← Jeremiah (24/52) → |
1. | परमेश्वराने मला पुढील गोष्टींचा दृष्टांन्त दिला: परमेश्वराच्या मंदिरासमोर दोन अंजिराच्या टोपल्या व्यवस्थित मांडलेल्या मी पाहिल्या. (बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने यकोन्याला कैद करुन नेले, त्यांनंतर हा दृष्टांन्त झाला. यकोन्या हा यहोयाकीम राजाचा मुलगा होता. यकोन्या आणि त्याचे महत्वाचे अधिकारी ह्यांना यरुशलेममधून दूर नेले गेले. त्यांना बाबेलला नेले गेले. नबुखद्नेस्सरने यहूदातील सर्व सुतार व लोहार यांनाही नेले.) |
2. | एका टोपलीत खूप चांगली अंजिरे होती. ती मोसमाच्या सुरवातीला पिकलेल्या अंजिरासारखी होती. पण दुसऱ्या टोपलीत नासकी अंजिरे होती. ती खाण्यालायक नव्हती. |
3. | परमेश्वराने मला विचारले, “यिर्मया, तू काय पाहिलेस?” मी म्हणालो, “मी अंजिरे पाहिली. चांगली अंजिरे फारच उत्तम आहेत. पण वाईट अंजिरे फारच नासकी आहेत. ती खाण्यासाखी नाहीत.” |
4. | नंतर परमेश्वराचा संदेश मला मिळाला. |
5. | परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणाला, “यहूदातील लोकांना त्यांच्या देशापासून दूर नेले गेले आहे. त्यांच्या शत्रूने त्यांना बाबेलला नेले. ते लोक ह्या चांगल्या अंजिरासारखे आहेत. मी त्यांच्यावर दया करीन. |
6. | मी त्यांचे रक्षण करीन. मी त्यांना यहूदाला परत आणीन. मी त्यांचा नाश होऊ देणार नाही मी त्यांना परत उभे करीन. मी नुसतेच त्यांना वर काढणार नाही, तर त्यांना रुजवीन म्हणजे ते वाढू शकतील. |
7. | मला ओळखण्याची इच्छा मी त्यांच्यात निर्माण करीन. मग मी परमेश्वर आहे हे त्यांना समजेल. ते माझे होतील व मी त्यांचा देव होईन. बाबेलमधील हे सर्व कैदी अंत:करणापासून माझ्याकडे परत आले आहेत म्हणून मी त्यांच्यासाठी हे करीन. |
8. | “पण यहूदाचा राजा सिद्कीया हा त्या अतिशय नासल्यामुळे खाण्यालायक न राहिलेल्या अंजिरासारखा असेल. सिद्कीया त्याचे उच्चपदस्थ अधिकारी, यरुशलेममध्ये उरलेले लोक व मिसरमध्ये राहत असलेले यहूदी हे सर्व त्या नासक्या अंजिरासारखे असतील. |
9. | “मी त्यांना शिक्षा करीन. त्या शिक्षेने पृथ्वीवरील सर्व लोकांना धक्का बसेल. यहूदातील ह्या लोकांची इतर लोक चेष्टा करतील लोक एकमेकांना त्यांच्याबद्दलचे विनोदी किस्से सांगतील. मी त्यांना जेथे पाठवीन, तेथे तेथे लोक त्यांना शाप देतील. |
10. | मी त्यांच्यावर लढाई, उपासमार आणि रोगराई ह्या आपत्ती पाठवीन. ते सर्व ठार होईपर्यंत मी त्यांच्यावर हल्ला करीन. मग मी त्यांना आणि त्याच्या पूर्वजांना दिलेल्या भूमीवर ते अजिबात शिल्लक राहणार नाहीत.” |
← Jeremiah (24/52) → |