← Jeremiah (36/52) → |
1. | यिर्मयाला परमेश्वराचा संदेश आला. योशीयाचा मुलगा यहोयाकीम हा यहूदाचा राजा असताना त्याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी यिर्मयाला परमेश्वराचा हा संदेश मिळाला. तो असा होता. |
2. | “यिर्मया, मोठा पट घे आणि मी तुला दिलेले सर्व संदेश त्यावर लिही. यहूदा, इस्राएल आणि इतर राष्ट्रे ह्यांच्याविषयी मी तुला सांगितले आहे. योशीयाच्या कारकिर्दीपासून आतापर्यंत मी तुला सांगितलेले सर्व लिही. |
3. | न जाणो यहूदाच्या घराण्याबाबत मी ज्या योजना आखल्या आहेत, त्या ऐकून ते दुष्कर्मे करण्याचे सोडून देतील. त्यांनी असे केल्यास, मी त्यांनी केलेल्या वाईट पापांबद्दल त्यांना क्षमा करीन.” |
4. | मग यिर्ययाने बारुख नावाच्या माणसाला बोलाविले. बारुख नेरीयाचा मुलगा होता. यिर्मयाने, त्याला परमेश्वराकडून आलेले संदेश, सांगितले व ते बारुखने पटावर लिहून काढले. |
5. | मग यिर्मया बारुखाला म्हणाला, “मी परमेश्वराच्या मंदिरात जाऊ शकत नाही. मला तेथे जाण्याची परवानगी नाही. |
6. | म्हणून तू परमेश्वराच्या मंदिरात जावेस असे मला वाटते. उपवासाच्या दिवशी तेथे जा आणि लोकांना पट वाचून दाखव. मला आलेले परमेश्वराचे संदेश मी तुला सांगितले व ते तू लिहून घेतलेस. ते तू सर्व लोकांना वाचून दाखव. यहूदाच्या शहरांतून यरुशलेममध्ये आलेल्या सर्व लोकांना तू ते संदेश वाचून दाखव. |
7. | कदाचित् ते लोक देवाकडे मदतीसाठी धावा करतील. कदाचित् प्रत्येकजण दुष्कर्मे करण्याचे सोडून देईल. परमेश्वर त्या लोकांवर फार रागावल्याचे परमेश्वराने जाहीर केलेच आहे!” |
8. | नेरीयाचा मुलगा बारुख याने, यिर्मयाने त्याला सांगितले होते त्याप्रमाणे केले. परमेश्वराचे संदेश लिहिलेला पट बारुखने मोठ्याने वाचला. तो त्याने परमेश्वराच्या मंदिरात वाचला. |
9. | यहोयाकीम राजाच्या कारकिर्दीच्या पाचव्या वर्षाच्या नवव्या महिन्यात उपास ठरविल्याचे जाहीर करण्यात आले. यरुशलेममध्ये राहणारे व यहूदातील इतर शहरांतून यरुशलेममध्ये आलेले अशा सर्वांनी परमेश्वरासमोर उपास करावा अशी अपेक्षा होती. |
10. | त्याच वेळी यिर्मयाच्या शब्दातील पट बारुखने वाचून दाखविला. त्याने तो परमेश्वराच्या मंदिरात वाचून दाखविला. हा पट वाचताना बारुख गमऱ्याच्या घरच्या चौकातील खोलीत होता. ही खोली मंदिराच्या ‘नवीन प्रवेशद्वारा’ जवळ होती. गमऱ्या शाफानचा मुलगा होता. गमऱ्या मंदिरातील लेखनिक होता. |
11. | बारुखने वाचलेले पटावरचे परमेश्वराचे संदेश मीखाया नावाच्या माणसाने ऐकले. शाफानचा मुलगा गमऱ्या ह्याचा मीखाया मुलगा होता. |
12. | पटावरील संदेश ऐकताच, मीखाया राजावाड्यातील राजाच्या खासगी चिटणीसाच्या खोलीत गेला. तेथे सर्व वरिष्ठ अधिकारी बसलेले होते. त्यांची नावे पुढीलप्रमाणे: खाजगी चिटणीस अलीशामा, शमायाचा मुलगा दलाया, अखबोरचा मुलगा एलनाथान, शाफानचा मुलगा गमऱ्या, हनन्याचा मुलगा सिद्कीया. आणखीही काही वरिष्ठ अधिकारी तेथे होते. |
13. | बारुख पट वाचत असताना ऐकलेली प्रत्येक गोष्ट मीखायाने त्यांना सांगितली. |
14. | मग त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यहूदी नावाच्या माणसाला बारुखकडे पाठविले. यहूदी नथन्याचा व नथन्या शलेम्याचा मुलगा होता. शलेम्याच्या वडिलांचे नाव कुशी. यहूदी बारुखला म्हणाला, “ज्या पटावरुन तू वाचलेस तो घेऊन माझ्याबरोबर चल.” नेरीयाचा मुलगा बारुख याने पट घेतला व तो यहूदीबरोबर अधिकाऱ्यांकडे गेला. |
15. | मग ते अधिकारी बारुखला म्हणाले, “बस आणि आम्हाला तो पट वाचून दाखव.” मग बारुखने तो पट त्यांना वाचून दाखविला. |
