← Job (32/42) → |
1. | नंतर ईयोबच्या तीन मित्रांनी ईयोबला उत्तर देणे सोडून दिले. त्यांनी ते सोडून दिले कारण ईयोबला स्वत:च्या निर्दोषपणाविषयी खात्री होती. |
2. | परंतु तिथे अलीहू नावाचा तरुण मुलगा होता. अलीहू बरखेलचा मुलगा होता. बरखेल बूजचा वंशज होता. अलीहू राम घराण्यातील होता. अलीहू ईयोबवर खूप रागावला. का? कारण ईयोब आपण स्वत: बरोबर आहोत असे म्हणत होता. ईयोब म्हणत होता की आपण देवापेक्षाही अधिक न्यायी आहोत. |
3. | अलीहू ईयोबच्या तीन मित्रांवरदेखील रागावला. का? कारण ईयोबचे तीन मित्र ईयोबच्या प्रश्रांची उत्तरे देऊ शकले नाहीत. ईयोब चुकला हे ते सिध्द करु शकले नाहीत. |
4. | अलीहू तिथे सगळ्यांत लहान होता. म्हणून तो सगळ्यांचे बोलणे संपेपर्यत थांबला. नंतर आपण बोलायला सुरुवात करावी असे त्याला वाटले. |
5. | परंतु नंतर अलीहूला दिसले की ईयोबच्या तीन मित्रांकडे काहीच बोलायचे उरले नाही. म्हणून त्याला राग आला. |
6. | म्हणून त्याने बोलायला सुरुवात केली. तो म्हणाला: “मी खूप तरुण आहे आणि तुम्ही वृध्द आहात. म्हणून तुम्हाला काही सांगायला मी घाबरत होतो. |
7. | मी माझ्याशीच विचार केला, ‘वृध्दांनी आधी बोलायला पाहिजे. वृध्द खूप वर्ष जगलेले असतात, त्यामुळे ते खूप गोष्टी शिकलेले असतात.’ |
8. | परंतु देवाचा आत्मा लोकांना शहाणे करतो. त्या सर्वशक्तिमान देवाचा ‘नि:श्वास’ लोकांना समजण्यास मदत करतो. |
9. | केवळ वृध्द माणसेच तेवढी शहाणी नसतात. केवळ वृध्दांनाच चांगले वाईट कळते असे नाही. |
10. | “तेव्हा कृपा करुन माझे ऐका! मी तुम्हांला माझे विचार सांगतो. |
11. | मी तुमचे बोलणे संपेपर्यंत धीर धरला. तुम्ही ईयोबला जी उत्तरे दिलीत ती मी ऐकली. |
12. | तुम्ही ज्या गोष्टी संगितल्या त्या मी लक्षपूर्वक ऐकल्या. तुमच्या पैकी कुणीही ईयोबवर टीका केली नाही. तुमच्यापैकी एकनेही त्याच्या मुद्यांना उत्तरे दिली नाहीत. |
13. | तुम्ही तिघे तुम्हांला शहाणपण मिळाले असे म्हणू शकत नाही. ईयोबच्या मुद्यांना देवानेच उत्तरे दिली पाहिजेत, माणसांनी नाही. |
14. | ईयोबने त्याचे मुद्दे माझ्यासामोर मांडले नाहीत. म्हणून तुम्ही तिघांनी ज्या मुद्यांचा उपयोग केला त्यांचा उपयोग मी करणार नाही. |
15. | “ईयोब, हे तिघेही वाद हरले आहेत. त्यांच्या जवळ बोलायला आणखी काही उरले नाही. त्यांच्या जवळ आणखी उत्तरे नाहीत. |
16. | ईयोब, यांनी तुला उत्तरे द्यावीत म्हणून मी थांबलो होतो. परंतु ते आता गप्प आहेत. त्यांनी तुझ्याशी वाद घालणे आता बंद केले आहे. |
17. | म्हणून आता मी तुला माझे उत्तर देतो. होय मला काय वाटते ते मी तुला आता सांगतो. |
18. | मला इतके काही सांगायचे आहे की मी आता फूटून जाईन की काय असे वाटते. |
19. | मी द्राक्षरसाच्या न फोडलेल्या बाटलीसारखा आहे. द्राक्षरसाच्या नव्या बुधल्याप्रमाणे मी फुटण्याच्या बेतात आहे. |
20. | म्हणून मला बोललेच पाहिजे तरच मला बरे वाटेल. मी बोलले पाहिजे आणि ईयोबच्या मुद्यांना उत्तरे दिली पाहिजेत. |
21. | मी इतर कुणाला वागवतो त्याप्रमाणे ईयोबला वागवले पाहिजे. मी त्याच्याशी उगीचच चांगले बोलायचा प्रयत्न करणार नाही. मला जे बोलायला हवे तेच मी बोलेन. |
22. | एकापेक्षा दुसऱ्याला अधिक चांगले वागवणे मला शक्य नाही. मी जर असे केले तर देव मला शिक्षा करेल. |
← Job (32/42) → |