Jeremiah (33/52)  

1. यिर्मयाला दुसऱ्यांदा परमेश्वराचा संदेश आला. यिर्मया अजूनही पहारेकऱ्यांच्या चौकात कैद होता.
2. परमेश्वराने पृथ्वी निर्माण केली आणि तो तिचे रक्षण करतो, परमेश्वर हेच त्याचे नाव. परमेश्वर म्हणतो,
3. “यहूदा, माझा धावा कर. मी ओ देईन. मी तुला महत्वाची रहस्ये सांगीन. ह्या गोष्टी तू पूर्वी कधीच ऐकल्या नसशील.
4. परमेश्वर इस्राएलचा देव आहे. परमेश्वर यरुशलेममधील घरांविषयी व यहूदातील राजांच्या राजवाड्यांविषयी पुढील गोष्टी सांगतो, शत्रू ती घरे पाडील. नगरांच्या तटबंदीपर्यंत तो उतरंडी बांधील. शत्रू शहरांतील लोकांशी तलवारीने लढेल.
5. “यरुशलेमच्या लोकांनी खूप वाईट गोष्टी केल्या. म्हणून मला त्या लोकांचा खूप राग आला. मी त्यांच्याविरुद्ध गेलो. मी तेथे पुष्कळ माणसे मारीन. बाबेलचे सैन्य यरुशलेमविरुद्ध लढण्यास येईल. यरुशलेमच्या घरांत खूप मृतदेह असतील.
6. “पण मग मी त्या नगरीतील लोकांना बरे करीन. मी त्यांना शांती आणि सुरक्षा ह्यांचा आनंद लुटू देईन.
7. यहूदा आणि इस्राएल यांना मी परत आणीन पूर्वीप्रमाणेच मी त्या लोकांना शक्तिशाली करीन.
8. त्यांनी माझ्याशी पापे केली. पण मी ती पापे धुवून टाकीन. ते माझ्याविरुद्ध लढले पण मी त्यांना क्षमा करीन.
9. मग यरुशलेम एक सुंदर ठिकाण होईल. लोक सुखी असतील दुसऱ्या राष्ट्रांतील लोक त्या नगरीची स्तुती करतील. यरुशलेममध्ये चांगल्या गोष्टी घडत असल्याचे ऐकून इतर लोक प्रशंसा करतील. मी इस्राएलला शांतता आणि हित प्राप्त करुन दिल्यामुळे त्यांना माझ्याबद्दल आदरयुक्त दरारा वाटेल व त्यामुळे ते कापतील.
10. “तुम्ही लोक म्हणत आहात “आमचा देश म्हणजे ओसाड वाळवंट आहे. तेथे कोणी माणसे वा प्राणी राहत नाहीत.’ यरुशलेमच्या रस्त्यांवर व यहूदाच्या शहरात सध्या शांतता आहे. पण लवकरच तेथे कोलाहल सुरु होईल.
11. तेथे सुखाचे व आनंदाचे कल्लोळ उठतील. नव-वर-वधूंचे सुखसंवाद ऐकू येतील. परमेश्वराला अर्पण करण्यासाठी भेटी घेऊन परमेश्वराच्या मंदिरात येणाऱ्या लोकांचे आवाज ऐकू येतील. ते लोक म्हणतील, ‘परमेश्वर देवाची स्तुती करा. परमेश्वर चांगला आहे. परमेश्वराची कृपा चिरंतन आहे!’ मी यहूदासाठी चांगल्या गोष्टी करीन. म्हणून लोक असे म्हणतील. ते सर्व सुरुवातीला जसे होते तसे असेल.” देवाने ह्या गोष्टी सांगितल्या.
12. सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “आता ही जागा निर्जन आहे. तेथे मनुष्य वा प्राणी कोणीही नाही. पण यहूदातील गावे माणसांनी गजबजतील. तेथे मेंढपाळ असतील आणि त्यांच्या मेंढ्यांना रवंथ करण्यासाठी कुरणेही असतील.
