Hebrews (8/13)  

1. आम्ही जे सांगत आहोत त्याचा मुद्दा असा आहे की: असा मुख्य याजक आम्हांला लाभलेला आहे की, जो स्वर्गामध्ये देवाच्या सिंहासनाच्या उजव्या बाजूस बसतो,
2. आणि कोणत्याही मानवनिर्मित मंडपात नव्हे, तर प्रभु परमेश्वारने बनविलेल्या खऱ्याखुऱ्या मंदिराच्या परमपवित्रस्थानात तो मुख्य याजकाची सेवा करतो.
3. प्रत्येक मुख्य याजक जो नेमलेला असतो, त्याला दाने व अर्पणे सादर करावी लागतात, म्हणून आपल्या ह्या मुख्य याजकालादेखील काहीतरी सादर करणे जरुरीचे होते.
4. जर तो पृथ्वीवर असता तर तो मुख्य याजकदेखील झाला नसता. कारण तेथे अगोदरचे नियमशास्त्राप्रमाणे दानांचे अर्पण करणारे आहेत.
5. ते जी कामे करतात, ती स्वर्गातील गोष्टींची नक्कल आणि छाया अशी आहेत. परमेश्वराचा मंडप घालीत असताना देवाने मोशेला जो आदेश दिला, तशी ही सेवा आहे, कारण देव म्हणाला, “तुला पर्वतावर मी जो नमुना दाखवीला त्या सूचनांबरहुकूम प्रत्येक गोष्ट कर.”
6. परंतु येशूला नेमून दिलेली याजकीय सेवा मुख्य याजकांच्या सेवेहून जशी फारच वरच्या दर्जाची आहे, तसाच येशू ज्या नवीन कराराचा मध्यस्थ आहे, तो करार अगोदरच्या कराराहून अधिक वरच्या दर्जाचा आहे, कारण तो करार अधिक चांगल्या वचनांच्या पायावर उभा आहे.
7. जर पूर्वीचा करार दोषविरहित असता तर त्याच्या जागी दुसऱ्या कराराची गरज भासली नसती.
8. परंतु देवाला लोकांमध्ये दोष आढळला. तो म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, असे दिवस येत आहेत, जेव्हा मी इस्राएल लोकांबरोबर नवा करार करीन व यहूदाच्या घराण्याशी नवा करार करीन.
9. ज्याप्रमाणे मी त्यांच्या पूर्वजांशी केला तशा प्रकारचा हा करार असणार नाही. त्या दिवशी मी त्यांच्या हाताला धरून इजिप्त देशातून बाहेर आणले, ते माझ्याशी केलेल्या कराराशी विश्वासू राहिले नाही, त्यामुळे मी त्यांच्याकडे पाठ फिरवली.
10. परमेश्वर म्हणतो, “त्या दिवसांनंतर मी इस्राएल लोकांबरोबर असा कराक करीन; मी माझे नियम त्यांच्या अंत:करणात घालीन, त्यांच्या ह्रदयांवर ते लिहीन, मी त्यांचा देव होइन, ते माझे लोक होतील.
11. तुमच्या प्रभूला ओळखा असे एखाद्या मनुष्याने आपल्या बंधूला अथवा आपल्या देशबांधवाला सांगण्याची गरज पडणार नाही, कारण त्यांच्यातील कनिष्टपासून वरिष्टांपर्यंत सर्वजण मला ओळखतील.
12. कारण मी दयाळूपणे यापुढे त्यांचे अपराध माफ करीन. त्यांची पापे विसरून जाईन.” यिर्मया 31:31-34
13. या कराराला नवीन करार म्हटले म्हणून त्याने पहिला करार जुना ठरविला. जे जुने ते निकामी ठरते व नाहीसे होऊन जाते.

  Hebrews (8/13)