← Job (13/42) → |
1. | ईयोब म्हणाला: “हे सर्व मी पूर्वी पाहिले आहे, तू जे म्हणालास ते सर्व मी आधीच ऐकले आहे. त्या सर्व गोष्टी मला समजतात. |
2. | तुला जेवढे माहीत आहे तेवढेच मलाही माहीत आहे. मी तुझ्या इतकाच हुशार आहे. |
3. | परंतु मला तुझ्याशी वाद घालायचा नाही. मला सर्वशक्तीमान देवाशी बोलायचे आहे. मला देवाबरोबर माझ्या संकटांविषयी बोलायचे आहे. |
4. | तुम्ही तिघेजण खोटे बोलून तुमचे अज्ञान लपवीत आहात. ज्या वैद्याला कुणालाही बरे करता येत नाही अशा निरुपयोगी वैद्यासारखे तुम्ही आहात. |
5. | तुम्ही गप्प बसावे अशी माझी इच्छा आहे. ती तुम्हाला करता येण्याजोगी सर्वात शहाणपणाची गोष्ट असेल. |
6. | “आता माझ्या युक्तिवादाकडे लक्ष द्या मी काय म्हणतो ते ऐका. |
7. | तुम्ही देवासाठी खोटे बोलाल का? तुमचे खोटे बोलणे देवाच्या इच्छेनुसार आहे असे तुम्हाला वाटते का? |
8. | तुम्ही माझ्याविरुध्द देवाचा बचाव करीत आहात का? तुम्ही मुळीच न्यायाने वागत नाहीत तो देव आहे म्हणून तुम्ही त्याची बाजू घेत आहात. |
9. | जर देवाने अगदी जवळून तुमची तपासणी केली तर, त्याला काही तरी चांगले आढळेल का? तुम्ही लोकांना जसे मूर्ख बनवू शकता तसेच देवालाही बनवू शकाल असे तुम्हाला वाटते का? |
10. | तुम्ही जर एखादा माणूस महत्वाचा आहे म्हणून न्यायालयात त्याची बाजू घेतलीत तर देव तुमच्यावर टीका करेल हे तुम्हाला माहीत आहे. |
11. | देवाचे मोठेपण तुम्हाला घाबरवते. तुम्ही त्याला भीता. |
12. | तुमचे युक्तिवाद कुचकामाचे आहेत. तुमची उत्तरे कवडीमोलाची आहेत. |
13. | “आता जरा गप्प बसा आणि मला बोलू द्या! माझे जे काही होईल ते मला मान्य आहे. |
14. | मी मलाच संकटात लोटीन आणि माझ्याच हातात माझेच जीवन धरीन? |
15. | देवाने मला मारुन टाकले तरी मी देवावरच विश्वास ठेवीन. पण मी त्याच्या समोर माझा बचाव करीन. |
16. | आणि देवाने जर मला जिवंत राहू दिले तर ते मी बोलण्याइतका धीट होतो म्हणूनच असेल. पापी माणूस देवाच्या डोळ्याला डोळा भिडवू शकणार नाही. |
17. | मी काय म्हणतो ते लक्षपूर्वक ऐका. मला नीट सांगू द्या. |
18. | मी आता माझ्या बचावाला सिध्द झालो आहे. मी माझे मुद्दे काळजीपूर्वक मांडीन. मला माहीत आहे की मी बरोबर आहे हे मी दाखवून देईन. |
19. | माझे चुकले आहे असे जर कुणी दाखवून दिले तर मी गप्प बसेन. |
20. | “देवा, तू मला फक्त दोन गोष्टी दे, मग मी तुझ्यापासून लपणार नाही. |
21. | मला शिक्षा देणे बंद कर आणि तुझ्या भयानक गोष्टींनी मला भयभीत करण्याचे थांबव. |
22. | नंतर मला हाक मार. मी तुला ओ देईन किंवा मला बोलू दे आणि तू मला उत्तर दे. |
23. | मी किती पापे केली आहेत? मी काय चुका केल्या आहेत? तू मला माझी पापे आणि माझ्या चुका दाखव. |
24. | देवा, तू मला का चुकवीत आहेस? आणि मला शत्रूसारखे का वागवीत आहेस? |
25. | 2तू मला घाबरवतो आाहेस का? मी वाऱ्यावर उडणारे एक पान मात्र आहे. तू गवताच्या एका काडीवर आक्रमण करीत आहेस. |
26. | देवा, तू माझ्याबद्दल फार कटू बोलतोस. मी तरुणपणात जी पापे केली त्याबद्दल तू मला कष्ट भोगायला लावतो आहेस का? |
27. | तू माझ्या पायात बेड्या घातल्या आहेस. माझ्या प्रत्येक पावलावर तू पाळत ठेवतोस, माझी प्रत्येक हालचाल तू टिपतोस. |
28. | म्हणून मी कुजलेल्या लाकडासारखा, कसरीने खाल्लेल्या कापडासारखा क्षीण होत चाललो आहे” |
← Job (13/42) → |