← Jeremiah (25/52) → |
1. | यहूदातील सर्व लोकांबद्दल यिर्मयाला मिळालेला देवाचा संदेश असा आहे. यहोयाकीम राजाच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी हा संदेश आला. यहोयाकीम योशीयाचा मुलगा होता. यहोयाकीम राजाच्या कारकिर्दींचे चौथे वर्ष हे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्या कारकिर्दीचे पाहिलेच वर्ष होते. |
2. | यहूदा आणि यरुशलेम येथील लोकांना यिर्मयाने पुढील संदेश ऐकविला: |
3. | गेली 23 वर्षे मी परमेश्वराचे संदेश पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगत आहे. यहूदाचा राजा आमोन ह्याचा मुलगा योशीया ह्याच्या कारकिर्दीच्या 13 व्या वर्षापासून मी संदेष्टा आहे. मी तेव्हापासून आजपावेतो तुम्हाला परमेश्वराकडून आलेले संदेश ऐकविले आहेत. पण तुम्ही ऐकले नाही. |
4. | परमेश्वराने, त्याच्या सेवकांना संदेष्ट्यांना पुन्हा पुन्हा तुमच्याकडे पाठविले पण तुम्ही त्यांचे ऐकले नाही. तुम्ही त्यांच्याकडे लक्षसुद्धा दिले नाही. |
5. | ते संदेष्टे म्हणाले, “तुमची राहणी बदला. त्या वाईट गोष्टी करु नका. तुम्ही तुमचे वागणे बदललेत, तर तुम्ही, परमेश्वराने तुम्हाला आणि तुमच्या पूर्वजांना दिलेल्या देशात, परत जाऊ शकाल. त्याने तुम्हाला ही भूमी कायमची राहण्यास दिली होती. |
6. | दुसऱ्या दैवतांना अनुसरु नका. त्यांची सेवा वा पूजा करु नका. एखाद्या माणसाने तयार केलेल्या मूर्तींची पूजा करु नका. त्यामुळे मला तुमचा रागच येतो. असे करुन तुम्ही स्वत:लाच दुखविता. |
7. | “पण तुम्ही माझे ऐकले नाही.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “माणासाने घडविलेल्या मूर्तीची तुम्ही पूजा केली. त्यामुळे मला राग आला त्यामुळे तुम्ही दुखविले जाता एवढेच.” |
8. | सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणाला, “तुम्ही माझ्या संदेशाकडे लक्ष दिले नाही. |
9. | म्हणून मी लवकरच उत्तरेकडील कुळांना बोलावून घेईन.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “मी लवकरच बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याला निरोप पाठवीन. तो माझा सेवक आहे. मी त्यांना यहूदा व यहूदातील लोक यांच्याविरुध्द उठवीन. तुमच्या देशाभोवतालच्या राष्ट्रांच्यासुद्धा विरोधात मी त्यांना आणीन. मी त्या सर्व देशांचा नाश करीन. मी त्या भूमीचे कायमचे ओसाड वाळवंट बनवीन. लोक ते देश व त्याचा वाईट प्रकारे झालेला नाश पाहतील व हळहळतील. |
10. | त्या ठिकाणच्या सुखाच्या व आनंदाच्या कल्लोळांचा मी शेवट करीन. तेथे नव वर वधूंचा सुखाचा शब्द उमटणार नाही, जात्यांचा आवाज येणार नाही आणि दिव्यातला प्रकाश नाहीसा होईल. |
11. | ती सगळी भूमी वैराण वाळवंट होईल तेथील सर्व लोक, 70 वर्षांपर्यत बाबेलच्या राजाचे दास होतील. |
12. | “पण 70 वर्षांनंतर मी बाबेलच्या राजाला शिक्षा करीन. मी बाबेल राष्ट्रालाही शिक्षा करीन.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “मी खास्द्यांनी केलेल्या पापाबद्दल त्यांच्या देशाला शिक्षा करीन. मी त्या भूमीचे रुपांतर कायमच्या वाळवंटात करीन. |
