← Isaiah (31/66) → |
1. | मदत मागण्यासाठी मिसरमध्ये जाणारे ते लोक पाहा ते घोडे मागतात. घोडे आपला बचाव करतील असे त्यांना वाटते. मिसरमधील रथ आणि घोडेस्वार आपल्याला वाचवतील असा या लोकांचा समज आहे. मिसरचे सैन्य मोठे असल्याने आपण सुरक्षित आहोत असेच त्यांना वाटते. हे लोक इस्राएलच्या पवित्र देवावर विश्वास ठेवत नाही. ते परमेश्वराची मदत मागत नाहीत. |
2. | पण खरा ज्ञानी परमेश्वर आहे. त्यांच्यावर संकटे आणणारा परमेश्वरच असेल. परमेश्वराची आज्ञा बदलण्याची ताकद लोकांत असणार नाही. पापी लोकांच्याविरूध्द (यहुदाच्याविरूद्द) देव उभा राहील आणि लढेल. ह्या पापी लोकांना मदत करणाऱ्या लोकांविरूध्द म्हणजे मिसरच्या लोकांविरूध्दही देव लढेल. |
3. | मिसरमधील लोक फक्त माणसे आहेत देव नाहीत. मिसरमधील घोडे फक्त प्राणी आहेत पण आत्मे नाहीत. परमेश्वर स्वत:चा हात लांब करील आणि मदतनीसाचा (मिसरचा) पराभव होईल. त्याची मदत घेणारे लोक (यहुदा) पडतील. त्या सर्व लोकांचा बरोबरच नाश केला जाईल. |
4. | परमेश्वराने मला सांगितले, “जेव्हा एखादा सिंह किंवा त्याचा छावा, खाण्यासाठी, जनावर पकडतो तेव्हा तो त्या मारलेल्या प्राण्यापाशी उभा राहून डरकाळ्या फोडतो. त्या वेळी कोणीही त्या शक्तिशाली सिंहाला घाबरवू शकत नाही. जरी माणसे आली आणि त्यांनी आरोळ्या ठोकल्या तरी तो सिंह भिणार नाही. लोकांनी कितीही कोलाहल केला तरी तो सिंह पळून जाणार नाही.” ह्याचप्रमाणे सर्वशक्तिमान परमेश्वर खाली उतरून सियोन पर्वतावर येईल. तो तेथे लढेल. |
5. | पक्षी ज्याप्रमाणे घिरट्या घालून आपल्या घरट्याचे रक्षण करतात, त्याचप्रमाणे सर्वशक्तिमान परमेश्वर यरूशलेमचे रक्षण करील. परमेश्वर तिला वाचवील. परमेश्वर यरूशलेमचे “वरून जाऊन” रक्षण करील. |
6. | इस्राएलच्या मुलांनो, तुम्ही देवाच्याविरूध्द गेलात. तुम्ही देवाकडे परत यावे. |
7. | मग, तुम्ही बनविलेल्या सोन्या चांदीच्या मूर्तींची पूजा करणे लोक बंद करतील. त्या मूर्ती तयार करून तुम्ही खरोखरच पाप केले. |
8. | इस्राएलच्या ईशान्येकडील एकेकाळी शक्तिशाली असलेले हे (अश्शूर) राष्ट्र तलवारीच्या बळावर पराभूत होईल. पण ही तलवार मानवाची नसेल. अश्शूरचा नाश होईल. पण हा नाश मानवाच्या तलवारीने होणार नाही. देवाच्या तलवारीमुळे अश्शूर पळून जाईल. पण त्यातील तरूणांना पकडून गुलाम केले जाईल. |
9. | त्याच्या संरक्षणाच्या जागा नष्ट केल्या जातील. त्यांचे नेते पराभूत होतील आणि ते त्यांचा ध्वज सोडून देतील म्हणजेच त्यांची सत्ता नाहीशी होईल. परमेश्वराने या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. परमेश्वराची शेकोटी (वेदी) सियोनवर आहे. परमेश्वराची भट्टी (वेदी) यरूशलेममध्ये आहे. |
← Isaiah (31/66) → |