2Kings (3/25)  

1. अहाबाचा मुलगा यहोराम हा शोमरोन मध्ये इस्राएलचा राजा म्हणून सत्तेवर आला. यहोशाफाटचे ते यहूदाचा राजा म्हणून अठरावे वर्ष होते. यहोरामने बारा वर्षे राज्य केले.
2. यहोरामने परमेश्वराच्या दृष्टीने गैर अशी कृत्ये केली. पण आपल्या आईवडीलांसारखे त्याने केले नाही. आपल्या वडीलांनी बाल मूर्तीच्या पूजेसाठी जो स्तंभ उभारला होता तो त्याने काढून टाकला.
3. पण नबाटचा मुलगा यराबाम याने केली तीच पापे यहोरामनेही केली. शिवाय इस्राएल लोकांनाही ती करायला लावली. यराबामच्या पापात त्याने खंड पाडला नाही.
4. मेशा हा मवाबचा राजा होता. त्याच्याकडे मेंढयांचे बरेच कळप होते. एक लक्ष मेंढया आणि एक लक्ष एडके यांची लोकर तो इस्राएलच्या राजाला देत असे.
5. पण अहाबच्या मूत्यूनंतर तो इस्राएलच्या सत्तेपासून फुटून वेगळा झाला.
6. यहोराम मग शोमरोन मधून बाहेर पडला आणि त्याने सर्व इस्राएल लोकांना एकत्र केले.
7. यहूदाचा राजा यहोशाफाट याच्याकडे त्याने आपले दूत पाठवले. यहोरामने निरोप पाठवला, “मवाबच्या राजाने बंड केले आहे तेव्हा त्याच्यावर हल्ला करायला तुम्ही माझ्या बाजूने याल का?” यहोशाफाटने सांगितले, “होय, मी जरुर येईन तुझ्या माझ्यात काही भेदभाव नाही. माझे सैन्य, ते तुझे सैन्य माझे घोडे ते तुझे घोडे.”
8. “कोणत्या वाटेने हल्ला करायला जायचे” यहोशाफाटने यहोरामला विचारले. यावर, “अदोमच्या वाळवंटाच्या दिशेने” असे यहोरामने सांगितले.
9. इस्राएलचा राजा, यहूदा आणि अदोम यांच्या राजांबरोबर निघाला. सात दिवस त्यांनी वाटचाल केली. त्यांचे सैन्य, तसेच त्यांच्याबरोबरची जनावरे यांच्यासाठी पुरेसे पाणी नव्हते.
10. तेव्हा इस्राएलचा राजा यहोराम म्हणाला, “मवाबांच्या हातून पराभव पत्करावा लागावा म्हणून का परमेश्वराने आम्हा तीन राजांना एकत्र आणले आहे.?”
11. यावर यहोशाफाट म्हणाला, “येथे एखादा परमेश्वराचा संदेष्टा नक्कीच असला पाहिजे. आपण काय करावे असे परमेश्वराला वाटते ते आपण त्यालाच विचारु या.” यहोरामचा एक सेवक म्हणाला, “शाफाटचा मुलगा अलीशा इथेच आहे. एलीयाच्या हातावर तो पाणी घालत असे, त्याचा तो सेवक होता.”
12. यहोशाफाट म्हणाला, “अलीशाच्या मुखातून परमेश्वरच बोलतो.” मग इस्राएलचा राजा यहोराम, यहोशाफाट आणि अदोमचा राजा असे तिघे जण अलीशाकडे गेले.
13. अलीशा यहोरामला म्हणाला, “माझ्याकडून तुला काय पाहिजे? तू आपल्या वडीलांच्या किंवा आईच्या संदेष्ट्यांकडे जा.” तेव्हा इस्राएलच्या राजा अलीशाला म्हणाला, “नाही, आम्ही तुझ्याकडे आलो आहोत कारण मवाबांचा पराभव करायला आम्हा तीन राजांना परमेश्वराने एकत्र आणले आहे. आम्हाला तुझ्या मदतीची गरज आहे.”