16. | त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या पटावरील सर्व संदेश ऐकले. मग ते घाबरुन एकमेकांकडे पाहू लागले. ते बारुखला म्हणाले, “पटावरील संदेशाबाबत आपण राजा यहोयाकीम ह्याला सांगितलेच पाहिजे.” |
17. | मग त्या अधिकाऱ्यांनी बारुखला विचारले, “बारुख, ह्या पटावर लिहिलेले संदेश तुला कोठून मिळाले? यिर्मयाने तुला सांगितलेल्या गोष्टी तू लिहून घेतल्यास का ते आम्हाला सांग.” |
18. | बारुख म्हणाला, “हो! यिर्मयाने सांगितले व मी ते सर्व शाईने पटावर लिहिले.” |
19. | मग ते वरिष्ठ अधिकारी बारुखला म्हणाले, “तुला आणि यिर्मयाला कोठेतरी जाऊन लपलेच पाहिजे. तुमच्या लपण्याची जागा कोणालाही कळू देऊ नका.” |
20. | मग त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तो पट अलीशामा लेखनिकाच्या खोलीत ठेवला. ते राजा यहोयाकीम याच्याकडे गेले व त्यांनी त्याला पटाबद्दल सर्व काही सांगितले. |
23. | यहूदीने पट वाचायला सुरवात केली. पण त्याने पटावरील दोन-तीन रकाने वाचताच, राजाने तो पट खेचून घेतला. त्याने लहान चाकूने ते पटावरील रकाने कापले आणि शेकोटीत फेकून दिले. शेवटी सगळाच पट त्याने जाळून टाकला. |
24. | राजा यहोयाकीम व त्याचे सेवक पटावरील मजकूर ऐकून घाबरले नाहीत. आपल्या चुकांबद्दल दु:ख प्रदर्शित करण्यासाठी त्यांनी आपले कपडे फाडले नाहीत. |
25. | राजाने तो पट जाळू नये म्हणून एलनाथान, दलाया व गमऱ्या यांनी विनंती केली, पण राजाने त्यांचे ऐकले नाही. |
26. | यहोयाकीम राजाने लेखनिक बारुख व संदेष्ट यिर्मया यांना अटक करण्याचा काही लोकांना हूकूम दिला. ते लोक म्हणजे राजपुत्र यमेल, अरहज्रीएलचा मुलगा सराया व अब्देलचा मुलगा शलेम्या हे होत, पण त्यांना बारुख व यिर्मया सापडले नाहीत कारण त्यांना देवाने लपविले होते. |
27. | यिर्मयाला परमेश्वराचा संदेश आला परमेश्वराचे सर्व संदेश लिहिलेला पट यहोयाकीमने जाळला, त्यानंतर हा संदेश आला. यिर्मयाने बारुखला सांगितले व बारुखने लिहून घेतले. तो संदेश असा होता. |
28. | “यिर्मया, दुसरा पट घे. पहिल्या पटावर लिहिलेले सर्व संदेश दुसऱ्या पटावर लिही. पहिला पट यहूदाचा राजा यहोयाकीम याने जाळला. |
29. | यिर्मया, यहूदाचा राजा यहोयाकीम ह्याला असेही सांग ‘परमेश्वर काय म्हणतो पाहा यहोयाकीम, तू तो पट जाळलास. तू म्हणालास “बाबेलचा राजा नक्की येईल आणि या देशाचा नाश करील असे यिर्मयाने का लिहिले? बाबेलचा राजा माणसे व पशू ह्या दोघांचाही नाश करील असे तो का म्हणाला?” |
30. | म्हणून, यहोयाकीमचे वंशज दावीदाच्या सिंहासनावर बसणार नाहीत. जेव्हा यहोयाकीम मरेल, तेव्हा त्याचे राजाच्या इतमामाने अंत्यसंस्कार होणार नाहीत, तर त्याचा मृतेदेह जमिनीवर फेकून दिला जाईल. दिवसाची उष्णता आणि रात्रीचे थंड दव ह्यात तो मृतदेह पडून राहील. |
31. | मी, परमेश्वर, यहोयाकीम व त्यांची मुले यांना शिक्षा करीन. मी त्याच्या अधिकाऱ्यांनाही शिक्षा करीन. कारण ते सर्व दुष्ट आहेत. मी त्यांच्यावर, यरुशलेममध्ये राहणाऱ्या लोकांवर व यहूदाच्या सर्व लोकांवर भयंकर अरिष्ट आणण्याचे निश्र्चित केले आहे. मी ठरविल्यामप्रमाणे, त्यांचे वाईट करीन, कारण त्यांनी माझे ऐकले नाही.” |
32. | मग यिर्मयाने दुसरा पट घेतला व तो नेरियाचा मुलगा बारुख या लेखनिकाला दिला. यिर्मयाने सांगितले आणि बारुखने या पटावर लिहिले. या दुसऱ्या पटावरील संदेश, यहूदाचा राजा यहोयाकीम ह्याने जाळलेल्या पटावरील संदेशाप्रमाणेच होते. पण ह्या दुसऱ्या पटात त्या संदेशा बरोबरच त्या संदेशातील शब्दांप्रमाणे आणखी पुष्कळ शब्दांची भर घातलेली होती. |
← Jeremiah (36/52) → |