Exodus (16/40)  

1. मग इस्राएल लोक प्रवास करीत एलीम या ठिकाणाहून निघाले व मिसरमधून निघाल्यानंतर दुसऱ्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी एलीम व सीनाय यांच्या दरम्यान असलेल्या सीनायच्या रानात आले.
2. लोक पुन्हा, रानात मोशे व अहरोन यांच्याकडे कुरकुर करु लागले;
3. ते म्हणाले, “परमेश्वराने आम्हाला मिसरमध्येच मारून टाकले असते तर बरे झाले असते कारण तेथे आम्हास खावयास लागणारे सर्व प्रकारचे अन्न भरपूर होते; परंतु तुम्ही आम्हांस येथे रानात आणले आहे; येथे आम्ही सर्वजण भुकेने तडफडून मरून जाऊ.”
4. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुम्हाला खाण्याकरिता मी आकाशातून अन्न पडावे असे करीन; दर दिवशी लोकांनी आपल्याला त्या दिवसाला पुरेल एवढे अन्न बाहेर जाऊन गोळा करावे. मी सांगतो त्याप्रमाणे लोक करतात की नाही हे पाहण्यासाठी मी हे करीन.
5. दरदिवशी लोकांनी एक दिवस पुरेल एवढेच अन्न गोळा करावे, परंतु शुक्रवारी जेव्हा ते जेवण तयार करतील तेव्हा मात्र ते जेवण दोन दिवस पुरेल इतके करावे.”
6. म्हणून मोशे व अहरोन लोकांना म्हणाले, “आज रात्री तुम्ही परमेश्वराचे सामर्थ्य पाहाल; तेव्हा मिसरमधून तुम्हाला वाचविणारा परमेश्वर हाच आहे हे तुम्हाला कळेल.
7. उद्या सकाळी तुम्ही परमेश्वराचे तेज पाहाल; तुम्ही परमेश्वराकडे तक्रार केली आणि त्याने ती ऐकली; आणि तुम्ही उगीच आम्हाकडे पुन्हा पुन्हा तक्रार करीत आला आहात. आता आपण जरा आराम करु या.”
8. आणि मोशे म्हणाला, “तुम्ही एक सारखी तक्रार करीत आहात; परमेश्वराने तर तुमची तक्रार ऐकली आहे; तेव्हा आज रात्री परमेश्वर तुम्हाला मांस देणार आहे; आणि दर दिवशी सकाळी तुम्हाला पाहिजे तेवढ्या भाकरी मिळतील; तुम्ही अहरोनाकडे व मजकडे तक्रार करीत आहात तुम्ही माझ्या किंवा अहरोनाच्याविरुद्ध कुरकुर करीत नाही तर परमेश्वराविरुद्ध तक्रार करीत आहात हे लक्षात घ्या.”
9. मग मोशे अहरोनाला म्हणाला, “तू इस्राएल लोकांशी बोल; त्यांना सांग, ‘तुम्ही परमेश्वराकडे एकत्र या कारण त्याने तुमच्या तक्रारी ऐकल्या आहेत.”
10. मग अहरोन सर्व इस्राएल लोकांशी बोलला. ते सर्वजण एके ठिकाणी जमले होते; अहरोन बोलत असताना सर्व लोकांनी वळून रानाकडे पाहिले; आणि त्यांना एका ढगात परमेश्वराचे तेज दिसले.
11. परमेश्वर मोशेला म्हणाला,
12. “मी इस्राएल लोकांच्या तक्रारी ऐकल्या आहेत तेव्हा त्यांना सांग, ‘रात्री तुम्ही मांस खाल आणि दररोज सकाळी तुम्हाला पाहिजे तितक्या भाकरी खाल; मग परमेश्वर मी तुमचा देव आहे हे तुम्हाला समजेल.”‘
13. त्या संध्याकाळच्या वेळी, रात्र पडण्याच्या सुमारास तेथे लावे पक्षी आले व छावणीभर ते पसरले (आणि त्यांना खाण्याकरिता इस्राएल लोकांनी ते पकडले) आणि सकाळी छावणीच्या सभोंवती जमिनीवर दंव पडले.
14. सूर्य उगवल्यावर दंव विरून गेले परंतु त्या नंतर जमिनीवर खवल्यासारखे हिमकणा एवढे कण दिसले.
15. ते पाहून इस्राएल लोकांनी एकमेकांना विचारले, “ते काय आहे?” त्यांनी असे विचारले कारण ते काय आहे हे त्यांना माहीत नव्हते. तेव्हा मोशेने त्यांना सांगितले, “परमेश्वर हे अन्न तुम्हाला खाण्याकरिता देत आहे.
16. परमेश्वर म्हणतो, “आपल्याला जेवढ्या अन्नाची गरज आहे तेवढे प्रत्येक जणाने घ्यावे; तुम्हापैकी प्रत्येकाने तुमच्या कुटूंबातील लोकांकरिता दर माणशी आठवाट्या म्हणजे एक ओमर गोळा करावे.”‘
17. तेव्हा इस्राएल लोकांनी तसे केले, म्हणजे प्रत्येकाने हे अन्न गोळा करून घेतले.