13. | बाबेलमध्ये खूप वाईट गोष्टी घडतील हे मी सांगितले आहेच त्या सर्व गोष्टी घडतीलच. यिर्मयाने त्या परक्या देशाबद्दल भविष्यकथन केलेच आहे आणि या पुस्तकात सर्व थोक्याचे इशारे लिहिले आहेत. |
14. | हो! बाबेलच्या लोकांना खूप राष्ट्रांचे आणि मोठ्या राजांचे दास्य करावे लागेल. त्यांच्या कृत्यांबद्दल योग्य अशीच शिक्षा त्यांना मी देईन.” |
15. | परमेश्वराने, इस्राएलच्या देवाने मला या गोष्टी सांगितल्या: “यिर्मया, माझ्या हातातील द्राक्षरसाचा प्याला घे. तो माझ्या क्रोधाचा द्राक्षरस आहे. मी तुला वेगवेगळ्या राष्ट्रात पाठवीत आहे. त्या सर्व राष्ट्रांना हा द्राक्षरस प्यायला लाव. |
16. | ते हा द्राक्षरस पितील. मग ते वांत्या करतील आणि वेड्याप्रमाणे वागतील. मी लवकरच त्यांच्यावर शत्रूला हल्ला करायला लावणार असल्याने ते असे वागतील.” |
17. | मग मी देवाच्या हातातून द्राक्षरसाचा प्याला घेतला. देवाने मला पाठवलेल्या त्या सर्व राष्ट्रांत मी गेलो आणि तेथील लोकांना त्यातील द्राक्षरस प्यायला लावला. |
18. | मी यहूदा आणि यरुशलेम यामधील लोकांसाठी तो द्राक्षरस ओतला. यहूदातील राजे आणि नेते ह्यांना मी द्राक्षरस प्यायला लावला. ते वैराण वाळवंट व्हावेत, त्या ठिकाणाचा सर्वनाश व्हावा, तो नाश पाहून लोकांनी हायहाय करावे व त्याबद्दल कोसावे म्हणून मी असे केले आणि तसेच घडले. यहूदाचे आता तेच झाले आहे! |
19. | मी मिसरच्या फारोलाही द्राक्षरस प्यायला भाग पाडले. परमेश्वराच्या क्रोधाने भरलेल्या प्याल्यातून मी मिसरच्या अधिकाऱ्यांना, महत्वाच्या नेत्यांना आणि लोकांना द्राक्षरस प्यायला लावला. |
20. | मी सर्व अरब व ऊस देशातील राजे यांनाही द्राक्षरस पिण्यास दिला. मी पलिष्ट्यांच्या देशातील अश्कलोन, गज्जा, एक्रोन या शहरांतील व अश्दोद शहरामधील उरलेले अशा सर्व राजांना त्या प्याल्यातून द्राक्षरस पिण्यास भाग पाडले. |
21. | मग मी अदोम, मवाब व अम्मोन यामधील राजांनाही द्राक्षरस प्यायला लावले. |
22. | सोरच्या व सीदोनच्या सर्व राजांनाही मी द्राक्षरस पाजला. खूप दूरच्या देशातील सर्व राजांनाही मी द्राक्षरस दिला. |
23. | ददान, तेमा व बूज येथील लोकांनाही मी त्या प्याल्यातून प्यायला लावले. मंदिरात दाढीच्या कडा कापणाऱ्या सर्व लोकांना मी द्राक्षरस पिण्यास भाग पाडले. |
24. | अरबस्तानातील सर्व राजांनाही मी द्राक्षरस प्यायला दिला. हे राजे वाळवंटात राहतात. |
25. | जिमरी, एलाम व मेदी येथील सर्व राजांना मी द्राक्षरस पाजला. |
26. | उत्तरेकडील सर्व, दूरच्या व जवळच्या राजांना मी ही द्राक्षरस पिण्यास भाग पाडले. एकामागून एकाला मी तो प्यायला लावला. पृथ्वीवरील सर्व राज्यांना मी परमेश्वरच्या क्रोधाने भरलेल्या प्याल्यातून प्यायला लावले. पण बाबेलचा राजा, सर्व राष्ट्रांच्या नंतर या प्याल्यातून पिईल. |
