← Ezekiel (30/48) → |
1. | मला पुन्हा परमेश्वराचे शब्द ऐकू आले. तो म्हणाला, |
2. | “मानवपुत्रा, माझ्यावतीने बोल. ‘मी पुढील गोष्टी सांगतो’ असे सांग. “ओरडून सांग “तो भयंकर दिवस येत आहे.” |
3. | तो दिवस नजीक आहे. हो! परमेश्वराचा न्यायाचा दिवस जवळ आहे. तो ढगाळ दिवस असेल. ती राष्ट्रांची न्यायनिवाडा करण्याची वेळ असेल. |
4. | मिसरविरुद्ध तलवार उठेल. मिसरच्या पतनाच्या वेळी कुश देशातील लोकांचा भीतीने थरकाप उडेल. बाबेलचे सैन्य मिसरच्या लोकांना कैदी करुन नेईल. मिसरचा पाया उखडला जाईल. |
5. | “खूप लोकांनी मिसरबरोबर शांतता करार केला. पण ते सर्व म्हणजे कुशी पूटी लूदी, अरेबिया येथील लोक, मिश्र जाती, कूबी आणि इस्राएल लोक यांचा नाश होईल. |
6. | परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: “मिसरला मदत करणारे आपटतील, त्यांच्या सत्तेचा तोरा उतरेल. मिग्दोलपासून सवेनेपर्यंतचे मिसरचे लोक युद्धात मारले जातील.” परमेश्वर, माझा प्रभू, म्हणाला, |
7. | मिसर नाश झालेल्या देशांच्या मालिकेत जाऊन बसेल. मिसर त्या ओसाड देशांपैकी एक होईल. |
8. | मी मिसरमध्ये आग लावीन आणि मिसरच्या सर्व सहाय्यकांचा नाश करीन. मगच त्यांना कळेल की मी परमेश्वर आहे. |
9. | “त्याच वेळी, मी बाहेर दूत पाठवीन ते जहाजातून कूशला वाईट बातमी सांगण्यासाठी जातील. आता कूशला सुरक्षित वाटते. पण मिसरच्या शिक्षेच्या वेळी कूशमधील लोकांचा भीतीने थरकाप उडेल. ती वेळ येत आहे! |
10. | परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणतो की “मिसरच्या लोकांचा नाश करण्यासाठी मी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरचा उपयोग करीन. |
11. | सर्व राष्ट्रामध्ये, नबुखद्नेस्सर व त्याचे लोक भयंकर आहेत आणि मिसरचा नाश करण्यासाठी मी त्यांना आणीन. ते मिसरविरुद्ध तलवारी उपसतील. ती भूमी प्रेतांनी भरुन टाकतील. |
12. | मी नाईल नदीला कोरडी करीन आणि ती जागा दुष्टांना विकीन. मी, परमेश्वर, सांगतो की “परक्यांकरवी मी ती भूमी ओसाड करीन.” |
13. | परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: “मी मिसरमधील मूर्तींचा सुध्दा नाश करीन. मी नोफातील पुतळे त्यापासून दूर करीन. ह्यापुढे मिसरमध्ये कोणीही नेता नसेल. मी मिसरमध्ये भीतीचे साम्राज्य निर्माण करीन. |
14. | मी पथ्रोसला ओसाड करीन. सोअनास आग लावीन मी नोला शिक्षा करीन. |
15. | मिसरचा गड जो सीन त्यावर मी माझा संपूर्ण राग काढीन. मी नोच्या लोकांचा नाश करीन. |
16. | मी मिसरला आग लावीन. सीनला खूप वेदना होतील. सैनिक नो शहरात घुसतील आणि नोफाला रोज नव्या नव्या अडचणी येतील. |
17. | आवेन व पी बेसेथ येथील तरुण युद्धात मारले जातील आणि स्त्रियांना धरुन नेतील. |
18. | ज्या दिवशी मी मिसरचे नियंत्रण मोडीन, तो दिवस तहपन्हेसचा काळा दिवस असेल. मिसरच्या उन्मत्त सत्तेचा अंत होईल. मिसरला ढग झाकेल आणि त्याच्या मुलींना कैद करुन नेले जाईल. |
19. | अशा रीतीने, मी मिसरला शिक्षा केल्यावर, त्यांना मी परमेश्वर आहे, हे पटेल.” |
20. | परागंदा काळातील अकराव्या वर्षांच्यां पहिल्या महिन्याच्या (एप्रिलच्या) सातव्या दिवशी, मला परमेश्वराचा संदेश मिळाला. तो म्हणाला, |
21. | “मानवपुत्रा, मिसरच्या राजाचा फारोचा हात (सत्ता) मी मोडला आहे. त्याला कोणीही मलमपट्टी करणार नाही व औषधही लावणार नाही. तो बरा होणार नाही. त्यांच्या हाताला तलवार धरण्याची शक्ती येणार नाही.” |
22. | परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो, “मी मिसरचा राजा फारो याच्याविरुद्ध आहे. मी त्याचे दोन्ही हात एक चांगला असलेला व दुसरा मोडलेला, मोडीन. मी त्याला त्याच्या हातातून तलवार टाकायला भाग पाडीन. |
23. | मी मिसरच्या लोकांना राष्ट्रां-राष्ट्रांत विखरुन टाकीन. |
24. | मी बाबेलच्या राजाचे हात बळकट करीन. मी माझी तलवार त्याच्या हाती देईन. पण मी फारोचे हात तोडीन. मग तो मरणयातना भोगणाऱ्या माणसाप्रमाणे आक्रोश करील. |
25. | मी बाबेलच्या राजाचे हात बळकट करीन, पण फारोचे हात तोडून टाकीन. मग त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे. “मी माझी तलवार बाबेलच्या राजाला देईन. तो ती मिसरवर उपसेल. |
26. | मी मिसरी लोकांना इतर राष्ट्रांत विखरुन टाकेल म्हणजे त्यांना मीच परमेश्वर आहे हे कळेल.” |
← Ezekiel (30/48) → |