Hebrews (12/13)  

1. म्हणून, विश्वास धरणारे पुष्कळ ढगांसारखे साक्षीदार सभोवती असल्याने आपल्याला अडथळा आणणाऱ्या सर्व गोष्टी तसेच सहजासहजी गुंतविणारे पाप आपण दूर फेकू या व जी शर्यत आपल्यासमोर आहे ती शर्यत आपण चिकाटीने पूर्ण करू.
2. जो आमचे विश्वासात नेतृत्व करतो आणि पूर्णत्वास नेतो त्या येशूवर आपले लक्ष केंद्रित करू या. जो आनंद त्याच्यासमोर होता त्यासाठी येशूने वधस्तंभ सहन केला होता. वधस्तंभावरील निंदास्पद मरणाला त्याने तुच्छ मानले आणि आता त्याने देवाच्या सिंहासनाजवळील उजवीकडे जागा घेतली आहे.
3. तुम्ही खचून जाऊ नये आणि धीर सोडू नये म्हणून पापी लोकांचा मोठ्या प्रमाणातील विरोध सहन कला. त्याचा विचार करा.
4. पापाविरुद्धच्या तुमच्या युद्धात तुम्ही रक्त सांडेपर्यंत अजून झगडा दिला नाही.
5. ज्याच्याकडून तुम्हांला उत्तेजन मिळेल असा जो शब्द (मुले) तुम्हाला उद्देशून वापरण्यात आला आहे त्याचा कदाचित तुम्हाला विसर पडलेला दिसतो: “माइया मुला, प्रभूच्या शिस्तीचा अनादर करू नको, आणि जेव्हा तो तुला ताळ्यावर आणतो, तेव्हा तू धीर सोडू नको
6. कारण ज्याच्यावर प्रभु करतो, त्यांना तो शिस्त लावतो आणि ज्यांना तो आपले पुत्र म्हणून स्वीकारतो, त्यांना तो शिक्षा करतो.” नीतिसूत्रे 3:11-12
7. हा कठीण समय आहे म्हणून शिस्त सहन कर. ते असे दर्शविते की, देव तुम्हांला मुलांसारखी वागणूक देत आहे; कारण असा कोणता मुलगा आहे ज्याला वडील शिस्त लावीत नाहीत?
8. जर तुम्हांला शिस्त लावलेली नाही तर जसा इतर सर्व मुलांचा अनुभव असतो तसे तुम्ही अनौरस मुले आहात आणि तुम्ही खरे पुत्र नाही.
9. याशिवाय आम्हा सर्वांना जगिक पिता असताना त्यांनी आम्हाला शिस्त लावली आणि त्याबद्दल आम्ही त्यांचा आदर राखला. तर मग आम्ही आमच्या आध्यात्मिक पित्याच्या किती तरी अधिक प्रमाणात अधीन होऊन जगले पाहिजे बरे?
10. आमच्या मानवी वडिलांनी त्यांच्या दृष्टीने अती उत्तम अशी शिस्त थोड्या काळासाठी लावली. पण देव आम्हाला आमच्या चांगल्यासाठी शिस्त लावतो, यासाठी की, त्याच्या पवित्रपणात आपणही वाटेकरी व्हावे.
11. शिक्षेने शिस्त लावण्याच्या वेळेस कोणतीही शिक्षा चांगली वाटत नाही, तर दु:खाची वाटते पण नंतर ज्या लोकांना शिस्तीचे धडे शिकायला मिळाले आहेत, त्यांना धर्मिकपणाच्या आणि शांतीच्या जीवनाची फळे चाखण्याची संधि मिळते.
12. म्हणून तुमचे गळून गेलेले हात उंच करा आणि तुमचे अशक्त गुडघे बळकट करा!
13. तुमच्या पावलांकरीता सरळ रस्ता तयार करा यासाठी की, लंगडे पाय निकामी होऊ नयेत, तर उलट ते बरे व्हावेत.
14. सर्व लोकांबरोबर शांतीने राहण्याचा प्रयत्न करा व पवित्र जीवन जगण्याचा प्रयत्न करा. कारण त्याशिवाय (पवित्रतेेशिवाय) कोणालाही प्रभूला पाहता येणार नाही.
