| ← Isaiah (23/66) → |
| 1. | सोरविषयी शोक संदेश तार्शीशच्या गलबतावरील प्रवाशांनो, तुमची गलबते जेथे लागतात ते बंदर उध्वस्त झाले आहे तेव्हा शोक करा. (कित्तीहून परतणाऱ्या गलबतांवरील प्रवाशांना ही बातमी सांगितली गेली.) |
| 2. | समुद्रकाठी राहणाऱ्या लोकांनो, दु:खाने स्तब्ध व्हा. सोर हे “सीदोनचे व्यापारी केंद्र आहे.” तेथील व्यापारी समुद्रपार जाऊन व्यापार करतात आणि धनदौलत आणतात. |
| 3. | ते समुद्रमार्गे जाऊन धान्याचा शोध घेतात. नाईल नदीच्या तीरावर पिकलेले धान्य ते विकत घेतात आणि इतर राष्ट्रांत विकतात. |
| 4. | सीदोन, तू खरे म्हणजे जास्त खिन्न व्हायला पाहिजेस. का? कारण आता समुद्र व समुद्रातील किल्ला म्हणजे सोर म्हणतात, “मला मुले नाहीत. मी प्रसूतिवेदना अनुभवल्या नाहीत. मी मुलांना जन्म दिला नाही. मी मुलांना वाढवले नाही.” |
| 5. | मिसरला सोरची वार्ता कळेल. ह्या वार्तेने मिसरला धक्का बसेल दु:ख होईल. |
| 6. | गलबतांनो, तुम्ही तार्शीशला माघारी जाणे बरे! समुद्रकाठी राहणाऱ्या लोकांनी खिन्न व्हायला पाहिजे. |
| 7. | पूर्वी तुम्ही सोरमध्ये मजा केली. आरंभापासून त्या शहराची वाढ होत आहे. त्या शहरवासीयांनी उपजीविकेसाठी दूरवर प्रवास केला आहे. |
| 8. | सोर शहराने पुष्कळ नेते दिले. तेथील व्यापारी म्हणजे जणूराजपुत्रच. व्यापाऱ्यांना सगळीकडे मान मिळतो. मग सोरविरूध्द कट कोणी रचला? |
| 9. | ही सर्वशक्तिमान परमेश्वराचीच करणी होती. त्याने सोरचे महत्व कमी करायचे ठरविले. |
| 10. | तार्शीशच्या गलबतांनो, तुम्ही स्वदेशी परत जाणे योग्य. लहान नदी जशी पार करतात, तसा समुद्र पार करा. तुम्हाला आता कोणीही अडवणार नाही. |
| 11. | परमेश्वराने आपला हात समुद्रापर्यंत पसरला आहे. सोरविरूध्द लढण्यासाठी तो राज्यांना गोळा करीत आहे. त्याने, तार्शीशचे सुरक्षित ठिकाण सोर नष्ट करण्याची कनानला आज्ञा दिली आहे. |
| 12. | परमेश्वर म्हणतो, “सीदोनच्या कुमारिके, तुझा नाश होईल. तू पुन्हा आनंदित होणार नाहीस.” पण सोरचे रहिवासी म्हणतात, “सायप्रस आम्हाला मदत करील.” पण जरी तुम्ही समुद्र पार करून सायप्रसला गेलात, तरी तुम्हाला तेथे आराम करायला जागा मिळणार नाही. |
| 13. | मग सोर लोक म्हणतात, “बाबेलोनमधील लोक आम्हाला मदत करतील.” पण खास्द्यांच्या भूमीकडे (बाबेलोनकडे) पाहा. बाबेलोन आता देश राहिलेला नाही. अश्शूरने बाबेलोनवर हल्ला केला आणि त्याच्या भोवती युध्दस्तंभ उभारले. सुंदर घरातील सर्व चीजवस्तू सैनिकांनी लुटल्या. अश्शूरांनी बाबेलोनला जंगली जनावरांना राहण्यायोग्य बनविले. त्यांनी बाबेलोनला पूर्णपणे उजाड केले. |
| 14. | तार्शीशच्या गलबतांनो, तुमचे सुरक्षिततेचे ठिकाण-सोर-हे नष्ट केले जाणार आहे म्हणून तुम्ही शोक करा. |
| 15. | सत्तर वर्षे सोर शहराला लोक विसरून जातील. (हा एका राज्याच्या कारकिर्दी इतका कालखंड आहे.) सत्तर वर्षांनंतर सोरची स्थिती पुढील गाण्यातील वेश्येसारखी असेल. |
| 16. | पुरूषांच्या विस्मरणात गेलेल्या वारांगने, तुझी सारंगी उचल आणि शहरातील रस्त्यातून फीर. सारंगीवर सुरेल गाणे वाजव. तुझे गाणे पुन्हा पुन्हा म्हण. म्हणजे लोकांना तुझी आठवण होईल. |
| 17. | सत्तर वर्षांनंतर परमेश्वर सोरबद्दल फेरविचार करील. आणि आपला निर्णय देईल. तेथे परत व्यापार सुरू होईल. ती पृथ्वीवरील सर्व देशांची वारांगना होईल. |
| 18. | पण तिने मिळविलेला पैसा ती जवळ ठेवणार नाही. व्यापारात तिला झालेला फायदा परमेश्वरासाठी राखून ठेवला जाईल. तो फायदा, ती परमेश्वराची सेवा करणाऱ्यांना देईल. मग परमेश्वराची सेवा करणाऱ्यांना पोटभर अन्न मिळेल. ते चांगले कपडे घालतील. |
| ← Isaiah (23/66) → |