Acts (10/28)  

1. कर्नेल्य नावाचा मनुष्य कैसरीयामध्ये राहत होता. तो इटलीक नावाच्या पलटणीन शताधिपती होता.
2. कर्नेल्य हा धर्मशील असून आपल्या कुटुंबासह देवाचे भय बाळगणारा होता. तो गोरगरिबांना पुष्कळसा दानधर्म करीत असे आणि तो नेहमी देवाची प्रार्थना करीत असे.
3. एके दिवशी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास, कर्नेल्याला दृष्टान्त झाला. त्याने तो स्पष्टपणे पाहिला. त्या दृष्टान्तात देवाचा एक दूत त्याच्याकडे आला आणि त्याला म्हणाला, “कर्नेल्या!”
4. कर्नेल्य देवदूताकडे पाहू लागला. तो भयभीत झाला होता. “काय आहे, प्रभु?” देवदूत कर्नेल्याला म्हणाला, “देवाने तुझी प्रार्थना ऐकली आहे, ज्या गोष्टी तू गरीबांना दिल्या आहेत, त्या देवाने पाहिल्या आहेत. देवाला तुझी आठनण आहे.
5. तू यापो गावी माणसे पाठीव आणि शिमोन नावाच्या माणसाला घेऊन ये, शिमोनाला पेत्र असे सुद्धा म्हणततात; तो
6. शिमोन नावाच्या चाभाराच्या घरी राहत आहे. त्याचे घर समुद्राजवळ आहे.”
7. कर्नेल्याशी बोलणे झाल्यावर देवदूत निघून गेला. नंतर कर्नेल्याने त्याचे दोन विश्वासू नोकर व एका धर्मशील शिपायाला बोलावून घेतले.
8. कर्नेल्याने या तिघांना घडलेले सर्व काही सांगितले, आणि त्यांना यापोला पाठविले.
9. सऱ्या दिवशी ही माणसे यापो गावाजवळ आली, ती दूपारची वेळ होती. त्याच वेळी प्रार्थना करावयास पेत्र गच्चीवर गेला.
10. पेत्राला भूक लागली होती. त्याला खायला पाहिजे होते. ते पेत्रासाठी जेवण करीत असता पेत्राला तंद्री लागली.
11. आणि आपल्यासामोर आकाश उघडले असून चारही कोपऱ्यांना बांधून खाली सोडल्यामुळे मोठ्या चादरीसारखे काही तरी जमिनीवर येत आहे, असे त्याला दिसू लागले.
12. त्या चादरीत वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी होते. उदा. चालणारे, सरपटणारे, आकाशात उडणारे पक्षी त्यात होते.
13. नंतर एक वाणी पेत्राने ऐकली, “पेत्रा, उठ; यापैकी कोणताही प्राणी मारुन खा.”
14. पण पेत्र म्हणाला, “मी तसे कधीच करणार नाही, प्रभु! जे अशुद्ध व अपवित्र आहे असे कोणतेही अन्न मी अद्याप खाल्लेले नाही.”
15. पण ती वाणी त्याला पुन्हा म्हणाली, “देवाने या गोष्टी शुद्ध केल्या आहेत. त्यांना अपवित्र म्हणू नकोस!”
16. असे तीन वेळा घडले. मग त्या सगळ्या गोष्टी वर स्वर्गामध्ये पुन्हा घेतल्या गेल्या.
17. पेत्र भयचकित होऊन या दृष्टान्ताचा अर्थ काय असावा याविषयी विचार करु लागला. ज्या लोकांना कर्नेल्याने पाठविले होते, त्यांना शिमोनाचे घर सापडले. ते दाराजवळ उभे होते.
18. त्यांनी विचारले, “शिमोन पेत्र येथेच राहतो काय?”
19. पेत्र अजूनसुद्धा या दृष्टान्ताविषयीच विचार करीत होता. पण आत्मा त्याला म्हणाला, “ऐक, तीन माणसे तुला शोधीत आहेत.