27. | “यिर्मया, तू त्या राष्ट्रांना सांग की सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, ‘माझ्या क्रोधाच्या प्याल्यातून प्या. त्यामुळे झिंगा आणि वांत्या करा. पडा आणि परत उठू नका. उठू नका कारण तुम्हाला ठार करण्यासाठी मी तलवार पाठवीत आहे.’ |
28. | “ते लोक तुझ्या हातातून प्याला घेण्याचे नाकारतील. ते त्यातील द्राक्षरस पिण्यास नकार देतील पण तू त्यांना सांग ‘सर्वशक्तिमान परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो. तुम्ही खरोखरच ह्या प्याल्यातून प्यावे. |
29. | माझ्या नावाने प्रसिध्द असलेल्या यरुशलेम नगरीत वाईट गोष्टी घडवून आणण्यास मी अगोदरच सुरवात केली आहे. आपल्याला शिक्षा होणार नाही असे तुम्हाला वाटण्याचा संभव आहे. पण तुम्ही चुकता आहात. तुम्हाला शिक्षा होईलच. मी पृथ्वीवरील सर्व माणसांना मारण्यासाठी तलवारीला साद घालीत आहे.”‘ हा परमेश्वराचा संदेश आहे. |
30. | “यिर्मया, तू त्यांना पुढील संदेश दे: ‘परमेश्वर वरुन गर्जना करीत. आहे तो त्याच्या पवित्र मंदिरातून गर्जना करीत आहे. तो त्याच्या कुरणाला (लोकांना) ओरडतो. द्राक्षरस काढताना, द्राक्षे तुडविताना, लोक ज्याप्रमाणे मोठ्याने गातात, त्याप्रमाणे देवाच्या आरोळ्या मोठ्या आहेत. |
31. | तो आवाज पृथ्वीवरील सर्व लोकांपर्यंत पसरतो. हा सगळा गोंगाट कशासाठी आहे? परमेश्वर सर्व राष्ट्रांतील लोकांना शिक्षा करीत आहे. परमेश्वराने लोकांच्याविरुद्ध आपले म्हणणे मांडले. त्यांने लोकांचा न्यायनिवाडा केला. आणि तो आता तलवारीने दुष्ट लोकांना ठार मारीत आहे.” हा परमेश्वराचा संदेश आहे. |
32. | सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “अरिष्ट एका देशातून दुसऱ्या देशात लवकरच पसरेल. तो पृथ्वीवरच्या अती दूरच्या ठिकाणाहून वादळाप्रमाणे येईल.” |
33. | त्या लोकांची प्रेते पृथ्वीच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे पोहोचतील. त्यांच्यासाठी कोणीही रडणार नाही. कोणीही ती गोळा करुन पुरणार नाही. शेणाप्रमाणे ती जमिनीवर पडतील. |
34. | मेंढपाळांनो (नेत्यानो) तुम्ही मेंढ्यांना (लोकांना) वळवावे. प्रमुख नेत्यांनो, रडायला सुरवात करा. मेंढ्यांच्या (लोकांच्या) नेत्यांनो, जमिनीवर दु:खाने लोळा. का? कारण ही तुमच्या कत्तलीची वेळ आहे. परमेश्वर तुम्हाला मोडील आणि सगळीकडे पसरवील. तुम्ही फुटक्या मडक्याच्या तुकड्याप्रमाणे सगळीकडे पसराल. |
35. | मेंढपाळांना लपायला कोठेही जागा राहणार नाही. ते नेते पळून जाऊ शकणार नाहीत. |
36. | मग मेंढपाळांच्या (नेत्यांचा) आरोळ्या ऐकू येतात. त्यांचे रडणे ऐकून परमेश्वर त्यांची कुरणें (देश) नष्ट करीत आहे. |
37. | त्या शांत कुरणांचा (जागांचा) नाश केला जाईल आणि ती ओसाड वाळवटे होतील. परमेश्वर रागावल्याने असे घडले. |
38. | परमेश्वर गुहेत राहाणाऱ्या भयंकर सिंहाप्रमाणे आहे. परमेश्वर रागावला आहे आणि त्याचा क्रोध त्या लोकांना इजा करील. त्यांचा देश ओसाड वाळवंट होईल. |
← Jeremiah (25/52) → |