14. अलीशा म्हणाला, “मी यहुदाचा राजा यहोशाफाट याचा आदर करतो व सर्वशक्तीमान परमेश्वराचा मी सेवक आहे. त्याला स्मरुन मी सांगतो की यहूदाचा राजा यहोशाफाट याच्यामुळे मी येथे आलो आहे. मी तुम्हाला खरे सांगतो जर यहूदाचा राजा यहोशाफाट इथे नसता तर मी तुझी दखलही घेतली नसती.
15. तेव्हा आता एखारुा वीणावादकाला इथे बोलावून आणा.” एक वादक येऊन वीणा वाजवू लागला तेव्हा परमेश्वराचे सामर्थ्य अलीशात आले.
16. मग अलीशा म्हणाला, “परमेश्वराचे म्हणणे असे आहे: या खोऱ्यात जागोजाग खणून ठेवा
17. परमेश्वर म्हणतो तुम्हाला वारा, पाऊस काही दिसणार नाही पण तरीही हे खोरे पाण्याने भरुन जाईल. तुम्हाला आणि तुमच्या जनावरांना पाणी मिळेल.
18. परमेश्वराला एवढे करणे सोपे आहे. मवाबांचाही तुम्हाला तो पराभव करु देईल.
19. प्रत्येक तटबंदीच्या व चांगल्या बंदोबस्त आणि निवडक नगरांवर तुम्ही हल्ला कराल. प्रत्येक चांगला वृक्ष तुम्ही तोडून टाकाल, पाण्याचे झरे, विहिरी बुजवून टाकाल. दगडफेक करुन चांगल्या शेतांची नासाडी कराल.”
20. नंतर सकाळी, सकाळच्या यज्ञाच्या वेळी, अदोमच्या बाजूने पाण्याचा लोंढा आला आणि सगळे खोरे पाण्याने भरले.
21. राजे आपल्यावर हल्ला करायला आले आहेत हे मवाबच्या लोकांनी ऐकले तेव्हा त्यांनी आपल्याकडच्या युध्दात उतरता येण्याजोग्या सर्व पुरुषांना एकत्र केले. युध्दासाठी सज्ज होऊन ते सीमेवर जाऊन थांबले.
22. मवाबचे लोक त्या दिवशी भल्या पहाटे उठले. उगवत्या सूर्याची लाली खोऱ्यातल्या पाण्यात प्रतिबिंबित होऊन चमकत होती. तेव्हा मवाबी लोकांना ते रक्ताचे पाटच वाटले.
23. ते म्हणाले, “ते बघा रक्त! या राजांची आपापसात लढाई झालेली दिसते. त्यांनी परस्परांना मारले आहे. चला, आपण त्या मृतदेहावरील मौल्यवान वस्तू लुटून आणू.”
24. मवाबी लोक इस्राएलांच्या छावणीपाशी आले. तेव्हा इस्राएल लोकांनी बाहेर येऊन मवाबी सैन्यावर हल्ला केला. मवाबी लोक पळत सुटले. इस्राएल लोकांनी त्यांच्या पाठलाग करत त्यांच्या प्रदेशात शिरकाव केला.
25. इस्राएल लोकांनी त्यांची नगरे उध्वस्त केली. पिके उभी असलेल्या त्यांच्या शेतात दगडांचा मारा केला. झरे, विहिरी बुजवल्या. झाडे आडवी केली. कीर हरेसेथला वेढा घालून या नगराचाही पाडाव केला.
26. या लढाईला तोंड देणे आपल्याला जड जात आहे हे मवाबाच्या राजाने जाणले. तेव्हा त्याने तलवारधारी सातशे निवडक माणसे बरोबर घेतली आणि वेढा फोडून अदोमच्या राजाला तो मारायला निघाला पण त्याला ते जमले नाही.
27. मग मवाबच्या राजाने आपल्या थोरल्या मुलाला बरोबर घेतले. हा मुलगा त्याच्यानंतर गादीवर बसणार होता. नगराच्या तटबंदीच्या भिंतीवर या राजाने आपल्या मोठ्या मुलाचा यज्ञात बळी दिला. इस्राएल लोकांना या गोष्टीचा धक्काबसला. मवाबच्या राजाला सोडून ते आपल्या देशात चालते झाले.

  2Kings (3/25)