20. ऊठ आणि पायऱ्या उतरुन खाली जा, कारण मीच त्यांना पाठवले आहे. काही संशय न धरता त्यांच्याबरोबर जा.”
21. मग पेत्र खाली त्या माणसांकडे गेला. तो म्हणाला, “तुम्ही ज्याचा शोध करीत आहात तो मीच आहे. तुम्ही येथे का आलात?”
22. ती माणसे म्हणाली, “एका पवित्र दूताने तुम्हांला आमंत्रित करण्याविषयी करण्याविषयी कर्नेल्याला सांगितले होते. कर्नेल्य हा शताधिपती आहे. तो चांगला धर्मशील मनुष्य आहे. तो देवाची उपासना करतो. सर्व यहूदी लोक त्याचा आदर करतात, तुम्हांला घरी बोलावून तुमचे शब्द ऐकावेत असे देवदूताने त्याला सांगितले आहे.”
23. पेत्राने त्यांना आत बोलावून घेतले व रात्रभर मुक्काम करण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी पेत्र तयार झाला व त्या तीन मनुष्याबरोबर गेला. यापो येथील काही बंधुही पेत्राबरोबर गेले.
24. दुसऱ्या दिवशी पेत्र कैसरीया शहरात आला. कर्नेल्य त्याची वाट पाहत होता. त्याने आपले जवळचे मित्र व नातेवाईक यांनाही आपल्या घरी जमा केले होते.
25. जेव्हा पेत्र आत गेला, तेव्हा कर्नेल्य त्याला भेटला. कर्नेल्याने पेत्राच्या पाया पडून आदराने त्याला अभिवादन केले.
26. पण पेत्र म्हणाला. “उभा राहा, मी तुझ्याासारखाच मनुष्य आहे.”
27. पेत्र त्याच्याशी बोलत घरात गेला आणि आतमध्ये बरेच लोक जमलेले त्याने पाहिले.
28. पेत्र त्या लोकांना म्हणाला, “तुम्ही हे जाणता की, यहूदी मनुष्याने इतर जातींच्या लोकांच्या घरी जाणे किंवा त्यांच्याशी संबंध ठेवणे हे यहूदी नियमाला धरुन नाही. पण देवाने मला दाखविले आहे की, मी इतर मनुष्यमात्राला ‘अशुद्ध’ किंवा ‘अपवित्र’ मानू नये.
29. याच कारणासाठी जेव्हा हे लोक मला बोलावण्यास आले, तेव्हा मी त्यांच्याशी वाद घातला नाही. आता, कृपा करुन मला सांगा, तुम्ही मला येथे का बोलाविले?”
30. कर्नेल्य म्हणाला, “चार दिवसांपूर्वी, माझ्या घरांमध्ये मी प्रार्थना करीत होतो. बरोबर याच वेळेला म्हणजे दुपारचे तीन वाजता मी प्रार्थना करीत होतो. अचानक एक मनुष्य माझ्यासमोर उभा राहिला. त्याने लखलखीत, चमकदार कपडे घातले. होते.
31. तो मनुष्य म्हणाला, ‘कर्नेल्या! देवाने तुझी प्रार्थना ऐकली आहे. गरीब लोकांना ज्या वस्तु तू दिल्या आहेत ते देवाने पाहिले आहे. देव तुझी आठवण करतो.
32. म्हणून यापो या शहरी काही माणसे पाठव व शिमोन पेत्राला बोलावून घे. पेत्र हा शिमोन चांभाराच्या घरी राहत आहे. आणि त्याचे घर समुद्राच्या जवळ आहे.’
33. तेव्हा मी लागलीच तुम्हांला निरोप पाठविला, तुम्ही येथे आलात ही तुमची मोठी कृपा आहे. तेव्हा आम्हांला जे काही सांगण्याची आज्ञा प्रभूने तुम्हांला दिली आहे, ते ऐकण्यासाठी आम्ही सर्व आता येथे देवासमोर जमलेले आहोत.”
