Jeremiah (34/52)  

1. यिर्मयाला देवाचा संदेश आला. नबुखद्नेस्सर ह्या बाबेलच्या राजाने यरुशलेम व तिच्या आजूबाजूची गावे ह्यांच्याविरुध्द जेव्हा युद्ध पुकारले तेव्हा यिर्मयाला हा संदेश मिळाला. नबुखद्नेस्सरकडे त्याचे स्वत:चे सैन्य व त्याच्या साम्राज्यातील इतर राज्यांची सैन्ये व लोक होते.
2. संदेश असा होता, परमेश्वर इस्राएलचा देव म्हणतो, “यिर्मया, यहूदाचा राजा सिद्कीया याच्याकडे जा व पुढील निरोप दे. ‘सिद्कीया, परमेश्वर असे म्हणतो की मी लवकरच यरुशलेम बाबेलच्या राजाच्या ताब्यात देईन व ती तो भस्मसात करील.
3. सिद्कीया, तू बाबेलच्या राजाच्या तावडीतून सुटणार नाहीस. तुला पकडून निश्र्चितपणे त्याच्या ताब्यात दिले जाईल. तू बाबेलच्या राजाला प्रत्यक्ष पाहशील. तुम्ही समोरासमोर येऊन एकमेकांशी बोलाल व तू बाबेलला जाशील.
4. सिद्कीया, यहूदाच्या राजा, परमेश्वराचे वचन ऐक. परमेश्वर तुझ्याबद्दल असे म्हणतो तुला तलवारीने मृत्यू येणार नाही.
5. तुला शांतपणे मरण येईल. तुझ्या आधी जे तुझे पूर्वज राजे झाले व ज्यांनी राज्य केले, त्यांना मान देण्यासाठी लोकांनी ज्याप्रमाणे दफनाच्या वेळी अग्नी पेटविला, तसाच लोक तुला मान देण्यासाठी पेटवतील. ते तुझ्याकरिता शोक करतील व म्हणतील “हाय रे माझ्या धन्या!” मी स्वत: तुला हे वचन देत आहे.” हा परमेश्वराचा संदेश आहे.
6. यिर्मयाने परमेश्वराचा संदेश यरुशलेममध्ये सिद्कीयाला दिला.
7. तेव्हा बाबेलच्या राजाचे सैन्य यरुशलेमविरुद्ध लढत होते. यहूदातील ज्या शहरांचा पाडाव झाला नव्हता, त्यांच्याशीही बाबेलचे सैन्य लढत होते. ती शहरे म्हणजे लाखीश व अजेका ही होत. यहूदामध्ये तटबंदी असलेली फक्त ही दोनच शहरे राहिली होती.
8. सर्व इब्री गुलांमांना स्वातंत्र्य देण्याचा करार सिद्कीया राजाने यरुशलेमच्या सर्व लोकांबरोबर केला होता. हा करार झाल्यावर यिर्मयाला देवाचा संदेश आला.
9. प्रत्येकाने आपल्या इब्री गुलामांना बंधमुक्त करावे अशी अपेक्षा होती. सर्व इब्री गुलामांना पुरुष व स्त्री यांना बंधमुक्त करायचे होते. कोणीही यहुदी कुळातील माणसाला गुलामगिरीत ठेवू नये, अशी अपेक्षा होती.
10. यहूदातील सर्व नेत्यांनी व सर्व लोकांनी या कराराला मान्यता दिली. प्रत्येकजण आपल्याकडील स्त्री वा पुरुष गुलामांना ह्यापुढे गुलाम म्हणून न ठेवता मुक्त करणार होता. प्रत्येकजण कबूल झाला आणि सगळे गुलाम मुक्त झाले.
11. पण त्यानंतर ज्या लोकांकडे गुलाम होते, त्या लोकांनी आपला विचार बदलला आणि त्यांनी मुक्त केलेल्यांना पकडून पुन्हा गुलाम केले.
12. मग यिर्मयाला परमेश्वराचा संदेश आला.
