← Jeremiah (12/52) → |
1. | परमेश्वरा, जेव्हा मी तुझ्याशी वाद घालतो, तेव्हा तुझेच म्हणणे बरोबर ठरते. पण काही गोष्टी बरोबर वाटत नाहीत. त्याबद्दल मला तुला विचारावेसे वाटते. दुष्ट लोकच यशस्वी का होतात? तू ज्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाहीस, अशांना सुखाचे आयुष्य का मिळते? |
2. | त्या दुष्टांना तूच इथे वसविलेस ती माणसे मजबूत मुळे असलेल्या झाडांप्रमाणे आहेत. ती वाढतात आणि फळे देतात. तोंडाने, तू त्यांना जवळचा व प्रिय असल्याचे, ते सांगतात. पण मनाने ते तुझ्यापासून फार दूर आहेत. |
3. | पण, परमेश्वरा, तू माझे मन जाणतोस. तू मला पाहतोस आणि माझ्या मनाची परीक्षा घेतोस. कत्तल करण्यासाठी मेंढ्यांना जसे फरपटत आणतात, तसे त्यांना फरपटत आण. कत्तलीच्या दिवसासाठी त्यांची निवड कर. |
4. | किती काळ जमीन कोरडी राहणार? किती काळ गवत वाळून मरणार? त्या दुष्ट लोकांच्या चुकीमुळे प्राणी आणि पक्षी मरुन गेले. तरीसुद्धा ते लोक म्हणतात, “आमचे काय होईल हे पाहण्याइतक्या दीर्घकाळ यिर्मया जगणार नाही.” |
5. | “यिर्मया, माणसांबरोबर धावण्याच्या शर्यतीत जर तू दमतोस, तर मग घोड्यांशी तू कशी स्पर्धा करणार? जर तू सुरक्षित ठिकाणी कंटाळलास, तर धोकादायक ठिकाणी काय करशील? यार्देन नदीकिनारी वाढणाऱ्या कंाटेरी झुडुंपात तू काय करशील? |
6. | ही सर्व माणसे तुझेच भाऊबंद आहेत. तुझ्याच कुटुंबातील माणसे तुझ्याविरुद्ध कट करीत आहेत. तुझ्याच घरातील माणसे तुझ्याविरुद्ध आवाज उठवीत आहे. जरी ते तुझ्याशी मित्रांसारखे बोलत असले, तरी तू त्यांच्यावर विश्वास ठेवू नकोस.” |
7. | “मी परमेश्वराचा माझ्या घराचा त्याग केला आहे. मी माझी मालमत्ता सोडली आहे. मी माझी प्रियतमा (यहूदा) तिच्या वैऱ्यांच्या ताब्यात दिली आहे. |
8. | माझे स्वत:चेच लोक जंगली सिंहाप्रमाणे माझ्याविरुद्ध उलटले. ते माझ्याकडे पाहून डरकाळ्या फोडू लागल्याने मी त्यांच्याकडे पाठ फिरविली. |
9. | मरायला टेकल्यामुळे गिधाडांनी घेरलेल्या प्राण्याप्रमाणे माझ्या लोकांची स्थिती आहे. गिधाडे तिच्याभोवती (यहूदाभोवती) घिरट्या घालतात. वन्य प्राण्यांनो, तुम्हीसुध्दा या आणि काही खाद्य मिळवा. |
10. | पुष्कळ मेंढपाळांनी (नेत्यांनी) माझ्या द्राक्षमळ्याचा नाश केला आहे. त्यांनी द्राक्षेवेली पायदळी तुडविल्या. त्यांनी माझ्या द्राक्षमळ्याचे वैराण वाळवंट केले. |
11. | त्यांनी माझा मळा उजाड केला. तो सुकून मरुन गेला. तेथे कोणीही राहत नाही. सर्व देश म्हणजे एक निर्जन वाळवंट झाले आहे. त्या मळ्याची काळजी घेण्यासाठी एकही माणूस उरला नाही. |
12. | त्या रिकाम्या वाळवंटाच्या हिरवळीतून लूट करण्याकरिता सैन्य आले. परमेश्वराने त्या सैन्याचा उपयोग त्या देशाला शिक्षा करण्यासाठी केला. देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत राहणाऱ्या सर्वांना शिक्षा केली. कोणीही वाचला नाही. |
13. | लोकांनी गहू पेरला, तर तिथे काटे उगवतील. लोक दमेपर्यंत खूप कष्ट करतील, पण या अफाट मेहनतीचे फळ त्यांना मिळणार नाही. त्यांच्या पिकाबाबत ते खजिल होतील. परमेश्वराच्या कोपामुळे या गोष्टी घडतील.” |
14. | देव काय म्हणतो ते पाहा: “इस्राएलच्या भोवती राहणाऱ्या लोकांसाठी मी काय करणार आहे, ते ती तुम्हाला सांगतो. ते लोक फार दुष्ट आहेत. मी इस्राएलच्या लोकांना दिलेल्या जमिनीचा त्या लोकांनी नाश केला. त्या पापी लोकांना, मी, खेचून काढीन व त्यांच्या देशाबाहेर त्यांना हाकलून देईन. त्यांच्याबरोबर यहूदाच्या लोकांनाही मी बाहेर खेचीन. |
15. | पण अशा रीतीने त्या लोकांना देशाबाहेर हाकलल्यावर मला त्यांची कणव येईल. मी प्रत्येक कुटुंब परत त्यांच्या देशात आणीन आणि त्यांची जमीन परत देईल. |
16. | ह्यातून त्या लोकांनी योग्य तो बोध घ्यावा असे मला वाटते. पूर्वी त्या लोकांनी, माझ्या माणसांना, बआलच्या नावाने वचन घ्यायला शिकविले होते. आता मी त्याच रीतीने त्यांना धडा शिकविणार. वचन घेताना माझे नाव घेण्यास त्यांनी शिकावे असे मला वाटते. ‘देव नक्कीच असेपर्यंत’ अशी सुरवात त्यांनी करावी अशी माझी इच्छा आहे. त्यांनी असे केले तर मी त्यांना यशस्वी करीन आणि माझ्या लोकांत राहू देईन. |
17. | पण जर एखाद्या राष्ट्राने माझा आदेश मानला नाही, तर त्या राष्ट्राचा मी समूळ नाश करीन. त्या राष्ट्राला मेलेल्या झाडाप्रमाणे उपटीन.” हा परमेश्वराचा संदेश आहे. |
← Jeremiah (12/52) → |