34. पेत्राने बोलायला सुरुवात केली: “मला आता हे खरोखर समजले आहे की, देवाला प्रत्येक मनुष्य सारखाच आहे.
35. जो कोणी त्याची भक्ति करतो आणि योग्य ते करतो, त्याला देव स्वीकारतो, व्यक्ति कोणत्या देशाची आहे, हे महत्वाचे नाही.
36. देव यहूदी लोकांशी बोलला. देवाने त्यांना सुवार्ता पाठविली की, येशू रिव्रस्ताद्धारे शांति जगात आली आहे. येशू सर्वांचा प्रभु आहे!
37. सगळ्या यहूदा प्रांतात काय घडले हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. त्याची सुरुवात योहानाने लोकांना बाप्तिस्म्याविषयी गालीलात जो संदेश दिला, त्याने झाली.
38. नासरेथच्या येशूविषयी तुम्हांला माहिती आहे. देवाने त्याला पवित्र आत्मा व सामर्थ्य देऊन रिव्रस्त बनविले. येशू सगळीकडे लोकांच्यासाठी चांगल्या गोष्टी करीत गेला. जे लोक दुष्ट आत्म्याने पछाडले होते त्यांना येशूने बरे केले. त्यामुळे देव येशूबरोबर आहे हे दिसून आले.
39. येशूने संपूर्ण यहूदी प्रांतात आणि यरुशलेमात जे जे केले त्या सर्व गोष्टी आम्ही पाहिल्या आणि आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. पण येशूला मारण्यात आले. लाकडाच्या वधस्तंभावर त्यांनी त्याला खिळले.
40. परंतु देवाने तिसऱ्या दिवशी त्याला जिवंत केले! देवाने येशूला लोकांना स्पष्ट पाहू दिले.
41. परंतु सर्वच माणासांनी येशूला पाहिले नाही. देवाने त्यांना अगोदरच साक्षीदार म्हणून निवडले होते. त्यांनीच त्याला पाहिले. ते साक्षीदार आम्ही आहोत! येशू मरणातून उठविला गेल्यानंतर आम्ही त्याच्याबरोबर अन्नपाणी सेवन केले.
42. येशूने आम्हांला लोकांना उपदेश करायला सांगितले. जिवंतांचा आणि मेलेल्यांचा न्याय करण्यासाठी देवाने त्याला आपल्याला आहे हे सांगण्यासाठी त्याने आम्हांला आज्ञा केली.
43. जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो, त्याला क्षमा केली जाईल. येशूच्या नावामध्ये देव त्या व्यक्तिच्या पापांची क्षमा करील. सर्व संदेष्टे हे खरे आहे असे म्हणतात.”
44. पेत्र हे बोलत असतानाच त्याचे बोलणे ऐकत बसलेल्या सर्व लोकांवर पवित्र आत्मा आला.
45. यहूदी विश्वासाणारे जे पेत्राबरोबर आले होते, ते चकित झाले. यहूदी नसलेल्या लोकांवरसुद्धा पवित्र आत्मा ओतला गला, यामुळे ते चकित झाले.
46. आणि यहूदी नसलेल्या लोकांना निरनिराळ्या भाषा बोलताना आणि देवाची स्तुति करताना यहूदी लोकांनी पाहिले.
47. मग पेत्र म्हणाला, “या लोकांना पाण्याने बाप्तिस्मा देण्यास आपण नकार देऊ शकत नाही, ज्याप्रमाणे आम्हांला मिळाला, त्याचप्रमाणे त्यांनाही पवित्र आत्मा मिळाला आहे.”
48. म्हणून पेत्राने कर्नेल्य, त्याचे नातेवाईक आणि मित्र यांना बाप्तिस्मा देण्याची आज्ञा केली. मग पेत्राने आणखी काही दिवस त्यांच्याबरोबर राहावे अशी त्या लोकांनी त्याला विनंति केली.

  Acts (10/28)