13. मेंढ्या मेंढपाळांच्या पुढे चालत असताना. मेंढपाळ त्या मोजतील. सर्व देशातील लोक-डोंगराळ प्रदेशातील, पश्र्चिमेकडच्या डोंगरपायथ्याचे व नेगेव मधील लोक आणि यहूदातील इतर शहरांतील माणसे मेंढ्यांची मोजदाद करतील.
14. हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “मी इस्राएल आणि यहूदा येथील लोकांना विशेष वचन दिले आहे मी कबूल केलेल्या गोष्टी करण्याची वेळ येत आहे.
15. त्यावेळी दावीदाच्या वंशवृक्षाची एक चांगली शाखा मी वाढवीन ती ‘शाखा’ देशासाठी चांगल्या आणि योग्य गोष्टी करील.
16. ह्या ‘शाखेच्या’ काळात यहूदातील लोकांचे रक्षण केले जाईल. लोक यरुशलेममध्ये सुखरुप राहतील. त्या शाखेचे नाव ‘परमेश्वर चांगला आहे” असे आहे.
17. परमेश्वर म्हणतो, “दावीदाच्या घराण्यातील माणूस नेहमीच सिंहासनावर बसेल व इस्राएलवर राज्य करील.
18. आणि याजक नेहमी लेवी घराण्यातील असतील. ते याजक नेहमी माझ्यासमोर उभे राहतील आणि ते मला होमार्पण, धान्य अर्पण करतील आणि बळीही अर्पण करतील.”
19. यिर्मयाला परमेश्वराचा संदेश आला.
20. परमेश्वर म्हणतो, “दिवस आणि रात्र यांच्याबरोबर मी करार केला आहे. ते निरंतर राहतील असे मी मान्य केले, तुम्ही तो करार बदलू शकत नाही. दिवस आणि रात्र नेहमी योग्य वेळेलाच येतील. तुम्ही जर हा करार बदलू शकला,
21. तरच तुम्ही माझा दावीद व लेवी यांच्याबरोबर झालेला करार बदलू शकाल. मग दावीदाचे वंशज राजे होणार नाहीत आणि लेवीच्या घराण्यातून याजक येणार नाहीत.
22. पण मी माझा सेवक दावीद आणि लेवीचे कूळ यांना मोठा वंश देईल. आकाशातील ताऱ्यांएवढी त्यांच्या वंशजांची संख्या असेल कोणीही आकाशातील तारे मोजू शकत नाही. अथवा समुद्रकाठच्या वाळूच्या कणांएवढी त्यांची संख्या असेल. कोणीही वाळूचे कण मोजू शकत नाही.”
23. यिर्मयाला परमेश्वराचा पुढील संदेश मिळाला
24. “यिर्मया, लोक काय बोलतात, ते तू ऐकलेस का? ते लोक म्हणतात ‘परमेश्वर इस्राएल आणि यहूदा या घराण्यापासून दूर गेला. परमेश्वराने त्या लोकांची निवड केली होती.’ पण आता तो त्यांचा राष्ट्र म्हणून सुद्धा स्वीकार करीत नाही.”
25. परमेश्वर म्हणतो, “माझा दिवस व रात्र यांच्याबरोबरच्या कराराचा जर भंग झाला आणि मी जर आकाश आणि पृथ्वी ह्यांच्यासाठी नियम केले नसते, तर कदाचित् मी त्या लोकांना सोडले असते.
26. मग कदाचित् याकोबच्या वंशजांचा मी त्याग केला असता आणि दावीदच्या वंशजांना, अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांच्या वंशजांवर राज्य करु दिले नसते. पण दावीद माझा सेवक आहे आणि मला त्या लोकांची दया येईल आणि प्रेम वाटेल. मी कैद्यांना पुन्हा त्यांच्या मायभूमीत परत आणीन.”

  Jeremiah (33/52)