Deuteronomy (13/34)  

1. “स्वप्नांचे अर्थ सांगणारा एखादा भोंदू संदेष्टा तुमच्याकडे एखाद्या वेळी येईल. आपण काही चिन्ह, किंवा चमत्कार दाखवतो असे तो म्हणेल.
2. कदाचित् त्या चिन्हाचा तुम्हाला पडताळा येईल किंवा चमत्कार खराही ठरेल. मग तो, तुम्हाला अपरिचित अशा इतर दैवतांची सेवा करायला सुचवेल.
3. पण त्याचे ऐकू नका. कारण तुमचा देव परमेश्वर तुमची परीक्षा पाहात असेल. हे लोक आपल्यावर मनापासून प्रेम करतात की नाही हे परमेश्वराला पाहायचे असेल.
4. तेव्हा तुम्ही आपल्या परमेश्वर देवालाच अनुसरा. त्याच्याविषयी आदर बाळगा. त्याच्या आज्ञा पाळा. आणि त्याने सांगितलेले ऐका. त्याची सेवा करा. त्याचा त्याग करु नका.
5. तसेच त्या संदेष्ट्याला किंवा स्वप्न सांगणाऱ्याला ठार मारा. कारण तो तुम्हाला तुमच्या परमेश्वर देवापासून विचलीत करतो आहे. तुम्ही मिसर देशात गुलाम होतात तेव्हा आपल्या परमेश्वरानेच तुम्हाला तेथून सोडवले आहे. परमेश्वर देवाने आज्ञा देऊन नेमून दिलेल्या जीवनमार्गापासून हा माणूस तुम्हाला दूर नेतो म्हणून आपल्यामधून तुम्ही त्याचे निर्मूलन करा.
6. “तुमच्या निकटची एखादी व्यक्ती हळूच तुम्हांला दुसऱ्या दैवताच्या भजनी लावायचा प्रयत्न करील. ही व्यक्ति म्हणजे तुमचा सख्खा भाऊ, मुलगा, मुलगी, प्रिय पत्नी, किंवा जिवलग मित्रही असू शकतो. तो म्हणेल, ‘चल आपण या दुसऱ्या दैवताची पूजा करु.’ (तुझ्या किंवा तुझ्या पूर्वजांच्या ऐकिवातही नसलेले हे दैवत असेल
7. तुमच्या भोवताली जवळपास किंवा लांब राहणारे जे लोक आहेत त्यांचे हे दैवत होत.)
8. त्या व्यक्तीच्या म्हणण्याला मान्यता देऊ नका. त्याचे ऐकू नका. त्याची कणव येऊ देऊ नका. त्याला मोकळा सोडू नका. तसेच त्याला संरक्षण देऊ नका.
11. ही गोष्ट सर्व इस्राएलांच्या कानावर गेली की ते ही धास्ती घेतील, आणि अशी दुष्कृत्ये करायला धजावणार नाहीत.
12. “तुम्हाला राहाण्याकरता तुमचा देव परमेश्वर नगरे देईल. त्यापैकी एखाद्या नगरातून तुमच्या कानावर वाईट बातमी येईल. ती अशी की
13. तुमच्यापैकीच काही नीच माणसे आपल्यापैकी काही जणांना कुमार्गाला लावत आहेत. ‘आपण अन्य दैवतांची सेवा करु या’ असं म्हणून ते इतरांना बहकवत आहेत. (ही दैवते तुम्हाला अपारिचित असतील.)
14. असे काही कानावर आल्यास ते खरे आहे की नाही याचा आधी पूर्ण शहानिशा करुन घ्या. ते खरे निघाले, असे काही भयंकर घडल्याचे सिद्ध झाले
15. तर त्या नगरातील लोकांना त्याचे शासन द्या. त्या सर्वांचा वध करा. त्यांच्या जनावरांनाही शिल्लक ठेवू नका. ते शहर पूर्णपणे उध्वस्त करा.
16. मग तेथील सर्व मौल्यवान वस्तू गोळा करुन शहराच्या मध्यभागी आणा. आणि त्याचबरोबर सर्व शहर बेचिराख करुन टाका. तो आपल्या परमेश्वराचा होमार्पण असेल. ते शहर पुन्हा कधी ही वसवता कामा नये.
17. ते नगर नाश करायला परमेश्वराच्या हवाली केले जावे म्हणून त्यातील कोणतीही वस्तू स्वत:साठी ठेवून घेऊ नका. ही आज्ञा ऐकलीत तर परमेश्वराचा तुमच्यावरचा क्रोध ओसरेल. त्याला तुमची दया येईल तुमच्याबद्दल प्रेम वाटेल तुमच्या पूर्वजांना त्याने कबूल केल्याप्रमाणे त्याच्याकृपेने तुमच्या देशाची भरभराट होईल. नगरे उध्वस्त करण्याविषयी
18. तुमचा देव परमेश्वर याचे ऐकलेत, त्याच्या आज्ञा पाळल्यात तरच हे घडेल. तेव्हा तुमचा देव परमेश्वर याच्या दृष्टीने जे योग्य तेच तुम्ही करा.

  Deuteronomy (13/34)