याबरोबरीने गोळा करीत नाही, तर तो उधळून टाकतो.
24. जेव्हा भूत माणसाबाहेर येते व ते विसावा घेण्यासाठी निर्जल प्रदेशात जागा शोधते. पण त्याला ती विश्रांति मिळत नाही. तेव्हा तो म्हणतो, “मी ज्या घरातून बाहेर आलो त्या घरात परत जाईन.’
25. तो जातो आणि त्याला ते घर झाडून नीटनेटके केलेले आढळते.
26. नंतर तो जातो आणि आपणापेक्षा अधिक बळकट व दुष्ट असे सात आत्मे मिळवितो, आणि ते आत जातात आणि तेथेच राहतात. तेव्हा त्या मनुष्याची शेवटची अवस्था पहिल्यापेक्षा वाईट होते.”
27. असे घडले की, तो या गोष्टी बोलला तेव्हा गर्दीतील एक स्त्री मोठ्याने ओरडून त्याला म्हणाली, “धन्य ते गर्भाशय, ज्याने तुझा भार वाहिला व धन्य ती स्तने जी तू चोखलीस!”
28. परंतु तो म्हणाला, “जे देवाचे वचन ऐकतात व पाळतात ते धन्य!”
29. जसजसा लोकसमुदाय वाढू लागला, तेव्हा तो बोलू लागला, “ही पिढी दुष्ट पिढी आहे. ती चिन्ह मागत आहे, आणि योनाच्या चिन्हाशिवाय कोणतेही चिन्ह तिला दिले जाणार नाही.
30. कारण जसा योना निनवेच्या लोकांकरिता चिन्ह होता तसा मनुष्याचा पुत्रही या पिढीसाठी चिन्ह होईल.
31. दक्षिणेकडची राणी न्यायाच्या दिवशी या पिढीविरुद्ध उठेल आणि ती त्यांचा धिक्कार करील. कारण ती पृथ्वीच्या दक्षिण टोकाकडून शलमोनाचे शहाणपण ऐकण्यासाठी आली, आणि आता तर शलमोनापेक्षाही थोर असा कोणी एक थेथे आहे.
32. न्यायाच्या दिवशी निनवेचे लोक या पिढीबरोबर उभे राहतील व त्यांचा धिक्कार करतील. कारण योनाचा उपदेश ऐकून त्यांनी पश्यात्ताप केला पण आता योनापेक्षाही थोर असा कोणी येथे आहे.
33. ʇकोणी दिवा लावून तळघरात किंवा भांड्याखाली ठेवत नाहीत, उलट तो दिवठणीवर ठेवतात. यासाठी की जे कोणी आत येतात त्यांना प्रकाश दिसणे शक्य व्हावे.
34. डोळा हा तुमच्या शरीराचा दिवा आहे. जर तुमचे डोळे चांगले आहेत, तर तुमचे शरीरही प्रकाशाने भरलेले आहे.
35. पण ते जर वाईट आहेत तर तुमचे शरीर अंधकारमय आहेत तुमच्यातला प्रकाश हा अंधार तर नाही ना, याची काळजी घ्या.
36. जर तुमचे सर्व शरीर प्रकाश आहे आणि जर त्याचा एकही भाग अंधार नाही तर, जशी दिव्याची प्रकाशकिरणे तुझ्यावर प्रकाशतात, तसे ते पूर्णपणे प्रकाशतील.”
37. जेव्हा येशूने आपले बोलणे संपविले तेव्हा एका परुश्याने त्याला आपलल्याबरोबर जेवायला बोलाविले. तो आत गेला आणि आपल्या जागी रेलून बसला.
38. परंतु त्याने जेवणापूर्वी हात धुतले नाहीत हे पाहून परुश्याला फार आश्चर्य वाटले.
39. तेव्हा प्रभु त्याला म्हणाला, “तुम्ही परुशी प्याला व ताट बाहेरुन स्वच्छ करता पण तुम्ही आतून अधाशीपणाने व फसवणुकीच्या दुष्टतेने भरले आहात.
40. तुम्ही मूर्ख लोक! ज्याने बाहेरील बाजू बनवली तो आतली बाजू बनवणार नाही का?
41. पण जे आतमध्ये आहे, ते गरीबांना द्या. आणि नंतर सर्व काही तुमच्यासाठी स्वच्छ होईल.
42. परुश्यांनो तुम्हाला धिश्चार असो कारण तुम्ही पश्चात्ताप करता व पुदिन्याचा व प्रत्येक वनस्पतीचा दशांश देता. परंतु तुम्ही न्याय आणि देवाविषयीचे प्रेम याकडे दुर्लक्ष करता. तुम्ही या गोष्टी प्रथम काराव्यात व मुख्य गोष्टींकडे दुर्लक्ष करु नये.
43. परुश्यांनो तुमचा धिक्कार असो, कारण तुम्हांला सभास्थानातील महत्त्वाच्या जागी बसणे आणि बाजारात नमस्कार घेणे आवडते.
44. तुमचा धिश्चार असो कारण तुम्ही खुणा न केलेल्या कबरांसारखे आहात, अशा कबरांवर लोक नकळत पाय देऊन चालतात.”
45. नियमशास्त्राचा एक शिक्षक येशूला म्हणाला, “गुरुजी, तुम्ही असे बोलता तेव्हा तुम्ही आमचासुद्धा अपमान करता.”
46. तेव्हा येशू म्हणाला, “नियमशास्त्राच्या शिक्षकांनो तुमचाही धिक्कार असो, कारण तुम्ही लोकांना वाहण्यास कठीण असे ओझे लादता व ते उचलण्यास तुमच्या एका बोटानेसुद्धा मदत करीत नाही.
47. तुमचा धिक्कार असो, कारण तुमच्या पूर्वजांनी ठार केलेल्या भविष्यवाद्यांसाठी तुम्ही कबरा बांधता.
48. अशा प्रकारे तुमच्या पूर्वजांनी केलेल्या कृत्यांचे समर्थन करता.
49. यामुळे देवाचे ज्ञानसुद्धा असे म्हणाले, “मी प्रेषित व संदेष्ट त्यांच्याकडे पाठवील. त्यांपैकी काही जणांना ते ठार मारतील व काही जणांचा ते छळ करतील!’
50. तेव्हा या पिढीस भविष्यवाद्यांचे जे रक्त जगाच्या प्रारंभापासून सांडले गेले त्याबद्दल दंड भरुन द्यावा लागेल.
51. म्हणजे हाबेलाच्या रक्तापासून ते जखऱ्या जो देवाचे मंदिर व वेदी यांच्यामध्ये मराला गेला. खरोखर मी तुम्हांस सांगतो या पिढिला ते भरुन द्यावे लागेल.
52. “नियमशास्त्राच्या शिक्षकांनो तुमचा धिक्कार असो. कारण तुम्ही ज्ञानाची किल्ली काढून घेतली आहे. तुम्ही स्वत:ही आत गेला नाहीत आणि जे आत जाण्याचा प्रयत्न करत होते, त्यांनाही जाऊ दिले नाही.”
53. येशू तेथून निघून जात असता नियमशास्त्राचे शिक्षक व परुशी फार विरोध करु लागले व त्याला अनेक गोष्टीविषयी प्रश्न विचारु लागले.
54. तो जे बोलेल त्यामध्ये त्याला एखाद्या सावजाप्रमाणे पकडण्यासाठी टपून बसले.

  Luke (11/24)