Ephesians (2/6)  

1. पूर्वी तुम्ही आपले अपराध आणि पातके यांमुळे आध्यात्मिक रीतीने मेला होता.
2. ज्यामध्ये तुम्ही पूर्वी जगत होता, जगातील दुष्ट मार्गाचे अनुकरण करीत होता, आणि आपल्याला न दिसणारे आध्यात्मिक सामर्थ्य ज्याच्याकडे आहे त्या सताधीशाचे अनुकरण करीत होता. जे देवाच्या आज्ञा पाळीत नाहीत त्यांच्या जीवनामध्ये हाच आत्मा कार्य करीत आहे.
3. एके काळी आम्हीसुद्धा त्यांच्यामध्ये आमच्या मानवी देहाच्या दुष्ट इच्छांचे समाधान करीत होतो आणि आमच्या मानवी मनाच्या दुष्ट वासनांची पूर्तंता करीत होतो. तसेच जगातील इतरांप्रमाणेच आम्ही त्याच्या क्रोधाची मुले झालो होतो.
4. पण देव खूप दयाळू आहे. त्याच्या महान प्रीतिने त्याने आमच्यावर प्रेम केले.
5. आम्ही आध्यात्मिकदृष्ट्या आमच्या पापांमध्ये मेलेले असतानाच त्याने आम्हांला ख्रिस्ताबरोबर जीवन दिले. (तुमचे तारण देवाच्या कृपने झाले आहे.)
6. देवाने आम्हांला ख्रिस्ताबरोबर नविन जीवनात उठविले आणि स्वर्गाच्या राज्यात त्याच्याबरोबर त्याच्या आसनावर बसविले, कारण आम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहोत.
7. देवाने हे केले यासाठी की, येणाऱ्या युगात त्याच्या अतुलनीय कृपेची संपत्ती दाखविता यावी आणि ख्रिस्त येशूमध्ये आम्हांविषयीची ममता व्यक्त करावी.
8. कारण देवाच्या कृपेने विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले आणि ते तुमच्याकडून झाले नही, तर ते देवापासूनचे दान असे आहे.
9. आणि एखादा काही काम करतो त्याचा परिणाम म्हणून नव्हे. यासाठी कोणी बढाई मारु नये.
10. कारण आम्ही देवाच्या हाताने घडविलेले आहोत. ख्रिस्तामध्ये आम्हांला चांगल्या कामासाठी निर्माण केले, जे देवाने अगोदरच तयार केले होते. यासाठी की, त्यामध्ये चालणे आम्हांला शक्य व्हावे.
11. म्हणून, आठवा की एके काळी, तुम्ही यहूदीतर म्हणून जन्मला होता आणि त्यांना (विदेश्यांना) सुंता न झालेले असे, ज्यांची सुंता झालेली होती ते यहूदी लोक म्हणत होते.
12. आठवा की, त्यावेळी तुम्ही ख्रिस्तविरहित, देवाचे लोक जे इस्राएल त्या समाजातून तुम्हाला बहिष्कृत केले होते, आणि देवाच्या अभिवचनाशी निगडित अशा कराराशी तुम्ही परके असे होता, तुम्ही या जगात आशेशिवाय आणि देवाशिवाय जगला.
13. पण आता, ख्रिस्तामध्ये जे तुम्ही एके काळी देवापासून दूर होता, ते तुम्ही ख्रिस्ताच्या रक्ताने त्याच्याजवळ आणलेले आहात.
14. कारण त्याच्याद्वारे आम्हांला शांतीचा लाभ झाला आहे. त्याने दोन्ही गोष्टी एक केल्या आणि आपल्या शरीराने त्याने वैराचा, दुभागणाऱ्या भिंतीचा अडथळा पाडून टाकला.
15. त्याने नियमशास्त्र त्याच्या नीतिनियमांसहित रद्द केले. यासाठी की स्वत:मध्ये दोघांचा एक मानव निर्माण करुन शांति करणे त्याला शक्य व्हावे.
16. आणि त्याच्या वधस्तंभावरील मरणाद्वारे देवाबरोबर एका शरीरात त्या दोघांमध्ये समेट घडवून आणता यावा, ज्यामुळे या दोन गोष्टीतील वैमनस्य संपवता येईल.
17. म्हणून तो आला आणि त्याने जे तुम्ही देवापासून दूर होता व जे तुम्ही देवाजवळ होता त्या तुम्हाला शांतीची सुवार्ता सांगितली,
18. कारण त्याच्या द्वारे, आम्हा दोघांचा एका आत्म्याच्या द्वारे देवाजवळ प्रवेश होतो.
19. यामुळे, तुम्ही आता परके आणि यहूदीतर नाहीत. तर तुम्ही देवाच्या लोकांबरोबरचे सहनागरिक आणि देवाचे कुटुंबीय आहात.
20. तुम्ही प्रेषित आणि संदेष्टे या पायावर बांधलेली इमारत आहा, आणि ख्रिस्त येशू स्वत: तिचा कोनशिला आहे.
21. संपूर्ण इमारात त्याच्याद्वारे जोडली गेली आणि प्रभुमध्ये एक पवित्र मंदिर होण्यासाठी वाढत आहे.
22. त्याच्यामध्ये तुम्हीही इतरांबरोबर आत्म्याच्या द्वारे देवाचे राहण्याचे ठिकाण तयार करण्यासाठी एकत्र रचले जात आहात.

  Ephesians (2/6)