Job (1/42)  

1. ऊर देशात ईयोब नावाचा एक माणूस राहात होता. तो फार चांगला व श्रध्दाळू माणूस होता. ईयोब देवाची भक्ती करीत असे. ईयोब वाईट गोष्टीपासून दूर राहात असे.
2. ईयोबला सात मुले आणि तीन मुली होत्या.
3. ईयोब जवळ 7000 मेंढ्या, 3000 उंट, 1000 बैल आणि 500 गाढवी होत्या तसेच खूप नोकरही होते. पूर्वेकडच्या देशांतील तो सर्वात श्रीमंत माणूस होता.
4. ईयोबची मुले आळीपाळीने आपापल्या घरांत भोजन समारंभ करीत असत आणि आपल्या बहिणींनाही बोलवीत असत.
5. मुलांच्या भोजन समारंभानंतरच्या सकाळी ईयोब सर्वांत आधी उठून प्रत्येक मुलासाठी होमार्पणे करीत असे. तो म्हणे. “कदाचित् भोजन समारंभाच्यावेळी माझ्या मुलांनी निष्काळजीपणाने पाप केले असेल.” आपली मुलं देवाची उपासना करायला योग्य व्हावीत म्हणून ईयोब असे करीत असे.
6. नंतर एके दिवशी देवपुत्र (देवदूत) परमेश्वराला भेटायला आहे. त्यांच्याबरोबर सैतानही होता.
7. परमेश्वराने सैतानाला विचारले, “तू कोठे होतास?” सैतानाने उत्तर दिले, “मी पृथ्वीवर इकडे तिकडे हिंडत फिरत होतो.”
8. मग परमेश्वर सैतानाला म्हणाला, “तू माझा सेवक, ईयोबला पाहिलेस का? पृथ्वीवर त्याच्यासारखा कुणीही नाही. तो खरोखरच फार चांगला सात्विक माणूस आहे. तो देवाची भक्ती करतो. तो वाईट गोष्टींपासून दूर राहातो.”
9. सैतानाने उत्तर दिले, “होय, पण त्याच्याजवळ देवाची भक्ती करण्यामागे सबळ कारण आहे.
10. तू नेहमी त्याचे, त्याच्या कुटुंबाचे व त्याच्या मालमत्तेचे रक्षण करतोस. तो जे जे काही करतो त्यांत तू त्याला यशस्वी करतोस. तू त्याला आशीर्वाद दिला आहेस. तो इतका श्रीमंत आहे की सर्व देशभर त्याचे पशुधन पसरलेले आहे.
11. पण जर तू त्याच्या जवळ जे काही आहे त्या सगळ्यावर आघात केलास तर तो तुझ्या तोंडावर तुझी निंदा करील हे मी खात्रीपूर्वक सांगतो.”
12. नंतर परमेश्वर सैतानाला म्हणाला. “बरं आहे, तू त्याच्याजवळ असलेल्या वस्तूंचे काहीही करु शकतोस. पण तू त्याच्या अंगाला मात्र हात लावायचा नाहीस.” मग सैतान परमेश्वरापुढून निघून गेला.
13. एक दिवस ईयोबच्या सर्वांत मोठ्या मुलाकडे त्याची इतर मुले व मुली जेवत होते व द्राक्षारस पीत होते.
14. तेव्हा एक निरोप्या ईयोब कडे आला व म्हणाला, “बैल नांगरीत होते आणि गाढवे जवळच चरत होती.
15. परंतु शबाई लोक आमच्यावर चाल करुन आले आणि त्यांनी तुझी गुरे पळवून नेली. त्यांनी माझ्याखेरीज इतर सर्व नोकरांना मारुन टाकले. तुला हे सांगण्यासाठी मी एकटा स्वत:चा कसाबसा बचाव करुन आलो आहे.”
16. पहिला निरोप्या हे सांगत असतानाच दुसरा निरोप्या ईयोबकडे आला. तो म्हणाला, “आकाशातून वीज पडून तुझ्या मेंढ्या व नोकर - चाकर जळून गेले. फक्त मीच तेवढा बचावलो आहे व तुला सांगायला आलो आहे.”
17. दुसरा निरोप्या हे सांगत असतानाच आणखी एक निरोप्या आला. तिसरा निरोप्या म्हणाला, “खास्द्यांनी तीन टोळ्या आपल्यावर हल्ला करण्यासाठी पाठवल्या. त्यांनी हल्ला करुन उंट पळवून नेले आणि नोकरांना मारुन टाकले. फक्त मीच त्यातून सुटून तुला सांगायला आलो आहे.”
18. तिसरा निरोप्या हे सर्व सांगत असताना आणखी एक निरोप्या तिथे आला. चौथा निरोप्या म्हणाला, “तुझी मुले व मुली तुझ्या मोठ्या मुलाकडे खात होते व द्राक्षारस पीत होते.
19. तेव्हा वाळवंटातून सोसाट्याचा वारा आला आणि त्याने तुझे घर पडले. घर तुझ्या मुलामुलींवर पडल्यामुळे ते मेले. केवळ मीच त्यातून बचावलो व तुला सांगायला इथे आलो.”
20. ईयोबने जेव्हा हे ऐकले तेव्हा आपल्याला खुप दु:ख झाले आहे हे दाखविण्यासाठी त्याने आपले कपडे फाडले, डोक्यावरचे केस काढले व जमिनीवर पडून त्याने देवाची आराधना सुरु केली.
21. तो म्हणाला: “मी जेव्हा या पृथ्वीवर आलो तेव्हा नागवाच होतो व माझ्याजवळ काहीही नव्हते. मी जेव्हा मरेन व हे जग सोडून जाईल तेव्हाही मी नागवाच असेन आणि माझ्याजवळ काहीही नसेल. परमेश्वर देतो व तोच ते परतही घेतो. परमेश्वराचे नाव धन्य असो.”
22. या रीतीने ईयोबच्या हातून पाप घडले नाही. देवाने चूक केली आहे असे काही तो बोलला नाही.

      Job (1/42)