18. लोकांनी ते आपल्या कुटुंबातील प्रत्येकास दिले; ते मोजल्यानंतर प्रत्येकासाठी पुरेसे भरले; परंतु कमी अधिक गोळा केले असले तरी ते कधीही कमी किंवा जास्त नव्हते कारण प्रत्येक जण आपल्या स्वत:साठी व आपल्या घरातील सर्व माणसास पुरेल एवढे गोळा करी.
19. मोशेने लोकांना सांगितले, “दुसऱ्या दिवसासाठी ते अन्न ठेवू नका.”
20. परंतु लोकांनी मोशेचे ऐकले नाही, काही लोकांनी त्या अन्नातून काही बाकी ठेवले आणि त्या ठेवलेल्या अन्नात किडे पडले व त्याची घाण येऊ लागली. तेव्हा असे करणाऱ्यावर मोशे फार रागावला.
21. दर दिवशी ते लोक आपल्याला पुरेसे अन्न गोळा करीत परंतु दुपारी सूर्याच्या उष्णतेमुळे ते अन्न वितळून जाई व नाहीसे होई.
22. शुक्रवारी लोकांनी दुप्पट अन्न म्हणजे दर माणशी सोळा वाट्या किंवा दोन ओमर अन्न गोळा केले. तेव्हा सर्व पुढारी लोक मोशेकडे आले व त्यांनी हे त्याला कळविले.
23. मोशेने त्यांना सांगितले, “हे असे होईल असे परमेश्वराने सांगितले होते; हे असे झाले कारण उद्या शब्बाथ दिवस आज तुम्हाला लागणारे सर्व अन्न शिजवून तयार ठेवावे परंतु उरलेले दुसऱ्या दिवशी सकाळसाठी ठेवावे.”
24. म्हणून लोकांनी उरलेले अन्न दुसऱ्या दिवसाकरिता ठेवले आणि त्यातील थोडे ही वाईट झाले नाही किंवा त्यात कोठेही किडे पडले नाहीत.
25. शनिवारी मोशेने लोकांना सांगितले, “आज शब्बाथ दिवस म्हणजे विसावा घेण्याचा आणि परमेश्वराची उपकार स्तुती करण्याचा विशेष दिवस आहे; तेव्हा तुम्हापैकी कोणीही बाहेर जाऊ नये तर तुम्ही काल गोळा केलेल्या अन्नातून जेवण खावे.
26. तुम्ही सहा दिवस अन्न गोळा करावे परंतु आठवड्याचा सातवा दिवस हा विसाव्याचा दिवस आहे; या दिवशी अन्न मिळणार नाही.”
27. शनिवारी काही लोक अन्न गोळा करावयास बाहेर गेले परंतु त्यांना काहीच मिळाले नाही.
28. नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “माझ्या आज्ञा व माझे नियम पाळावयास तुम्ही कोठवर नाकारणार?
29. पाहा तुम्ही विसावा घ्यावा यासाठी परमेश्वराने शब्बाथ दिवस बनविला आहे; म्हणून शुक्रवारी परमेश्वर तुम्हाला दोन दिवस पुरेल एवढे अन्न देतो, तेव्हा शब्बाथ दिवशी तुम्ही आहात तेथे बसून विसावा घ्यावा.”
30. म्हणून मग लोक शब्बाथ दिवशी विसावा घेऊ लागले.
31. लोक त्या विशेष अन्नला “मान्ना” म्हणू लागले; ते धण्यासारखे पांढऱ्या रंगाचे होते त्याची चव मध घालून केलेल्या सपाट पोळी सारखी होती.
32. मोशे म्हणाला, “परमेश्वराने सांगितले, ‘या अन्नातील आठवाट्या म्हणजे एक ओमर इतके किंवा एका एफाचा दहावा भाग इतके अन्न तुमच्या पुढील पिढ्यांसाठी राखून ठेवा म्हणजे मग तुम्हाला मिसर देशातून काढून नेल्यावर मी तुम्हाला रानात कसे अन्न दिले हे त्यांना समजेल.”‘
33. तेव्हा मोशेने अहरोनाला सांगितले, “एक मोठ्या तोंडाचे खोल भांडे घे आणि त्यात आठवाट्या म्हणजे एक ओमर मान्ना घाल. तो परमेश्वरापुढे सादर करण्यासाठी देव तो आपल्या पुढील पिढ्यांसाठी राखून ठेव.”
34. मग अहरोनाने, परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञे प्रमाणे केले. अहरोनाने परमेश्वराच्या आज्ञापटा पुढे मान्ना भरलेले ते भांडे ठेवले.
35. इस्राएल लोक तो मान्ना चाळीस वर्षे म्हणजे वस्ती असलेल्या देशाला पोहोंचेपर्यंत म्हणजे कनान देशाच्या सरहद्दीला पोहोंचेपर्यंत, खात होते.
36. एक ओमर मान्ना म्हणजे त्यांचा मोजमापाप्रमाणे सुमारे आठवाट्या किंवा “एका एफाचा दहावाभाग” होता.

  Exodus (16/40)