← Ecclesiastes (8/12) → |
1. | शहाणा माणूस ज्या प्रमाणे गोष्टी समजू शकतो आणि गोष्टींचे निराकरण करू शकतो त्याप्रमाणे इतर कोणीही करू शकत नाही. त्याचे शहाणपण त्याला आनंदी बनवते. त्यामुळे दु:खी चेहरा आनंदी होतो. |
2. | तुम्ही नेहमी राजाची आज्ञा पाळली पाहिजे असे मी म्हणतो. तुम्ही हे करा कारण देवाला तुम्ही तसे वचन दिले. आहे. |
3. | राजाला काही गोष्टी सुचवताना भीती बाळगू नका आणि चुकीच्या गोष्टी करायला मदतही करू नका. पण राजा त्याला (स्वत:ला) आनंद देणाऱ्याच आज्ञा देतो हे लक्षात ठेवा. |
4. | राजाला आज्ञा करण्याचा अधिकार आहे. आणि काय करायचे हे त्याला कोणीही सांगू शकत नाही. |
5. | जो माणूस राजाच्या आज्ञा पाळतो तो माणूस सुरक्षित राहातो. शहाण्या माणसाला हे करायची योग्य वेळ माहीत असते आणि योग्य गोष्टी केव्हा करायच्या हे ही त्याला माहीत असतात. |
6. | माणसाकडे सगळचा गोष्टी करण्यासाठी योग्य वेळ आणि योग्य मार्ग असतो. आणि प्रत्येकाने संधीनुसार काय करायचे ते ठरवायचे असते. तो अनेक संकटांत असला तरी त्याने या गोष्टी केल्या पाहिजेत. |
7. | कारण काय घडेल या बद्दल त्याला खात्री नसते. का? कारण भविष्यात काय होईल ते त्याला कुणीही सांगू शकत नाही. |
8. | आपल्या आत्म्याला सोडून जाण्यापासून परावृत्त करण्याची शक्ती कोणाकडेही नसते. स्वत:चे मरण थांबवणे हे कोणाच्याही हाती नसते. युध्दात वाटेल तिथे जाण्याचे स्वातंत्र्य सैनिकाला नसते. त्याप्रमाणे जर एखाद्याने दुष्कृत्य केले तर ते कृत्य त्याची पाठ सोडणार नाही. |
9. | मी या सगळचा गोष्टी पाहिल्या. या जगात घडणाऱ्या गोष्टी विषयी मी खूप विचार केला. लोक नेहमी दुसऱ्यांवर राज्य करण्यासाठी सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न करतात आणि हे त्यांच्यासाठी वाईट आहे. |
10. | दुष्ट माणसांची भव्य आणि सुंदर प्रेतयात्रा मी पाहिली. प्रेतयात्रेहून परत जाताना लोक मेलेल्या दुष्टांबद्दल चांगले बोलत होते. ज्या शहरात दुष्टांनी खूप वाईट गोष्टी केल्या त्याच शहरात हे घडेले. हे फारच अविचारी आहे. |
11. | लोकांना त्यांनी केलेल्या वाईट गोष्टींबद्दल कधीच ताबडतोब शिक्षा केली जात नाही. त्यांना शिक्षा देण्यास विलंब लागतो आणि त्यामुळे इतरांनाही वाईट गोष्टी करण्याची इच्छा होते. |
12. | पापी शंभर दुष्कृत्य करेल आणि तरी ही त्याला भरपूर आयुष्य मिळेल. असे असले तरी देवाची आज्ञा पाळणे आणि त्याला मान देणे हे अधिक चांगले असते. |
13. | दुष्ट लोक देवाला मान देत नाहीत म्हणून त्यांना खरोखरच चांगल्या गोष्टी मिळणार नाहीत. त्या दुष्टांना भरपूर आयुष्य लाभणार नाही. त्यांचे आयुष्य सूर्य अस्ताला जाताना लांब लांब होणाऱ्या सावल्यांसारखे नसेल. |
14. | पृथ्वीवर घडणारी आणखी एक गोष्ट अशी आहे जी योग्य वाटत नाही. वाईट गोष्टी वाईट माणसांच्या बाबतीत घडाव्या आणि चांगल्या गोष्टी चांगल्या माणसांच्या बाबतीत. पण कधी कधी चांगल्या माणसांचे वाईट होते आणि वाईट माणसांचे चांगले हे योग्य नाही. |
15. | म्हणून मी विचार केला की आयुष्य आनंदात घालवणे हे अधिक महत्वाचे आहे. का? कारण आयुष्यात करायची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे खाणे, पिणे आणि मजा करणे. त्यामुळे देवाने लोकांना पृथ्वीवरील त्यांच्या आयुष्यात करण्यासाठी जे काम दिले आहे ते आनंदाने करायला त्यांना थोडी मदत होईल. |
16. | लोक या आयुष्यात जे करतात त्याचा मी नीट अभ्यास केला. लोक किती व्यग्र होते ते मी पाहिले. ते रात्रंदिवस काम करतात. ते जवळ जवळ कधीच झोपत नाहीत. |
17. | देव ज्या असंख्य गोष्टी करतो त्याही मी पाहिल्या आणि देव पृथ्वीवर ज्या गोष्टी करतो त्या लोकांना कळणे शक्य नसते. एखादा माणूस ते समजून धेण्याचा प्रयत्न करील पण त्याला ते अशक्य आहे. एखाद्या विद्धान माणसाने जरी असे म्हटले की त्याला देवाचे काम समजते. तरी ते खरे नसते. त्या सर्व गोष्टी कळणे कोणालाही शक्य नाही. |
← Ecclesiastes (8/12) → |