Jeremiah (21/52)  

1. यहूदाचा राजा सिद्कीया याने पशूहरला आणि सफन्या नावाच्या याजकाला यिर्मयाकडे पाठविले. त्याच वेळी यिर्मयाला परमेश्वराचा संदेश आला. पशहूर हा मल्कीयाचा मुलगा होता, तर सफन्या मासेचा मुलगा होता. पशहूर व सफन्या ह्यांनी यिर्मयासाठी निरोप आणला.
2. पशहूर आणि सफन्या यिर्मयाला म्हणाले, “आमच्यासाठी परमेश्वराजवळ प्रार्थना कर. काय घडणार आहेत ते परमेश्वराला विचार. कारण बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर आपल्यावर स्वारी करीत आहे, म्हणून आम्हाला भविष्यात काय घडणार हे जाणून घ्यायचे आहे. कदाचित् परमेश्वर पूर्वीप्रमाणे काही विस्मयकारक घटना घडवून आणील. कदाचित् परमेश्वर नबुखद्नेस्सरला स्वारी करण्यापासून परावृत्त करील व परतवून लावेल.”
3. नंतर पशूहर व सफन्या यांना यिर्मया म्हणाला, “सिद्कीया राजाला सांगा,
4. परमेश्वर, इस्राएलचा देव असे म्हणतो “तुमच्याजवळ युद्धोपयोगी शस्त्रे आहेत. तुम्ही त्याचा उपयोग बाबेलचा राजा व खास्दी यांच्यापासून तुमचे रक्षण करण्यासाठी करीत आहात. मी ती शस्त्रे निरुपयोगी करीन. “बाबेलचे सैन्य नगरीच्या तटबंदीबाहेर सगळीकडे पसरले आहे. लवकरच त्या सैन्याला मी यरुशलेममध्ये आणीन.
5. मी स्वत: यहूदाच्या लोकांविरुद्ध म्हणजे तुमच्याविरुद्ध लढेन. मी माझ्या सामर्थ्यवान हाताने तुमच्याशी युद्ध करीन. कारण मी तुमच्यावर फार रागावलो आहे. मी तुमच्याविरुद्ध जोरदार युद्ध करुन माझ्या तुमच्यावरील रागाची तीव्रता सिद्ध करीन.
6. यरुशलेममध्ये राहाणाऱ्या लोकांना मी ठार मारीन. सर्व शहरात रोगराई पसरवून मी माणसांना व प्राण्यांना मारीन.
7. असे घडल्यावर,” हा परमेश्वराचा संदेश आहे, ‘मी यहूदाचा राजा सिद्कीया याला, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्या स्वाधीन करीन. मी सिद्कीयाच्या अधिकाऱ्यानासुद्धा नबुखदनेस्सरच्या हवाली करीन. यरुशलेममधील काही लोक भयंकर रोगराई अथवा लढाई वा उपासमार याने मरणार नाहीत. पण त्या सर्वांना मी नबुखद्नेस्सरच्या ताब्यात देईन. मी यहूदाच्या शत्रूला विजयी करीन. नबुखद्नेस्सरच्या सैन्याला यहूदातील लोकांना ठार मारायचे आहे म्हणून यहूदातील व यरुशलेममधील लोक तलवरीच्या घावाने मारले जातील. नबुखद्नेस्सर त्या लोकांना अजिबात दया दाखविणार नाही व त्यांच्याबद्दल त्याला दु:खही वाटणार नाही.’
8. “यरुशलेममधील लोकांना असेही सांग, असे म्हणून परमेश्वराने पुढील गोष्टी सांगितल्या, ‘मी तुम्हाला जीवन मरण ह्यात निवड करण्याचे स्वातंत्र्य देईन. मी काय म्हणतो ते समजावून घ्या.
9. जो यरुशलेममध्ये राहील तो लढाईत, उपासमारीने वा भयंकर रोगराईने मरेल, पण जो कोणी यरुशलेमच्या बाहेर जाऊन बाबेलच्या सैन्याला शरण जाईल, तो जागेल. त्या सैन्याने नगरीला वेढा घातला आहे म्हणून नगरीला रसद मिळू शकत नाही. पण जो कोणी नगर सोडून जाईल, त्याचा जीव वाचेल.
10. यरुशलेम नगरीवर संकट आणण्याचे मी ठरविले आहे. मी तिला मदत करणार नाही.” हा परमेश्वराचा संदेश आहे, “मी बाबेलच्या राजाला यरुशलेम देऊन टाकीन. तो ती आगीत भस्मसात करील.’
11. यहूदाच्या राजघराण्याला हे सांगा: परमेश्वराकडून आलेला संदेश ऐका.
12. दावीदाच्या घराण्यातील लोकानो, परमेश्वर असे म्हणतो, ‘तुम्ही दररोज न्याय्यपणे लोकांचा निवाडा केला पाहिजे. गुन्हेगारांपासून बळींचे रक्षण करा. तुम्ही असे केले नाही, तर मी खूप रागावेन. माझा राग, कोणीही विझवू न शकणाऱ्या अग्नीप्रमाणे असेल. तुम्ही दुष्कृत्ये केली म्हणून असे होईल.’
13. यरुशलेम, मी तुझ्याविरुद्ध आहे. तू डोंगराच्या शिखरावर बसतेस. तू ह्या दरीच्यावर राणीप्रमाणे बसतेस. तुम्ही, यरुशलेममध्ये राहणारे लोक म्हणता, ‘कोणीही आमच्यावर हल्ला करु शकणार नाही. कोणीही आमच्या भक्कम नगरीत येणार नाही.’ पण परमेश्वराकडून आलेला हा संदेश ऐका:
14. “तुम्हाला योग्य अशी शिक्षा मिळेल. तुमच्या रानास मी आग लावेन ती आग तुमच्याभोवतीचे सर्व काही जाळून टाकील.”‘

  Jeremiah (21/52)