Deuteronomy (8/34)  

1. “आज मी दिलेल्या सर्व आज्ञांचे पालन करा. कारण त्याने तुम्ही जगाल, आणि वाढून एक महान राष्ट्र बनाल. तुमच्या राष्ट्राची भरभराट होईल. तुमच्या पूर्वजांना परमेश्वराने कबूल केलेला प्रदेश तुम्ही ताब्यात घ्याल.
2. तसेच गेली चाळीस वर्षे आपल्या परमेश्वर देवाने तुम्हाला रानावनातून कसे चालवले, त्या प्रवासाची आठवण ठेवा. परमेश्वर तुमची परीक्षा पाहात होता. तुम्हाला नम्र करावे, तुमच्या अंत:करणातील गोष्टी जाणून घ्याव्या, तुम्ही त्याच्या आज्ञा पाळता की नाही ते बघावे म्हणून त्याने हे केले.
3. परमेश्वराने तुम्हाला लीन केले, तुमची उपासमार होऊ दिली आणि मग, तुम्ही अन् तुमचे पूर्वज यांना माहीत नसलेला मान्ना तुम्हाला खाऊ घातला. माणूस फक्त भाकरीवर जगत नाही तर परमेश्वराच्या मुखातील वचनाने जगतो हे तुम्हाला कळावे म्हणून त्याने हे सर्व केले.
4. गेल्या चाळीस वर्षात तुमचे कपडे झिजले-फाटले नाहीत की तुमचे पाय सुजले नाहीत. का बरे? कारण परमेश्वराने तुमचे रक्षण केले.
5. तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्यासाठी ह्या सर्व गोष्टी केल्या आहेत ह्याची आठवण तुम्ही ठेवलीच पाहिजे. बाप आपल्या मुलाला शिकवतो, त्याच्यावर संस्कार करतो तसा तुमचा देव परमेश्वर तुम्हाला आहे.
6. “तुमचा देव परमेश्वर ह्याच्या आज्ञा पाळा, त्याला अनुसरा आणि त्याच्याबद्दल आदर बाळगा.
7. तुमचा देव परमेश्वर तुम्हाला उत्तम देशात घेऊन जात आहे. ती भूमी सुजला, सुफला आहे. तेथे डोंगरात उगम पावून जमिनीवर वाहणारे नद्यानाले आहेत.
8. ही जमीन गहू, जव, द्राक्षमळे, अंजीर, डाळिंब यांनी समृद्ध आहे. येथे जैतून तेल, मध यांची रेलचेल आहे.
9. येथे मुबलक धान्य आहे. कोणत्याही गोष्टीची तुम्हाला उणीव नाही. येथील दगड लोहयुक्त आहोत. तुम्हाला डोंगरातील तांबे खणून काढता येईल.
10. तेव्हा तुम्ही खाऊन तृप्त व्हावे आणि असा चांगला प्रदेश दिल्याबद्दल तुमचा देव परमेश्वर ह्याचे गुणगान गावे.
11. “सावध असा! तुमचा देव परमेश्वर याचा विसर पडू देऊ नका! मी दिलेल्या आज्ञा नियम, विधी, यांचे कटाक्षाने पालन करा.
12. त्यामुळे तुम्हाला अन्न धान्याची कमतरता पडणार नाही. चांगली घरे बांधून त्यात राहाल.
13. तुमची गायीगुरे आणि शेळ्या मेंढ्या यांची संख्या वाढेल. सोनेरुपे आणि मालमत्ता वाढेल.
14. या भरभराटीने उन्मत्त होऊ नका. आपला देव परमेश्वराला विसरु नका. मिसरमध्ये तुम्ही गुलाम होता. परंतु मिसरमधून परमेश्वराने तुमची सुटका केली व बाहेर आणले.
15. विषारी नाग आणि विंचू असलेल्या निर्जल, रखखीत अशा भयंकर रानातून त्याने तुम्हाला आणले. त्याने तुमच्यासाठी खडकातून पाणी काढले.
16. तुमच्या पूर्वजांनी कधीही न पाहिलेला मान्ना तुम्हाला खायला घालून पोषण केले. परमेश्वराने तुमची परीक्षा पाहिली. शेवटी तुमचे भले व्हावे म्हणून परमेश्वराने तुम्हांला नम्र केले.
17. हे धन मी माझ्याट बळावर आणि कुवतीवर मिळवले असे चुकूनसुद्धा मनात आणू नका.’
18. तुमचा देव परमेश्वर याचे स्मरण ठेवा. त्यानेच तुम्हाला हे सामर्थ्य दिले हे लक्षात ठेवा. त्याने तरी हे का केले? कारण आजच्याप्रमाणेच त्याने तुमच्या पूर्वजांशी पवित्रकरार केला होता, तोच तो पाळत आहे.
19. “तेव्हा आपला देव परमेश्वर ह्याला विसरु नका. इतर दैवतांना अनुसरु नका. त्यांची पूजी किंवा सेवा करु नका. तसे केलेत तर तुमचा नाश ठरलेलाच ही ताकीद मी आत्ताच तुम्हाला देऊन ठेवतो.
20. त्याचे म्हणणे तुम्ही ऐकले नाही तर तुमच्या देखत इतर राष्ट्रांचा नाश परमेश्वराने केला तसाच तो तुमचाही करील!

  Deuteronomy (8/34)