15. कोणीही देवाची कृपा चुकवू नये, यासाठी तिकडे लक्ष द्या आणि इकडे लक्ष द्या की, कोणतेही कडूपणाचे मूळ वाहून त्यापासून समस्या निर्माण होऊ नये व इतर लोकांची मने कलुषित करू नये, म्हणून जपा.
16. कोणीही व्यभिचारी असू नये किंवा एका जेवणापायी आपला वडीलकीचा हक्क विकून टाकणाऱ्या एसावासारखे जगिक विचाराचे असू नये याकडे लक्ष द्या.
17. नंतर तुम्हाला माहीत आहे जेव्हा त्याला वारसहक्काने आशीर्वाद अपेक्षित होता, तेव्हा तो नाकारण्यात आला. जरी त्याने रडून आशीर्वाद मिळविण्याचा प्रयत्न केला. तरी आपल्या वडिलाचे मन तो बदलू शकला नाही.
18. ज्या पर्वताला हाताने स्पर्श करता येतो; जो अग्नीच्या ज्वालांनी पेटलेला आहे, जो अंधार, दु:ख व वादळ यांनी भरलेला आहे. अशा पर्वताकडे तुम्ही आला नाही. तर एका नविन ठिकाणी आला आहात.
19. कर्ण्याच्या आवाजाजवळ तुम्ही आला नाहीत किंवा शब्द उच्चारणाऱ्याच्या वाणी याजवळ तुम्ही आला नाही. असा आवाज ज्यानी ऐकला त्यानी अशी विनंती केली की, त्यांनी यापुढे आणखी वाणी ऐकवू नये.
20. कारण ते जी आज्ञा केली होती सहन करू शकले नाहीत. “जर एखाद्या प्राण्याने जरी पर्वताला स्पर्श केला तरी त्याला दगडमार करण्यात यावा.”
21. खरोखर ते दृश्य इतके भयंकर होते की, मोशे म्हणाला, “भीतीमुळे मी थरथर कांपत आहे.”
22. परंतु तुम्ही सीनाय पर्वताजवळ जिवंत देवाच्या नगराजवळ आणि स्वर्गीय यरुशलेम येथे आलेले आहात आणि तुम्ही आनंदाने जमा झालेल्या हजारो देवदूतांजवळ आलेले आहात.
23. आणि तुम्ही प्रथम जन्मलेल्या मुलांच्या मंडळीकडे, ज्यांची नावे स्वर्गात लिहिली आहेत अशांकडे आला आहात, आणि तुम्ही देव जो सर्वांचा न्यायाधीश आहे त्याच्याकडे आला आहात, आणि तुम्ही नीतिमान लोकांच्या आत्म्यांकडे जे पूर्ण आहेत त्यांच्याकडे आला आहात.
24. आणि तुम्ही जो नव्या कराराचा मध्यस्थ येशू त्याच्याकडे आला आहात, आणि तुम्ही शिंपडण्यात आलेल्या रक्ताकडे आलात की जे रक्त हाबेलाच्या रक्तापेक्षा अधिक चांगल्या गोष्टी सांगते.
25. जो बोलतो त्याचे ऐकण्यासाठी नकार देऊ नका. त्याविषयी खात्री असू द्या. ज्याने पृथ्वीवर त्यांना सावध राहण्याविषयी सांगताना त्याचे ऐकायचे नाही असे ज्यांनी ठरविले ते लोक जर सुटू शकले नाहीत तर मग जो स्वर्गातून सावध करतो, त्याच्याकडे दुर्लक्ष केले तर आम्हाला सुटकेसाठी कोणता मार्ग राहीला बरे?
26. त्यावेळेस त्याच्या आवाजाने भूमि हादरली पण आता त्याने असे अभिवचन दिले आहे की, “पुन्हा एकदा मी केवळ पृथ्वीच नव्हे तर आकाशही हादरवून टाकीन.”
27. “पुन्हा एकदा” हे शब्द हेच दर्शवितात की, ज्या गोष्टी उत्पन्र केलेल्या आहेत त्या काढून टाकण्यात येतील. ज्या गोष्टी हलविता येत नाहीत त्या तशाच राहतील.
28. म्हणून, आम्हाला अढळ असे राज्य देण्यात येत असताना आपण त्याविषयी कृतज्ञता बाळगू या, आणि आदराने व भयभीत होऊन देवाला मान्य होईल अशी त्याची उपासना करू. 29कारण आपला देव भस्म करणारा अग्नि आहे.

  Hebrews (12/13)