Amos (7/9)  

1. परमेश्वराने मला पुढील गोष्टी दाखविल्या: दुसरे पीक वाढण्यास सुरुवात व्हायच्या वेळेलाच. तो टोळ तयार करीत होता. पहिल्या पिकाची राजाची कापणी झाल्यानंतरचे हे दुसरे पीक होते.
2. टोळांनी देशातील सर्व गवत खाल्ले. त्यानंतर मी म्हणालो, “परमेश्वरा, माझ्या प्रभू, मी विनवणी करतो, आम्हाला क्षमा कर. याकोब जगू शकणार नाही तो फारच दुबळा आहे.”
3. मग ह्याबाबतीत परमेश्वराचे मन:परिवर्तन झाले परमेश्वर म्हणाला, “ते घडणार नाही.”
4. परमेश्वराने, माझ्या प्रभूने, मला पुढील गोष्टी दाखविल्या मी पाहिले की परमेश्वर देवाने अग्नीला न्याय देण्यास बोलाविले. अग्नीने मोठा डोह नष्ट केला व त्याने भूमी गिळण्यास सुरवात केली.
5. पण मी म्हणालो, “हे परमेश्वर देवा, थांब, मी तुझी करूणा भाकतो याकोब जगू शकणार नाही तो खूपच लहान आहे.”
6. मग परमेश्वराचे ह्या गोष्टीबाबत ह्रदयपरिवर्तन झाले. परमेश्वर प्रभू म्हणाला, “हीही घटना घडणार नाही.”
7. परमेश्वराने मला पुढील गोष्टी दाखविल्या. परमेश्वर, त्याच्या हातात ओळंबा घेऊन एका भिंतीजवळ उभा होता (भिंत ओळंब्याने सरळ केलेली होती.)
8. परमेश्वर मला म्हणाला, “आमोस, तुला काय दिसते?” मग माझा प्रभू म्हणाला, “पाहा, माझ्या माणसांमध्ये, इस्राएलमध्ये मी ओळंबा धरीन. मी त्यांच्या दृष्टपणाकडे दुर्लक्ष होऊ देणार नाही. मी वाईट डाग काढून टाकीन.
9. इसहाकच्या उच्च स्थानाचा नाश होईल. इस्राएलची पवित्र स्थाने धुळीला मिळतील. मी यराबाम घराण्यावर हल्ला करीन आणि त्यांना तलवारीने ठार मारीन.”
10. बेथेल येथील एक याजक अमस्या ह्याने, “इस्राएलचा राजा यराबाम ह्याला पुढील निरोप पाठविला. आमोस तुझ्याविरुध्द उठाव करावा म्हणून प्रयत्न करीत आहे. तो इतका बोलतोय की हा देश त्याचे सर्व शब्द मानू शकत नाही.
11. आमोस म्हणाला असे आहे, यराबाम तलवारीच्या वाराने मरेल, आणि इस्राएलच्या लोकांना त्यांच्या देशातून कैदी म्हणून बाहेर नेले जाईल.”
12. अमास्या आमोसला असेही म्हणाला, “अरे द्रष्ट्या, खाली यहूदात जा आणि तेथे जेव! तेथेच दे तुझे प्रवचन.
13. पण यापुढे बेथेलमध्ये संदेश देऊ करू नकोस. ही यराबामची पवित्र जागा आहे, हे इस्राएलचे मंदिर आहे.”
14. मग आमोस अमास्याला म्हणाला, “मी धंदेवाईक संदेष्टा नाही. मी संदेष्ट्यांच्या घराण्यातीलही नाही. मी गुरे राखत होतो. आणि उंबरांच्या झाडांची निगा राखत होतो.
15. मी मेंढपाळ होतो मेंढ्यांच्या मागे जात असतानाच परमेश्वराने माझा स्वीकार केला. परमेश्वर मला म्हणाला, ‘जा’ माझ्या लोकांना, इस्राएलला, संदेश सांग.’
16. म्हणून परमेश्वराचा संदेश ऐका ‘इस्राएलविरुध्द संदेश सांगू नकोस, इसहाकच्या घराण्याविरुध्द प्रवचन देऊ नकोस’ असे तू मला सांगतोस.
17. पण परमेश्वर म्हणतो, ‘तुझी बायको गावची वेश्या होईल. तुझी मुलेमुली तलवारीने मरतील. दुसरे लोक तुमची भूमी घेऊन तिची आपापसात वाटणी करतील. तू परदेशात मरशील इस्राएलच्या लोकांना निश्चितच त्यांच्या देशातून कैदी म्हणून नेले जाईल.”‘

  Amos (7/9)