2Chronicles (26/36)  

1. अमस्याचा मुलगा उज्जीया याला यहूदाच्या लोकांनी गादीवर बसवले. उज्जीया तेव्हा सोळा वर्षांचा होता.
2. उज्जीयाने एलोथ नगर पुन्हा बांधून काढले आणि यहूदाच्या स्वाधीन केले. अमस्याच्या मृत्यूनंतरची ही घटना.
3. उज्जीया सोळा वर्षांचा असताना राजा झाला. पुढे त्याने यरुशलेमवर 52 वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यखिल्या. ती यरुशलेमची होती.
4. उज्जीयाचे वर्तन परमेश्वराच्या दृष्टीने योग्य असे होते. आपले वडील अमस्या यांच्याप्रमाणे त्याने देवाचे अनुसरण केले.
5. जखऱ्याच्या हयातीत त्याने देवाचे अनुसरण केले. आदरपूर्वक परमेश्वराला मानणे त्याला जखऱ्याने शिकवले. तो असे वागत असे तोपर्यंत परमेश्वर देवाने त्याचे कल्याण केले.
6. उज्जीयाने पलिष्ट्यांबरोबर युध्द केले. गथ, यब्ने व अश्दोदचे कोट पाडून टाकले. अश्दोद जवळ व पलिष्ट्यांच्या वस्तीत इतरत्र उज्जीयाने नगरे वसवली.
7. पलिष्टे, गुरबालमधले अरब आणि मऊनी यांच्याशी झालेल्या लढायांमध्ये परमेश्वराने उज्जीयाला साहाय्य केले.
8. अम्मोनी लोक उज्जीयाला कर देत असत. उज्जीयाचे सामर्थ्य इतके वाढले की त्याची कीर्ती मिसरच्या सीमेपर्यंत पोहोंचली.
9. यरुशलेममध्ये कोपऱ्यातली वेस, खोऱ्याची वेस आणि कोट वळसा घेतो तेथे उज्जीयाने बुरुज बांधून तटबांदीला बळकटी आणली.
10. वाळवंटातही त्याने बुरुज बांधले. अनेक विहिरी खणल्या. डोंगराळ भागात आणि सपाटीवर त्याची बरीच गुरेढोरे होती. तसेच तेथील सुपीक भागात शेतकरी होते. द्राक्षबागांच्या निगराणीसाठी देखील त्याची माणसे होती. उज्जीयाला शेतीची आवड होती.
11. उज्जीयाच्या सैन्यात चांगले लढवय्ये होते. ईयेल हा चिटणीस आणि मासेया हा कारभारी हे दोघे त्यांची गटागटात विभागणी करत. हनन्या या एका सेनानायकच्या हाताखाली हे दोघेजण होते. ईयेल आणि मासेया यांनी केलेल्या गणतीप्रमाणे सैन्य टोळी टोळीने लढाईवर जाई.
12. सैन्यात एकंदर 2,600 प्रमुख लढवय्ये नेतृत्व करीत.
13. शत्रूवर तुटून पडणाऱ्या 307,500 वीरांच्या सैन्याचे ते प्रमुख होते. राजाच्या बाजूने ते शत्रूवर चालून जात.
14. या सर्व सेनेला उज्जीयाने ढाली, भाले, शिरस्त्राणे, चिलखते, धनुष्य आणि गोफणगुंडे अशी शस्त्रास्त्रे दिली.
15. काही हुशार कारागिरांनी शोधून काढलेली यंत्रेही उज्जीयाने यरुशलेममध्ये बनवून घेतली. ती त्याने बुरुजांवर आणि तटाच्या कोंपऱ्यांवर बसवली. ही यंत्रे बाण व मोठ्या दगडांचा मारा करीत असत. उज्जीया फार प्रसिध्द झाला. उज्जीयाचे नाव त्यामुळे सर्वदूर पसरले. त्याची कुमक वाढली आणि तो बलवान झाला.
16. पण सामर्थ्य वाढल्यावर तो गर्विष्ठ झाला आणि त्यामुळे त्याचा नाश ओढवला. परमेश्वरावर त्याची निष्ठा राहिली नाही. धूप जाळण्यासाठी असलेल्या वेदीवर धूप जाळण्यासाठी तो परमेश्वराच्या मंदिरात गेला.
17. तेव्हा याजक अजऱ्या आणि आणखी ऐंशी शूर याजक त्याच्यापाठोपाठ तिथे गेले.
18. त्यांनी उज्जीयाची चूक दाखवून दिली. ते त्याला म्हणाले, “उज्जीया, परमेश्वराला धूप जाळणे हे तुझे काम नव्हे. तू ते करु नयेस. अहरोनचे वंशज आणि याजक यांचेच ते काम आहे. धूप जाळण्याच्या या पवित्र कामासाठी ते नेमलेले आहेत. तेव्हा या पवित्र गाभाऱ्यातून तू बाहेर ये. परमेश्वराच्या आज्ञेचे तू उल्लंघन केले आहेस. परमेश्वर देवाकडून तुझा गौरव होणार नाही.”
19. पण उज्जीयाला या बोलण्याचा राग आला. त्याच्या हाती धूपपात्र होते. याजकांवर तो संतापला असताना पाहता पाहता त्याच्या कपाळावर कोड उठले. परमेश्वराच्या मंदिरात धूप जाळण्याच्या वेदीच्या जवळ याजकांसमक्षच हे घडले.
20. मुख्य याजक अजऱ्या आणि इतर याजक उज्जीयाकडे बघतच राहिले. त्याच्या कपाळावरचे कोड त्यांनी पाहिले. त्याबरोबर त्यांनी उज्जीयाला तातडीने मंदिराबाहेर घालवले. परमेश्वराने शासन केल्यामुळे उज्जीयाही लगेचच चालता झाला.
21. राजा उज्जीया कुष्ठरोगी झाला. मंदिरात त्याला मज्जाव होता. तो एका स्वतंत्र घरात राहू लागला. त्याचा मुलगा योथाम हा राजघराण्याचा कारभारी बनला आणि लोकांचे शासन करु लागला.
22. उज्जीयाची इतर सर्व कृत्ये आमोजाचा मुलगा यशया संदेष्टा याने अथपासून इतीपर्यंत लिहिलेली आहेत.
23. उज्जीया मरण पावला आणि त्याच्या पूर्वजांजवळ त्याचे दफन झाले. राजांसाठी असलेल्या दफनभूमीच्या शेजारच्या जागेत त्याला पुरले. ‘कारण तो कुष्ठरोगी होता.’ उज्जीयाच्या नंतर त्याचा मुलगा योथाम राजा झाला.

  2Chronicles (26/36)