13. यिर्मया, परमेश्वर, इस्राएलच्या लोकांचा देव असे म्हणतो: “तुमचे पूर्वज मिसरमध्ये गुलाम होते. मी त्यांना तेथून सोडविले हे करताना मी त्यांच्याबरोबर एक करार केला.
14. मी तुमच्या पूर्वजांना म्हणालो: ‘प्रत्येक सात वर्षाच्या अखेरीला प्रत्येकाने आपल्याकडील इब्री गुलामांना मुक्त केलेच पाहिजे. तुमच्या एखाद्या इब्री बांधवाने स्वत:ला तुम्हाला विकले असेल, तर त्याने सहा वर्षे तुमची गुलामी केल्यावर तुम्ही त्याला जाऊ दिलेच पाहिजे.’ पण तुमच्या पूर्वजांनी माझे ऐकले नाही वा माझ्याकडे लक्ष दिले नाही.
15. काही वेळा पूर्वी, योग्य ते करण्यापासून तुम्हीही विचलित झालात. तुमच्यापैकी प्रत्येकाने आपल्याकडे गुलाम असलेल्या इब्री बांधवाला स्वातंत्र्य दिले आणि माझ्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मंदिरात, माझ्यापुढे एक करारही केलात.
16. पण आता, तुमचे मन बदलले. तुम्ही माझ्या नावाचा मान राखीत नाही, हे तुम्ही दाखवून दिलेत. तुम्ही हे कसे काय केले? तुम्ही प्रत्येकाने मुक्त केलेल्या गुलामांना स्त्रिया व पुरुष दोघांनाही परत पकडले. त्यांना बळजबरीने पुन्हा गुलाम केलेत.
17. “म्हणून परमेश्वर असे म्हणतो, ‘तुम्ही माझी आज्ञा पाळली नाही. तुम्ही तुमच्या इब्री गुलामांना स्वातंत्र्य दिले नाही. तुम्ही कराराचे पालन केले नाही, म्हणून आता ‘मी “स्वातंत्र्य” देईन. हा परमेश्वराचा संदेश आहे. युद्धात, भयंकर रोगराईने अथवा उपासमारीने मरण्याचे “स्वातंत्र्य” (मी तुम्हाला देईन) मी तुमच्याबाबतीत असे काहीतरी करीन की त्याबद्दल ऐकून पृथ्वीवरची राज्ये भीतीने चळाचळा कापतील.
18. कराराचा भंग करणाऱ्या आणि माझ्यासमोर दिलेले वचन न पाळणाऱ्या लोकांना मी शत्रूच्या हवाली करीन. ह्या लोकांनी वासराचे दोन तुकडे केले व ते त्यामधून चालत गेले.
19. माझ्यासमोर करार करुन, वासराच्या दोन तुकड्यांमधून चालत जाणारे हे लोक म्हणजे यहूदा आणि यरुशलेमचे नेते, न्यायालयातील महत्वाचे अधिकारी, याजक आणि या देशातील लोक होत.
20. मी ह्या सर्व लोकांना त्यांच्या शत्रूंच्या अथवा त्यांना मारु इच्छिणाऱ्या कोणाही व्यक्तीच्या हवाली करीन. त्यांची प्रेते म्हणजे पक्षी व वन्य पशूंचे भक्ष्य होतील.
21. मी यहूदाचा राजा सिद्कीया व तेथील नेते ह्यांना त्यांच्या शत्रूंच्या अथवा त्यांना मारु इच्छिणाऱ्या लोकांच्या स्वाधीन करीन. जरी बाबेलच्या सैन्याने यरुशलेम सोडले असले, तरी मी सिद्कीया आणि त्याच्या लोकांना बाबेलच्या राजाच्या सैन्याच्या हवाली करीन.
22. मी बाबेलच्या सैन्याला ‘हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे’ ‘परत यरुशलेममध्ये येण्याची आज्ञा देईन.” ते सैन्य यरुशलेमच्याविरुद्ध लढेल. ते ती नगरी ताब्यात घेतील, तिला आग लावतील आणि ती बेचिराख करतील. मी यहूदातील शहरांचा नाश करीन. ती शहरे म्हणजे ओसाड वाळवंट होईल ती निर्जन होईल.”

  Jeremiah (34/52)