← Job (36/42) → |
1. | अलीहू बोलणे चालू ठेवून म्हणाला: |
2. | “तू माझ्यासाठी आणखी थोडा धीर धर. देवाने मला आणखी बोलायला सांगितले आहे. |
3. | मी माझे ज्ञान सगळ्यांना वाटतो. देवाने मला निर्माण केले आणि देव न्यायी आहे हे मी सिध्द करेन. |
4. | ईयोब, मी खरे बोलत आहे आणि मी काय बोलतो आहे ते मला समजत आहे. |
5. | “देव अतिशय सामर्थ्यवान आहे, पण तो लोकांचा तिरस्कार करीत नाही. तो सामर्थ्यवान असून फार सूज्ञ आहे. |
6. | देव दुष्टांना जगू देणार नाही आणि तो गरीबांना नेहमीच न्यायाने वागवितो. |
7. | जे लोक योग्य रीतीने वागतात त्यांच्यावर देव नजर ठेवतो. तो चांगल्या लोकांना राज्य करु देतो. तो चांगल्यांना सदैव मान देतो. |
8. | म्हणून जर कुणाला शिक्षा झाली व त्यांना साखळदंडानी वा दोरीनी बांधून ठेवण्यात आले तर त्यांनी नक्कीच काही वाईट केले असणार. |
9. | आणि त्यांनी काय चूक केली ते देव त्यांना सांगेल. देव त्यांना सांगेल की त्यांनी पाप केले आहे. देव त्यांना ते गर्विष्ठ होते असे सांगेल. |
10. | देव त्या लोकांना त्याची ताकीद आणि सुधारणेच्या सूचना ऐकायला भाग पाडेल. तो त्यांना पाप न करण्याची आज्ञा देईल. |
11. | जर त्या लोकांनी देवाचे ऐकले, त्याची आज्ञा मानली, तर देव त्यांना यशस्वी करेल. आणि ते त्यांचे आयुष्य सुखाने जगतील. |
12. | परंतु जर त्यांनी देवाची आज्ञा पाळायचे नाकारले तर त्यांचा नाश होईल. त्यांना ज्ञान न होता मरण येईल. |
13. | जे लोक देवाची पर्वा करीत नाहीत ते सदा कटू (रागावलेले) असतात. देवाने जरी त्यांना शिक्षा केली तरी ते देवाकडे मदत मागायला तयार नसतात. |
14. | ते लोक पुरुष वेश्यासारखे अगदी तरुणपणी मरतील. |
15. | परंतु देव दु:खी लोकांना त्यांच्या दु:खातून सोडवील. देव त्या दु:खाचा उपयोग लोकांना जागवण्यासाठी आणि त्यांनी त्याचे ऐकावे यासाठी करतो. |
16. | “ईयोब, देवाला तुला मदत करायची इच्छा आहे. तू तुझ्या दु:खातून बाहेर पडावेस असे देवाला वाटते. तुझे आयुष्य साधे सरळ असावे अशी त्याची इच्छा आहे. तुझ्या जेवणाच्या टेबलावर अन्नाची रेलचेल असावी असे त्याला वाटते. |
17. | परंतु ईयोब, आता तुला अपराधी ठरवण्यात आले आहे, म्हणून तुला दुष्टांप्रमाणे शिक्षा करण्यात आली. |
18. | ईयोब, तू श्रीमंतीमुळे मूर्ख बनू नकोस. पैशामुळे तू आपला विचार बदलू नकोस. |
19. | आता तुझा पैसा तुझ्या कामी येणार नाही. आणि सामर्थ्यवान माणसे तुला मदत करणार नाहीत. |
20. | आता रात्र होण्याची इच्छा मनी बाळगू नकोस. लोक रात्री पसार व्हायचा प्रयत्न करतात. आपण देवापासून लपून राहू शकू असे त्यांना वाटते. |
21. | ईयोब, तू खूप त्रास भोगला आहेस पण म्हणून वाईटाची निवड करु नकोस. चूक न करण्याची दक्षता घे. |
22. | “देवाजवळ खूप शक्ती आहे. तो जागातला सगळ्यात मोठा गुरु आहे. |
23. | काय करावे ते देवाला कुणी सांगू शकत नाही ‘देवा तू अयोग्य केलेस’ असे कुणी त्याला म्हणू शकत नाही. |
24. | “देवाने जे काही केले त्याबद्दल नेहमी त्याची स्तुती करायची आठवण ठेव. लोकांनी देवाच्या स्तुतीवर अनेक गाणी रचली आहेत. |
25. | देवाने काय केले ते प्रत्येकाला दिसते. दूरदूरच्या देशांतील लोकांनाही देवाचे महान कार्य दिसतात. |
26. | होय, देव महान आहे परंतु त्याची महानता आपल्याला कळत नाही. आणि देवाचे अस्तित्व कधीपासून आहे तेही आपल्याला माहीत नाही. |
27. | “देव पृथ्वीवरुन पाणी घेऊन त्याचे धुके आणि पाऊस यात रुपांतर करतो. |
28. | अशा रीतीने ढग पाऊस पाडतात आणि तो खूप लोकांवर पडतो. |
29. | देव ढगांची पखरण कशी करतो किंवा आकाशात ढगांचा गडगडाट कसा होतो ते कुणाला कळत नाही. |
30. | बघ, देव विजेला पृथ्वीवर सर्वदूर पाठवतो आणि समुद्राचा खोल भागही त्यात येतो. |
31. | देव त्याचा उपयोग राष्ट्रांना काबूत ठेवण्यासाठी करतो आणि त्यांना भरपूर अन्न देतो. |
32. | देव आपल्या हातांनी विजेला पकडतो आणि त्याला हवे तेथे पडण्याची तिला आज्ञा करतो. |
33. | मेघांच्या गडगडाटामुळे वादळाची सूचना मिळते. जनावरांना सुध्दा वादळाची चाहूल लागते. |
← Job (36/42) → |